18 February 2019

News Flash

समस्या आणि चुटकीसरशी इलाज..

हस्ताक्षरास हसू नये असे लिहिण्याची वेळ हद्दपारच झाली.

( संग्रहीत छायाचित्र )

तो जुना, वीस-पंचवीस वर्षांपूर्वीचा काळ आठवतोय?.. ‘बुद्धिमंतांचे शस्त्र’ म्हणून लेखणीचा उल्लेख व्हायचा तो काळ! तेव्हा, पेनने कागदावर लिहिले जायचे. तेव्हा टपाल नावाचीदेखील एक व्यवस्था होती. खुशाली कळविण्याची, विशेष घडामोडींची माहिती देण्याची प्रथा कसोशीने पाळली जायची. त्यासाठी टपालाद्वारे पत्र पाठविले जायचे. ते स्वहस्ते लिहिले म्हणजे त्यात आपुलकी, जिव्हाळा उतरतो आणि दूरवरच्या वाचणाऱ्यालाही तो जाणवतो, असे वडीलधारी मंडळी सांगायची, म्हणून हस्ताक्षर अगदी कसेही असले, तरी स्वहस्ते पत्रे लिहिली जायची आणि लिहून झाल्यानंतर त्याकडे पाहताना, आपल्याच हस्ताक्षराची आपल्याला लाज वाटायची. मग त्याच अक्षरात तळटीप लिहिली जायची, ‘अक्षरास हसू नये!’.. पत्र वाचणाऱ्यालादेखील या भावना पोहोचायच्या आणि हस्ताक्षरास न हसता तो त्या पत्रातील भावना आपुलकीने वाचायचा. पुढे काळ बदलला. हस्ताक्षरास हसू नये असे लिहिण्याची वेळ हद्दपारच झाली. टपाल नावाची व्यवस्थाही संपली आणि ‘ज्या क्षणी लिहिले त्याच क्षणी वाचता आले’ अशी नवी व्यवस्था जन्माला आली. त्या काळी हस्ताक्षराची लाज वाटायची त्यांना या बदललेल्या काळाने दिलासा दिला. कोणत्याही फॉन्टमधून सुबक हस्ताक्षरात मनाजोगते लिहिण्याची ‘कळ व्यवस्था’ बोटाखाली नाचू लागली. पण चांगले लिहिण्यासाठी, विचारही समृद्ध हवेत, हे लक्षात यायला लागले आणि अशी काही व्यवस्था कधी आकाराला यावी याकडे अनेकांचे लक्ष लागले. समोर समस्यांचे डोंगर दिसताहेत, पण त्या सोडविण्याची क्षमता आपल्या मेंदूमधील तोकडय़ा बुद्धीकडे नाही ही जाणीव जेव्हा छळू लागते, तेव्हा अशा क्षमतेची निकड अधिक जाणवू लागते. सध्याची परिस्थिती काहीशी अशीच आहे. समस्या अमाप आहेत, दिवसागणिक फोफावतच आहेत.  समस्यांचा सामना करणे हीच एक समस्या होऊ  लागली असताना व त्यापुढे बुद्धी चालेनाशीच होत असताना, नवे काही तरी घडावे आणि समस्या चुटकीसरशी सोडविण्यास मदत करणारे साधन असावे यासाठी काही तल्लख मेंदू कामाला लागले आणि एक नवा आविष्कार उदयासही आला. सभोवतालच्या समस्यांची माहिती घेऊन, परिस्थितीचा अंदाज घेऊन त्या सोडविण्यासाठी योग्य ती बौद्धिक कृती करणारी यंत्रे आता तयार करण्यात आली आहेत. विविध क्षेत्रांतील संभाव्य समस्यांची संभाव्य उत्तरे, त्याची मीमांसा, उपाय आणि समस्या कायमच्या संपविण्याची साधने यांची सारी माहिती चुटकीसरशी उपलब्ध करून देणारी ही यंत्रे आता आपल्यालाही हाताळता येणार आहेत. कोणत्याही व्यवस्थेची खरी उपयुक्तता, त्या व्यवस्थेच्या खऱ्या गरजूलाच सर्वाधिक समजत असते असे म्हणतात. साहजिकच, या यंत्रांची उपयुक्तता आपल्यासाठी अधिक आहे, हे ओघानेच येते. मुंबई विद्यापीठाने ही गरज ओळखली आणि ‘कृत्रिम बुद्धिमत्ता केंद्र’च कलिना संकुलात सुरू करायचे ठरविले. पुढच्या आठवडय़ात त्याचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होईल. मग आपल्याला आपल्या तोकडय़ा बुद्धिमत्तेची कधीच लाज वाटणार नाही.. कोणत्याही समस्येवर जालीम उपाय काढणाऱ्या बंगाली बाबांची चलतीही बंद होणार का, हा खरा प्रश्न आहे..

First Published on February 13, 2018 1:40 am

Web Title: artificial intelligence center mumbai university kalina