या देशात सर्वसामान्य श्रद्धाळू नागरिकांना काही धार्मिक स्वातंत्र्य आहे की नाही हा सवाल आता (पुन्हा एकदा) पोलिसांना खडसावून विचारलाच पाहिजे. किंबहुना याविरोधात एखादी क्रांती केलीच पाहिजे. गेलाबाजार स्वातंत्र्याची साडेसहावी (चूकभूल द्यावी घ्यावी!) लढाई तरी लढलीच पाहिजे. काय चालले आहे या पवित्र देशात? आमच्या धार्मिक श्रद्धांविरोधात ही कसली कारस्थाने रचता आहात? आमच्या परमपूज्य महाराजांना चक्क अटक केली जाते म्हणजे काय? किती साधुसंतांचा छळ करणार आहात तुम्ही? आमच्या पूज्य आसारामांना अटक केली तुम्ही. त्यांचे सर्व भक्त दररोज न चुकता आसारामजी हे कसे मिशनऱ्यांच्या षड्यंत्राचे बळी आहेत हे पुराव्यांनिशी ट्विटरवरून सांगत आहेत. आमचे परमपूज्य नेते स्वामी सुब्रमण्यन स्वामी त्यांना ट्विटरवरून निर्दोषत्वाची प्रमाणपत्रे देत आहेत. तरीही या सरकारला जाग येऊ नये? त्यांना पकडल्यानंतर आम्हांस तर वाऱ्यावर पडल्यासारखेच वाटले. अखेर पूज्य राधेमाँमध्ये आमच्या श्रद्धेला आमची उद्धारकर्ती दिसली. तर त्या महामातेमागे काही अश्रद्धांनी आरोपांची शुक्लकाष्ठे लावली. माणसाने कशी मिळवायची पापमुक्ती, कसा गाठायचा मोक्ष? अखेर खूप खूप शोधाअंती आम्हांस ईश्वरी दयेने पूज्य संत राम रहिम इन्साँ यांच्यात खरी माणुसकी गवसली. त्या ‘लव्ह चार्जर’ने आमची जीवनगुहा उजळून निघाली. आमच्या आयुष्याच्या सश्रद्ध चित्रपटाचे नायक ते. तर त्यांनाच काळोख्या कोठडीत पाठविण्यात आले. काय करायचे काय आम्हां पामरांनी अशा वेळी? दर वेळी कुठे कुठे शोधायचे नवनवे पूज्य पाय संतसज्जनांचे? अखेर आम्हांस रत्नांग्रीत झरेवाडीच्या मठात सापडले एक समर्थ संत. अगदी आखाडा परिषद मान्यताप्राप्त असे. म्हणजे परिषदेच्या भोंदू साधूंच्या यादीत नाव नसलेले. वाटले, याचा अर्थ हे खरे दैवी पुरुष. आम्हांस पापमुक्ती मिळणार ती यांच्याच चरणांची धूळ मस्तकी लावून. यांच्याच नामावलीने दोनशे पानी वह्य़ा भरून. तेव्हा आम्ही त्यांच्या चरणी साष्टांग लोटांगण घातले. अहाहा.. काय सांगावे त्या महाराजांचे कौतुक. काय वर्णाव्यात त्यांच्या लीला. कोणी काहीही म्हणो बरे का, साक्षात् राम रहिमांचे अवतारच आहेत ते. ते त्यांचे राजबिंडे रूप. शिवाय त्यांच्या मुखातून स्रवणारी ती एकेक गाली.. बाबा पूर्वी पोलिसांत होते. तेव्हा असणारच जिभेला ती सवय. परंतु ती गाली आता यायची ती मंत्र बनून. महिलांना तर किती लाडाने ती मंत्रावली देत ते. अवतारी पुरुषाची लक्षणेच ती. पण ते अश्रद्धांना पाहवले नाही. अटक केली त्यांना. पण या सरकारला आम्ही सांगून ठेवतो, तुम कितने राम रहिम पकडोगे? हर वाडीवस्ती से राम रहिम निकलेगा. कारण अखेर, आमच्या विकलांग मानसिकतेला त्यांचीच तर आवश्यकता आहे..