11 December 2017

News Flash

सरस्वतीपुत्राचे स्तुतिस्तोत्र..

विद्यापीठाची विद्वत्सभा म्हणजे साक्षात विद्यावाचस्पतींचा विचारमंच!

लोकसत्ता टीम | Updated: October 13, 2017 2:44 AM

विद्यापीठाची विद्वत्सभा म्हणजे साक्षात विद्यावाचस्पतींचा विचारमंच! या मंचावरून उधळली जाणारी विचारमौक्तिके कर्णसंपुटात साठविण्याच्या अट्टहासापायी आम्ही आमच्या कानांचे द्रोण करून किती तरी वेळा विद्वत्सभागृहाच्या भिंतींचे कोपरे झिजविले असले, तरी तेथील ध्वनिरोधक यंत्रणेमुळे आतले आत आणि बाहेरचे बाहेर असे नेहमीच होत असे. अशाच एका प्रसंगी, कानास काहीच लागत नसल्याच्या अनुभवाने निराश होऊनच आम्ही विद्यापीठाच्या आवारात निरुद्देश फेरफटका मारला असता अचानक आमचे लक्ष कुलगुरूंच्या कार्यालयाखाली पसरलेल्या कचऱ्यातील कागदाच्या ढिगाऱ्याकडे गेले, आणि ज्यासाठी आपण कर्णसंपुटे पणाला लावली, ते सारे नजरेच्या एका टप्प्यात आल्याच्या आनंदाने आम्ही जागच्या जागी उडय़ा मारून विद्यापीठाचा जयजयकारही केला. लगोलग त्यातील एक कागद उचलून एका कोपऱ्यात जाऊन चुरगळलेला तो मौल्यवान ठेवा हलक्या हातांनी उघडला.. क्षणात आमचे डोळे विस्फारले. हातापायांना आनंदातिरेकाचा कंप सुटला, मुखारविंद उभे त्रिखंड मावेल एवढे विस्फारले आणि धन्य नजरेने आम्ही तो कागद डोळ्यांखालून घालू लागलो. काही ओळी वाचल्यानंतर आम्हाला त्याचे मर्म उमगले. ते एक सन्मानपत्र होते. विद्याक्षेत्रात ऑनलाइन क्रांतीचा झेंडा रोवल्याबद्दल संजय देशमुख नामे आधुनिक क्रांतिवीराच्या कर्तबगारीवर स्तुतिसुमनांचा वर्षांव करणारे सन्मानपत्र! विद्यापीठाच्या उभ्या इतिहासावर आपल्या अगम्य कर्तबगारीची नाममुद्रा उमटविणाऱ्या, ज्यापायी असंख्य भविष्यांवर प्रश्नचिन्हे उमटली आणि ज्यावरून कुलपती नामक एका विश्वस्ताने कागदी घोडे नाचवून खरमरीतपणाचा मोठा आव आणला, त्या ऐतिहासिक कामगिरीचा गौरव करणारे, अभिनंदनाचा वर्षांव करणारे आणि जुन्या इतिहासावर मात करून नवा इतिहास रचल्याबद्दल ऋणनिर्देश करणारे सन्मानपत्र! विद्यापीठाच्या कीर्तीचा वेळू याआधी गगनावारी गेलाच होता, त्याआधीच्या इतिहासाची हृदयस्पंदने तर जवनिका आणि कर्णिकांना धडका देत, दाही दिशा भेदून पार गजांआडूनही धडधडू लागली होती.. आता त्याहीपुढे एक पाऊल टाकत, सर्वाधिक विद्यार्थ्यांना सर्वाधिक मनस्ताप देऊनही एक नवी प्रणाली विकसित करण्याच्या कीर्तिमान यशाचा एक नवा पोवाडा त्या मानपत्रावर उमटलेला होता. लेखणीच्या एका फटकाऱ्यात लाखो विद्यार्थ्यांना वेठीला धरण्याचे सामर्थ्य ज्या पदाला असते, त्या पदाचे ते एक साक्षात स्तुतिस्तोत्र होते. लाखो मुलांना मनस्ताप झाला तरी चालेल, पण व्यवस्था सुधारली पाहिजे, हा दूरगामी विचार देणाऱ्या सरस्वतीपुत्राचे हे स्तुतिस्तोत्र हाती धरूनच आम्ही आवारात नजर फिरविली. इमारतींच्या आडोशाने उभ्या असलेल्या असंख्य खिन्न नजरा कुलगुरूंच्या दालनावर खिळलेल्या होत्या. आम्ही वरूनच तो स्तुतिस्तोत्राचा कागद खाली सोडला. कुणी तरी तो उचलला, उघडला, वाचला, आणि पुन्हा चुरगळून त्याच कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकला. तेवढय़ात विद्वत्सभागृहाचे दरवाजे उघडले. आत त्याच स्तुतिस्तोत्राचे सामूहिक गायन सुरू होते!

First Published on October 13, 2017 2:43 am

Web Title: articles in marathi on university of mumbai vice chancellor sanjay deshmukh