11 December 2017

News Flash

..आणि, दादांचे गहिवरणे!

अजितदादा विनोदही करतात, पण तेव्हा फक्त तो ऐकणाऱ्यांनी हसायचे असते.

लोकसत्ता टीम | Updated: October 9, 2017 3:34 AM

अजित पवार ( संग्रहित छायाचित्र )

महाराष्ट्राच्या राजकारणातील दुसऱ्या पिढीचे पवार, ‘अँग्री यंग मॅन’च्या भूमिकेत का वावरतात असा प्रश्न बहुतेकांना पडलेला असतो. अजितदादा विनोदही करतात, पण तेव्हा फक्त तो ऐकणाऱ्यांनी हसायचे असते. मागे एकदा एक विनोद चांगलाच अंगाशी आला, तेव्हापासून आपला विनोद आपल्या अंगाला लावून घ्यायचा नाही याची काळजी घेण्यास त्यांनी सुरुवात केली असे म्हणतात. पण चांगल्या वक्त्याला कोरडे राहून चालत नाही. राजकीय भाषणातून विनोद वज्र्य करायचा असेल तर ओलावा तरी आणला पाहिजे असे कुणी तरी- बहुधा उल्हासदादा पवार – कुठल्या तरी भाषणात बोलले आणि आपले वक्तृत्व लोकांच्या मनाला भिडविण्याची दुसरी शक्कल अजितदादांना सापडली असे म्हणतात.. ती शक्कल आपल्या वक्तृत्वात मुरविण्याचा सध्या त्यांचा फक्त सराव सुरू आहे. ‘त्या’ विनोदानंतर त्यांनी आपल्या भाषणाचा बाज बदलला. आता अजितदादा अधूनमधून घरगुती आणि मर्यादित मेळाव्यात त्याचा शिडकावा करतात. परवा बारामतीमधील एका कार्यक्रमात काकांविषयी बोलताना अजितदादा गहिवरले आणि त्यांचे गहिवरणे पाहून थोरल्या पवारांचा कंठदेखील दाटून आला. असे अनेकांचे होते, पण अजितदादांचे आणि थोरल्या पवारांचे गहिवरणे ही बातमी झाली. अजितदादांचे भाषण करताकरता गहिवरणे हा केवळ एका व्यक्तीच्या वक्तृत्वाच्या बाजातील बदल नव्हे, तर त्या व्यक्तिमत्त्वातील बदल आहे. पण ते पटवून द्यायला अजितदादांना आणखी किती तरी भाषणांमध्ये खरेखुरे गहिवरावे लागेल. श्रोत्यांच्या काळजाला हात घालणारे गहिवरणे ही एक कसोटी असते. उल्हासदादांचा अभिनयाशी जवळचा संबंध असल्याने त्यांना गहिवरण्याचा अभिनय उत्कटतेने वटविता येतो. अजितदादांचे तसे नाही.  जे काही असेल ते स्पष्टपणे त्यांच्या चेहऱ्यावर जसेच्या तसे उमटत असल्याने, त्यांना गहिवरण्याचा अभिनय फारसा वटविता येणारा नाही. म्हणजे, अजितदादांचे गहिवरणेही आतून आलेले असले पाहिजे. तसे अजितदादा त्याआधीही अनेक प्रसंगांत गहिवरले आहेत. कबड्डी कर्मयोगी फिदाभाई शेख गेले, तेव्हा त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करताना फिदाभाईंच्या आठवणीने अजितदादा गहिवरले होते. एका अपघातातून अजितदादांच्या मदतीमुळे बचावलेल्या अनाथ कीर्तीने वाढदिवशी दादांचे आभार मानले, तेव्हाही ते गहिवरले होते. खासगीत दादा खरेखुरे गहिवरतात, हे त्यांच्या रोखठोक बोलणे अंगवळणी पडलेल्या अनेकांच्या आता लक्षात आले असेल. श्रोत्यांच्या काळजाला हात घालण्यासाठी आवश्यक असलेला ओलावा आणण्याची हीच योग्य वेळ आहे, हे अशा खासगीतील गहिवरामुळे सिद्ध झाल्यानंतर आता अजितदादांच्या वक्तृत्वाला यापुढे ओलाव्याचा स्पर्श असेल, असे संकेत मिळू लागले आहेत. राजकारणात असा बाज असलेले वक्ते फारसे आढळत नाहीत. त्यांच्या हुकमी गहिवरण्याने अलीकडे श्रोत्यांची मने गलबलतच नाहीत. मनापासून, -अगदी आतून- गहिवरणे अजितदादांना साधले, तर त्यांचे जुने विनोद जनता विसरून जाईल..

First Published on October 9, 2017 3:34 am

Web Title: articles in marathi on ajit pawar