23 February 2019

News Flash

पर्रिकर, बियर आणि पकोडे..

मनोहर पर्रिकर नावाच्या माणसाच्या संवेदनशील, संस्कारशील, नीतिवान, पापभीरू, संस्कृतिरक्षक

मनोहर पर्रिकर

मनोहर पर्रिकर नावाच्या माणसाच्या संवेदनशील, संस्कारशील, नीतिवान, पापभीरू, संस्कृतिरक्षक, भविष्यवेत्त्या, भावनाप्रधान मनात अशी अचानक चिंतेची वादळे का बरे घोंघावू लागली असतील? ज्या राज्यात दारूचा महापूर असतो आणि त्यामध्ये यथेच्छ डुंबण्यासाठीच सारा देश तिकडे धावतो, त्या गोव्याचे मुख्यमंत्री स्वत:च अशी नैतिकतेची परिभाषा बोलू लागले, पुढच्या पिढीचे नैतिक पालकत्व शिरावर घेऊन त्यांच्या निर्णयस्वातंत्र्यांवरच प्रश्नचिन्हे उमटवू लागले, तर बियर पिणाऱ्या मुलींच्या भविष्याचे जाऊ  द्या, त्यांच्या गोव्याच्या भविष्याचे काय होणार या चिंतेने आता अनेकांना ग्रासले असेल. गोव्याची अवघी अर्थव्यवस्था पर्यटन उद्योगावर, पर्यायाने स्वस्तात व मुबलक मिळणाऱ्या दारू- बियरवरच अवलंबून असताना, मुलीदेखील बियर पितात या सत्याचा साक्षात्कार अचानकपणे पर्रिकरांना झाला आणि त्यांना चिंता वाटू लागली, ही वरवर दिसते तेवढी सीधी बात नाही. अलीकडे मुलीदेखील बियर पिऊ  लागल्या आहेत, या वास्तवाचा धक्का  पर्रिकरांना अचानक आजच का बरे बसला असेल? पर्रिकरांच्या वक्तव्यांचा अलीकडचा इतिहास असे सांगतो की ते जगाच्या दृष्टीने भलतेच- विनोदी वाटावे असे- काहीबाही जेव्हा कधी बोलून जातात, तेव्हा एक निर्थक वाद उभा करणे आणि त्यामध्ये लोकांना गुंतविणे यापलीकडे अन्य फारसा मोठा हेतू नसतो. संरक्षणमंत्रिपदाच्या कारकीर्दीतही पर्रिकरांनी अशीच काहीबाही विधाने करून भलत्याच चर्चेचे फाटे फोडले होते. मुलींनी बियर प्यावी किंवा नाही, मुलींनीच का पिऊ  नये, बियरसारख्या पेयामुळे जर दुष्परिणाम होत असतील, तर ती मुलांनी तरी का प्यावी आणि दुष्परिणाम होतच असतील, तर मुले बियर पितात त्यावर चिंता का वाटू नये असे अनेक प्रश्न पर्रिकरांच्या नैतिक पालकत्वाच्या भूमिकेमुळे समाजमाध्यमातील तमाम तरुणाईमधून उमटू लागले आहेत . तिकडे दिल्लीत देशातील बेरोजगारीच्या प्रश्नाच्या उकळत्या तेलात पकोडे तळले जात असताना, पर्रिकरांनी गोव्यातून नव्या चर्चेला तोंड फोडत तरुणाईच्या वैचारिक प्रतिभेस नवे खाद्य पुरविल्याने, पकोडय़ांच्या कढईत भलतेच तेल ओतून आता पर्रिकर गंमत पाहत बसणार आहेत. आजकाल समाजमाध्यमांचा वापर वारेमाप वाढल्यामुळे, प्रतिक्रियावादी चळवळही जोमाने फोफावलेली असताना पर्रिकरांच्या या चिंतेची चिरफाड होणार नाही असा विचारदेखील अशक्यच असल्याने, एका पिढीच्या भविष्याच्या चिंतेने व्याकूळ झालेल्या  पर्रिकरांना वर्तमानातील परिणामांचे भान नसावे वा त्याच्या परिणामांचा विचार न करताच त्यांच्या तोंडून काहीतरी विधान निघावे एवढे हे प्रकरण सरळसोट नाही. पर्रिकरांची जीभ घसरली असे म्हणावे, तर तसेही मानणे धाडसच ठरेल. याआधी जेव्हा जेव्हा पर्रिकरांची जीभ घसरल्याच्या समजुतीने त्यांच्यावर शाब्दिक प्रतिहल्ले झाले आहेत, तेव्हा तेव्हा, त्या त्या वेळी सुरू असलेल्या अन्य वादांना फाटे फोडण्याची महत्त्वाची कामगिरी आपल्या जिभेने बजावल्याच्या समाधानाने पर्रिकर मनातल्या मनात खदखदून हसले आहेत. आतादेखील ते तसेच हसत असतील. कारण समाजमाध्यमांवर पर्रिकरांच्या नावाने जल्पकांच्या जत्रा सुरू झाल्या आहेत, आणि तिकडे उकळत्या तेलातले पकोडे थंड होत चालले आहेत..

First Published on February 11, 2018 11:45 pm

Web Title: articles in marathi on manohar parrikar