काय, चाललंय काय? सारा जमाना डाव्यांचे उजवे होण्याचा असताना हे उजवे डावीकडे कसे झुकू  लागले. होय, आम्ही अनुपम खेरबद्दलच बोलतोय. काय, झालेय काय त्यांना? अचानकच डावा रूळ पकडलाय त्यांनी. १९८४ ला ते बोलून गेले होते सारांशमध्ये. ‘धिस कं ट्री हॅज नो फ्यूचर’ म्हणून. काय उद्वेग होता त्या वाक्यात. अनेकांच्या डोळ्यात पाणीच आले तेव्हा. आता ३७ वर्षानंतर त्यांच्या बोलण्यात तोच उद्वेग आहे. आता तुम्ही म्हणाल, कोणते खेर खरे! हे की ते. अहो, दोन्ही खरेच. शेवटी वास्तववादी जगणे ही भूमिकाच असते ना एक प्रकारची. मग तुम्ही विचाराल, मधल्या काळात ते उजवे झाले त्याचे काय? अरे बाबा त्याला वास्तववादी वळण म्हणतात. जे लोकप्रिय आहे त्याच्या बाजूने बोलणे किं वा उभे राहणे. म्हणूनच तर ते विश्वगुरूंची तारीफ करताना थकत नव्हते. त्यांच्यासारखा नेता नाही असे एका श्वासात सांगत होते. या देशाचे हित त्यांच्या हातीच सुरक्षित आहे असे ठासून बोलत होते. त्यांना आंबे चोखायला बोलावले नाही तरी त्याचा राग मनात न धरता नेत्याचे कौतुक करत होते. प्रोपगंडा म्हणून तयार करण्यात आलेला ‘अ‍ॅक्सिडेंटल प्राईममिनिस्टर’ हा सिनेमा लोकांनी धुडकावून लावला तरी गुरूवरची निष्ठा ढळू देत नव्हते. आता वास्तव बदलले. मग खेरांनी बदलायला नको का? बदलायलाच हवे, म्हणून तर गंगेतली प्रेते बघून त्यांचे अश्रू अनावर होत आहेत. लोक रुग्णशय्येसाठी झगडताना बघून त्यांचे मन द्रवते आहे. सरकार काहीच करत नाही म्हणून त्यांचा संताप अनावर झालाय. अगदी त्या सारांशमधल्या प्रसंगात झाला होता तसा. कठीण काळात प्रतिमासंवर्धन काय करता असा प्रश्न त्यांना पडू लागलाय. देशाची स्थिती दिवसेंदिवस खराब होत चालली म्हणून ते अस्वस्थ आहेत. ज्याच्यासाठी लोकांनी निवडून दिले ते होत नाही म्हणून ते नाराज झालेत.

आता तुम्ही म्हणाल की गेल्या अनेक दिवसांपासून हेच आक्षेप इतर लोक घेत होते, तेव्हा खेर त्यांच्यावर तुटून पडत होते. अहो, भूमिका बदलण्याचे ठोकताळे वेगवेगळे असतात प्रत्येकाचे. नसेल वाटले तेव्हा त्यांना त्यात काही गैर. पण आता वाटते ना! आधीच बिचारे आपले कलावंत भूमिका घेत नाहीत. मग खेरांनी घेतली तर खुसपटे कशाला?

तरीही समजले नसेल तर ही कथा ऐका. हिवाळ्याच्या दिवसांत अकबर व बिरबल शेतात फिरायला जातात. वांग्याची रोपे बघून अकबर म्हणतो, ‘वांग्याएवढी चवदार भाजी नाही’ बिरबल म्हणतो, ‘जगातली सुंदर भाजी हीच’ मग उन्हाळा येतो. एकदा अकबर भटारखान्यात उभा असताना एक सेवक वांगे घेऊन जात असतो. ते बघून अकबर ओरडतो, ‘नको ती घाणेरडी वांग्याची भाजी रोज रोज’ लगेच बिरबल म्हणतो, ‘वांग्यासारखी घाणेरडी भाजी नाही’ अकबर चकित होऊन त्याला म्हणतो, ‘अरे मागे तूच तर वांग्याची तारीफ करत होतास…’ तेव्हा बिरबल उत्तरतो, ‘मी तुमचा नोकर आहे, वांग्याचा नाही’!

आता या कथेचा संबंध खेरांशी जोडाल तर त्यांची बांधिलकी जनतेशी आहे की सरकारशी असा प्रश्न तुम्हाला नक्की पडेल. याचे उत्तर ज्याचे त्याने शोधावे! …किमान तोवर तरी खेरांच्या बदललेल्या भूमिकेचा आनंद घ्यायला काय हरकत आहे?