तातडीने निरोप गेले, आणि आपापल्या मतदार याद्या घेऊन सारे जण कार्यालयात हजर झाले. ‘असे कसे झाले’ हा प्रश्न स्वत:शीच विचारत सारे जण मतदार यादीवरच्या खुणांची पुन:पुन्हा बेरीज करत होते. मंथन बैठक संपली आणि काही क्षणांतच चिंतन बैठक सुरू झाली. गेल्या काही महिन्यांपासून पन्नाप्रमुखांचे चित्त थाऱ्यावर नव्हते. वारंवार घरोघरी जाऊन, मताची खात्री करून घेऊनच त्यांनी मतदार यादीतील पानांवर लाल- आणि हिरव्या- खुणा करून ठेवल्या होत्या. मतदानाच्या आदल्या दिवशी त्याची शहानिशाही केली होती, आणि विजय निश्चित झाल्याच्या निर्धास्तभावाने ते रात्री निवांत झोपले होते. अशाच निर्धास्ततेत मोजणीची घटका आली, आणि प्रत्येक फेरीगणिक बसणाऱ्या फटक्याबरोबर पन्नाप्रमुख कळवळू लागले. आपले सारेच अंदाज, सर्वेक्षणे आणि मतदार संपर्क यादीतील खुणादेखील खोटय़ा ठरल्या याची जाणीव त्यांना छळू लागली. अस्वस्थतेत दुपार संपल्यावर लगोलग बैठकीचे निरोप आल्याने तर पन्नाप्रमुखांची तारांबळच उडाली. आता पराभवाचे चिंतन कसे करायचे, याचा आपापसात खल करीत सारे पन्नाप्रमुख कार्यालयात बसले. पुढे बैठक सुरू झाली, आणि पराभवाचे विश्लेषण करण्याची आज्ञा प्रचारप्रमुखांनी केली.. पहिला पन्नाप्रमुख आपल्या मतदारयादीचे पान घेऊन उठला. खिशातून दुसरा कागद काढून त्यावर केलेली आकडेमोड त्याने सर्वासमोर धरली, आणि तो बोलू लागला. ‘या यादीतील शंभरपैकी ७० मतदारांशी आम्ही प्रत्यक्ष संपर्क साधला. वारंवार त्यांची भेट घेऊन मतदानाची खात्री करून घेतली. आर्जवं केली, आणि प्रत्येकानेच आम्हाला आश्वासन दिले, ‘हम तो आप को ही वोट देंगे!’.. ज्या मतदारांनी अशी ग्वाही दिली होती, त्यांच्या नावापुढे लाल खुणा केल्या. प्रत्येकाने मतदान केले याची खात्री झाल्यावर पुन्हा खुणा केल्या. या प्रकारे, आमच्या केंद्रावरील प्रत्येक पन्नाप्रमुखाने काम केले असून, ज्यांनी आम्हास ग्वाही दिली होती, त्यांचे मतदान व्हावे यासाठी प्रत्येकाने जिवाचे रान केले होते. तरीही असे का झाले, कळलेच नाही!’.. एवढे बोलून पन्नाप्रमुख जागेवर बसला. दुसरा पन्नाप्रमुख उठला, त्यानेही तोच सूर लावला. ‘आमच्या मंडलातील प्रत्येक मतदाराने आम्हास ग्वाही दिली होती, वोट तो आप को ही देंगे.. अशा प्रत्येक मतदारास केंद्रावर आणण्याची सोयही केली होती. आपल्या यादीतील लाल खुणा असलेला प्रत्येक मतदार मतदान करेल याची खबरदारीही घेण्यात आली होती. मतदार खोटे बोलले!’.. खजीलपणे आपले वाक्य अर्धवट सोडून तो खाली बसला.. पुढे सारे पन्नाप्रमुख हाच पाढा वाचू लागल्यावर चिंतन बैठक थांबविण्याचा इशारा प्रचारप्रमुखांनी केला. त्यांचा चेहरा गंभीर झाला. ‘पन्नाप्रमुखांनी ज्यांना तळमळीने केंद्रावर आणले, ते सारे जण मतदान करतील याची खबरदारी घेतली, त्यापैकी कोणीही खोटे बोलला नाही. मतदार प्रामाणिक असतो, आणि त्यांनी खरे तेच सांगितले होते. आपण सत्तेच्या स्वप्नात दंग राहिलो हे मान्य करावयास हवे’.. एवढे बोलून, ‘आप को वोट देंगे’ असे सांगणाऱ्या मतदारांचे त्यांनी आभार मानले, आणि चिंतन बैठक संपली. ‘पुन्हा एक मंथन बैठक बोलवावी लागेल,’ असे त्यांनी श्रेष्ठींना कळविले..