17 December 2017

News Flash

यत्र नार्यस्तु…

आमच्या संस्कृतीत स्त्री जातीला पूज्य मानले जाते.

लोकसत्ता टीम | Updated: September 28, 2017 4:24 AM

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

जगभरातील स्त्री स्वत:च्या स्त्रीविश्वातून बाहेर पडून मेकअप आणि इयिरगच्या जागी स्टियिरगच्या गप्पा मारू लागल्या, आमच्याकडेही नारीहक्काच्या घोषणा दुमदुमू लागल्या. आम्हीही स्त्री जातीचा आदर करतो. आमच्या संस्कृतीत स्त्री जातीला पूज्य मानले जाते. स्त्री ही शक्तीचे प्रतीक आहे, असे आम्हीही उच्चरवाने जगाला सांगू लागलो. पण स्त्री ही अबला आहे, हेही आम्ही ठरविलेले होते. कारण त्यामुळेच तिच्या सबलीकरणाचे असंख्य प्रयोग राबवत आम्हाला राजकारणही करावे लागते. स्त्री हा आमच्याकडे आदराचा आणि विनोदाचाही विषय आहे. या बाबतीत आमचा खरा चेहरा कोणता आणि बुरखा कोणता हे जगाला ओळखूदेखील येणार नाही एवढय़ा सराईतपणे आम्ही वावरू शकत होतो. ‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते’ हा मंत्र आमच्या पिढय़ापिढय़ांना पाठ असतो, ‘महिला हक्क हाच मानवी हक्क’ असा नाराही आम्ही देत असतो. शनीच्या मंदिरात स्त्रियांना प्रवेशाची मुभा मिळाली, तेव्हा काही मने पुरुषी अहंकाराने दुखावली असली तरी सुधारणावादाच्या रेटय़ापुढे हात टेकून स्त्रीशक्तीच्या विजयाचे नारे त्यांनाही द्यावेच लागले होते. आपल्या हक्कासाठी प्रखर लढे देऊन आपण अबला नाही हे स्त्रियांनीच सिद्ध केले, तेव्हाच स्त्रीशक्तीच्या स्तुतीचा आवाज आमच्याकडे बुलंद झाला होता. जगाच्या कानाकोपऱ्यात सर्वत्र स्त्रीशक्तीचा आवाज असा दमदार होत असताना, स्त्रियांना पुरुषी पगडय़ाखाली ठेवणाऱ्या सौदी संस्कृतीलाही आता बदलाचे वारे थोपविता येणार नाहीत याची जाणीव झाली आहे. चार-पाच दिवसांपूर्वीच तेथील एका धर्मगुरूने स्त्रियांच्या मेंदूच्या आकाराचे मोजमाप घेऊन तो ‘पुरुषांच्या मेंदूच्या एकचतुर्थाश क्षमतेचा असतो’ असे त्याने जाहीर केले. स्त्रियांना मोटार चालविण्याचे परवाने न देण्याचे तेच कारण असल्याचा आरडाओरडाही केला आणि सौदीतील मोजका पुरुषी अहंकार सुखावला. पण त्यावर चार दिवसांतच पाणी पडले. सौदीतील स्त्रियांच्या मालकीच्या मोटारी आहेत, पण सार्वजनिक ठिकाणी मोटारी चालविण्याचे परवाने त्यांच्याकडे नाहीत. आता ते परवाने देण्याचा निर्णय सौदी राजघराण्याने घेतला आहे. वर्षांनुवर्षे हराम समजली जाणारी एक प्रथा प्रदीर्घ लढय़ामुळे हलाल झाली. सौदीतील ‘शोफर संस्कृती’ संपविण्याची ही एक सुरुवात आहे. सुशिक्षित असूनही तेथील जगाच्या समाजकारणात अजूनही ‘कुठेच नसलेल्या’ सौदी स्त्रियांनी या निर्णयामुळे आता किमान एकोणिसाव्या शतकात तरी पदार्पण केले आहे. आणखी काही शतकांनंतर सौदीतील ही स्त्री जगातील आजच्या महिलांच्या खांद्याला खांदा लावण्याएवढी सक्षम होणार आहे.. स्त्री-पुरुष समानतेचा दिवस जगाच्या माथ्यावर आलेला असताना, सौदीत आता या दिवसाची पहाट फुटू लागली आहे. सौदीतील स्त्रीवर्गाच्या वाटय़ाला आलेली एक लांबलचक रात्र संपून लवकरच उजाडेल अशी चिन्हे तरी आता दिसू लागली आहेत, आणि आपल्याकडे कधीचाच उजाडलेला हा दिवस मावळणार नाही याची काळजी आपल्याला घ्यावी लागणार आहे.

First Published on September 28, 2017 4:24 am

Web Title: articles in marathi on women empowerment