सध्याच्या काळात कुणा यादवबाबाने ‘आधुनिक गीता’ लिहिलीच, तर त्यामध्ये ‘स्थितप्रज्ञ सामान्य माणसा’ची लक्षणे लिहावी लागतील. शेवटी सामान्य माणूस कोण?.. ज्याच्या मनात प्रस्थापित व्यवस्थेविरुद्धचा संताप ठासून भरलेला असतो, ती उलथून टाकण्याची स्वप्ने मनात खदखदत असतात, जो प्रसंगी कायदे मोडून व्यवस्थेच्या विरोधात रस्त्यावर उतरतो, ज्याला कोणत्याही कामासाठी रांगेत उभे राहावे लागते, सरकारदरबारी ताटकळावे लागते, असा कोणताही माणूस हा सामान्य माणूस असतो. अलीकडे सर्वत्रच कायदा-सुव्यवस्था स्थितीचे धिंडवडे निघत असून त्याचे फटके सामान्य माणसाला सर्वाधिक बसत असतात. मारामाऱ्या, चोऱ्या, दंगे, यांमध्येही सामान्य माणूसच भरडला जातो. संसाराचा गाडा हाकण्याच्या विवंचनेने त्याला सतत घेरलेले असते. अडीअडचणीला ज्याच्यासमोर हात पसरावयाची वेळ येते, त्यांनी या सामान्य माणसाला एकाकी करून सोडलेले असते. या साऱ्यात, भरडून निघणारा हा सामान्य माणूस अधिकच संतापतो. व्यवस्थेच्या विरोधात भरपूर बोलतो, भाषणे देतो. त्याची धारदार जीभ सळसळू लागते. तो एवढा बोलतो, की पुढे त्याच्या बोलण्याचीही थट्टा होऊ  लागते. अशाच अव्यवस्थेमुळे भरडल्याच्या अनुभवाने शहाणा झालेला समंजस विचार करणारा अन्य सामान्य समाज मग या अतिउत्साही सामान्य माणसाला वेडा ठरवतो. त्याच्याकडे दुर्लक्ष करू लागतो, आणि एकाकीपणाच्या भावनेने ग्रासलेला हा सामान्य माणूस अधिकच बंडखोर होतो. मग त्या साऱ्या व्यवस्थाच त्याच्याविरुद्ध एकवटतात आणि सामान्य माणूस भानावर येतो. व्यवस्थेशी टक्कर घेणे एकटय़ाचे काम नव्हे, ते झेपणारेही नाही याची जाणीव होते, आणि तो गप्प होतो. त्याचे बंडखोर मन ताळ्यावर येऊ  लागते. त्याच्या वळवळत्या जिभेला लगाम बसू लागतो, आणि उगवणाऱ्या प्रत्येक दिवसाचा गाडा आपली सामान्य ताकद पणाला लावून ओढू लागतो. आपल्या हातून होईल तेवढाच बदलाचा वाटा उचलावा अशा विचारातच स्वत:चे समाधान करून घेऊ  लागतो. असे झाले, की समाजातील इतर सामान्य माणसे त्याचा पराभव पाहून त्याची खिल्ली उडवू लागतात. त्याला साथ देणारेही त्याला मारहाण करून जातात. त्याच्या लढय़ातून काही तरी चांगले निष्पन्न होईल व त्याचा लाभ आपोआपच आपल्याला मिळेल अशा अपेक्षेने दुरूनच पाहणारी माणसे, त्याच्यावर अपेक्षाभंगाचे खापर फोडतात. कुणी त्याच्या तोंडाला काळे फासतात, तर कुणी कपडय़ांवर शाई ओततात. मग हा सामान्य होऊ  पाहणारा माणूस खरोखरीच सामान्य होऊन जातो. इतका, की सामान्यांतही थोडा अधिक श्रेष्ठ सामान्य असतानाही त्याची गाडी चोरीला जाते, त्याला कुणीही मारहाण करते, कुणीही त्याच्या अंगावर शाई फेकते आणि कुणीही त्याची खिल्ली उडवू लागते. नव्या गीतेतील सामान्य माणसाची लक्षणे लिहिताना, या लक्षणांनी परिपूर्ण असलेल्या अरविंद केजरीवाल यांच्याखेरीज अन्य कोण नजरेसमोर येईल? केजरीवाल हा ‘खरा आम आदमी’ नव्हे काय?