11 December 2017

News Flash

युवराजांची शिकवणी

शिवाय अधूनमधून जमेल तसे हार्डवर्कही करतात.

लोकसत्ता टीम | Updated: October 12, 2017 3:23 AM

संग्रहित छायाचित्र

भारतीय लोक(घराणे)शाहीत रोज नवनव्या शाहजादय़ांची भर पडत चाललेली असली, तरी त्या यादीतील अग्रमानांकित एकच युवराज. ते म्हणजे चि. युवराज. आता त्यांचेविषयी जे काही म्हणावयाचे आहे ते व्हॉट्स्याप विद्यापीठाने अगोदरच अनेकदा प्रसिद्ध केलेले असल्यामुळे त्यांचेसंबंधाने नवे काय लिहावे, हा एक सनातन प्रश्नच निर्माण झाला आहे या भारतदेशी. बहुधा युवराजांनाही पत्रकारूनारूंपुढील या समस्येची उत्तम जाणीव असावी. एक तर ते हार्वर्डवाले. शिवाय अधूनमधून जमेल तसे हार्डवर्कही करतात. परिणामी त्यांस जमिनीवरच्या वास्तवाची माहिती मिळते थोडी थोडी. त्यातूनच त्यांनी हे जाणले असेल, की पत्रकारूनारू आणि पंडिता स्मृतीजी इराणी यांचे हातास व श्रीमुखास काही काम द्यायचे असेल, तर आपण सातत्याने बोलत राहिले पाहिजे. वस्तुत: आमच्या नेहमी मनी येते, की या राहुलजींना आता बेदखलच करावे. कां की, भारतीय राजकारणात त्यांस ५००च्या ‘कागज का तुकडा’ नोटेचेही मूल्य नाही. त्यांस त्यांच्या पक्षातही कोणीच काही विचारीत नाही, असे तर पूज्य अमितजी शाह यांनीच म्हटलेले आहे. असे असताना त्यांचेविषयी बोलून आपण का म्हणून त्यांचे महत्त्व वाढवावे? व ते काम आपण पं. स्मृतीजींवरच सोडून द्यावे. परंतु काय करणार, युवराज असे काही विचारप्रवर्तक बोलतात की आपणास बोलण्याशिवाय पर्यायच राहत नाही. उदाहरणार्थ त्यांनी अलीकडेच आरेसेसविषयी मांडलेले विचार. या संघटनेत आपण कधी महिलांस पाहिले का शॉर्ट्समध्ये, असा एक यक्षप्रश्न त्यांनी केला. अहाहा! किती गहन बरे हा प्रश्न. आजवर कोणासच कसा तो पडला नाही या आश्चर्याने आमची पाची बोटे आमच्याच हो तोंडात गेली. नंतर ध्यानी आले की, युवराज अद्याप २०१४च्या धक्क्यातून बाहेरच आलेले नसावेत. त्यामुळे तदोपरांत आरेसेसची झालेली वाढ त्यांना माहीतच नसावी. ही वाढ केवळ कार्यकर्त्यांच्या संख्येतच नव्हे, तर ती विजारीच्या आकारातही झालेली आहे. तेव्हा समजा, आता आरेसेसमधील महिलांचा प्रश्न आला, तरी तेथे शॉर्ट्स अर्थात अर्ध्या विजारीचा मुद्दा उरतच नाही. उरला प्रश्न महिलांचा. तर त्या आरेसेसमध्ये नाहीत असे कोण म्हणते? त्या तर आहेतच. आता त्यांची शाखा वेगळी. संघटनेचे नाव वेगळे, पण अखेर तो परिवाराचाच तर भाग आहे; परंतु चूक परिवाराचीच म्हणावी लागेल.. त्यांनी संघ परिवार असे म्हणण्याऐवजी संघ घराणे असे म्हटले असते, तर ते युवराजांस नीट समजले असते. आता युवराजांना ही शिकवण देण्याचे काम निदान अमितजींनी तरी करावे. नाही तरी २०१४ मध्ये भाजपने आपणांस हाणूनठोकून धडे दिले, असे युवराजच सांगत आहेत. बहुधा तेव्हाची शिकवणी कामास आली नसावी. दुसरे काय?

First Published on October 12, 2017 3:22 am

Web Title: articles in marathi on rahul gandhi