25 March 2019

News Flash

‘ट्रम्पतात्या, तुम्हीसुद्धा?’

प्रिय ट्रम्पतात्या, साष्टांग नमस्कार.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

प्रिय ट्रम्पतात्या, साष्टांग नमस्कार. तुम्ही अमेरिकेचे अध्यक्ष झालात तेव्हा आम्हाला तुमच्याकडून किती तरी अपेक्षा होत्या. कारण इकडे आमचे नरेंद्रभाई, ‘ना खाऊंगा न खाने दूंगा’ अशा घोषणा देत सर्वत्र झंझावाती दौरे करत होते. असे काही ऐकण्याची आम्हाला सवय नव्हती. ‘असे कुठे असते का’, अशा विचाराने आम्ही वारंवार अस्वस्थ होत होतो. राजानेच ‘पोटावर मारले’ तर जायचे कुणाकडे, हा ‘वैश्विक सवाल’ आम्हाला छळू लागला होता. तुमच्या निवडणुकीच्या वेळी कानावर येत असलेल्या गुजगोष्टी ऐकून, तुम्ही तरी यापेक्षा वेगळे असाल असे आम्हाला वाटायचे, पण ‘अध्यक्षपदाची झालर खासगी धंद्याला लावायची नाही’ असा निर्णय तुम्ही घेऊन टाकलात. धंदापाण्याच्या निमित्ताने भारताच्या दौऱ्यावर आलेल्या तुमच्याच मुलाने कालपरवा आम्हाला ही गोष्ट सांगितली, तेव्हा मात्र आमची निराशा झाली. नरेंद्रभाईंचं ठीक आहे, पण घर चालवायचं म्हणजे काय काय खावं लागतं, काय पचवावं लागतं, हे तुम्हाला तरी ठाऊक असेल असे आम्हाला वाटले होते. आमच्या देशात, धंदापाण्याला बरकत हवी असेल तर पहिल्यांदा राजकारणात उतरावे लागते. तुमच्या एखाद्या भागीदाराला विचारून पाहा. राजकारणाशिवाय धंद्याला बरकत नाही असेच तोदेखील सांगेल. राजकारणाची कास धरली की धंद्याची मंगल प्रभात उगवून धंदा जोमात चालतो, याची अनेक उदाहरणे इकडे व्यावसायिक निकटवर्तीयांच्या रूपाने समोर असताना, पदाची झालर व्यवसायाला लावायची नाही असा निर्णय घेऊन तुम्ही परंपरांचीच पंचाईत केली असे आमचे विनम्र मत आहे. तुमच्या मुलाने, ट्रम्प ज्युनियरने स्वत:च तुमचे हे पथ्य जाहीर केल्याने, ‘ट्रम्पतात्या, तुम्हीसुद्धा?’ असा निराश सवाल तुम्हाला करावा असे आम्हाला वाटत आहे. तुमच्या या निर्णयाने तुमच्या व्यवसायावर केवढा परिणाम झालाय, हे तर तुमच्या चिरंजीवांनीच सांगून टाकले आहे. पण भारतात असे भलतेच कानमंत्र देण्याने उभय देशांतील व्यावसायिक हितसंबंधांवर काय परिणाम घडवू शकतात याचे तुम्हास भान नसेलच, असे आम्हाला वाटत नाही. आमच्याकडे धंदा-व्यवसाय आणि राजकारण यांचे नाते एवढे घट्टपणे रुजलेले असताना आणि धंद्याच्या भरभराटीसाठीच राजकारण हे सूत्र वापरून अनेकांनी आपला आर्थिक उत्कर्ष साधून जम बसविलेला असताना तुम्ही मात्र आपल्याकडे चालून आलेले पद आणि व्यवसायाची सांगड घालण्याची ही सुवर्णसंधी लाथाडता आणि तुमचे सुपुत्र त्याची कौतुकाने वाच्यता करतात, हे काही आम्हाला फारसे पचनी पडणारे नाही. नरेंद्रभाईंनी ‘न खाने दूंगा’ असे सतत बजावल्यामुळे अगोदरच देशातील किती तरी जणांच्या पोटात भुकेचा आगडोंब उसळलेला असून ‘केव्हा एकदा खायला लागतो’ असे वातावरण पसरलेले असताना, तुम्हीदेखील त्यांच्यासारखेच निर्णय घेऊन इतरांची पंचाईत करत आहात, असे आम्हाला वाटते. नैतिकतेचे जे काही नियम तुम्हाला प्रिय वाटत असतील, ते तुम्ही तुमच्यापुरते, तुमच्या कुटुंब आणि देशापुरते ठेवा.. आमच्या देशात असे काही तरी कानमंत्र देऊन आजवरच्या प्रथांमध्ये अडथळे उभारू नका, अशी आमची तुम्हास नम्र आणि आदरपूर्वक विनंती आहे. कळावे. मेहेरबानास जाहीर व्हावे!

First Published on February 22, 2018 3:07 am

Web Title: articles in marathi on donald trump and narendra modi