X

चाकू आणि चरखा..

पांढराशुभ्र सदरा-लेंगा, डोक्यावर गांधी टोपी घातलेला डॅडी आत आला आणि नम्रपणे हसून त्याने हात जोडले.

मध्यवर्ती कारागृहात सकाळपासूनच घाईगडबड सुरू होती. सभागृहात एका टेबलामागे गांधीजींची तसबीर हार घालून ठेवली होती. भजनाचे संथ सूर घुमत होते.. सारी तयारी झाली आणि बराकीतून कैदी येऊन समोर बसले. अधिकारीही आले आणि सारे जण ज्यांची वाट पाहात होते, त्यांचेही आगमन झाले. पांढराशुभ्र सदरा-लेंगा, डोक्यावर गांधी टोपी घातलेला डॅडी आत आला आणि नम्रपणे हसून त्याने हात जोडले. समोर बसलेल्या साऱ्या कैद्यांनी टाळ्यांनी त्याचे स्वागत केले, आणि पुढच्याच क्षणी साऱ्यांच्या नजरा विस्फारल्या. डॅडी, डॉन, भाई, तो हाच का, असे प्रश्नचिन्ह त्यांच्या चेहऱ्यावर उतरले होते. कार्यक्रम सुरू झाला आणि अधिकाऱ्यांनी गांधी टोपीवाल्या डॅडीचा सत्कार केला. आता तो गांधी टोपीवाला डॉन काय सांगणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. त्याचे भाषण सुरू झाले. नेहमीच्या सवयीनुसार त्याने अगोदर शर्टाच्या बाह्य़ा मागे ओढल्या, घसा खाकरला आणि भाषणास सुरुवात झाली.. ‘‘माझे सारे भाई लोग’’.. एवढे बोलून त्याने सभोवार नजर फिरविली आणि ताबडतोब दुरुस्ती केली. ‘‘माझ्या बांधवांनो, आजचा दिवस आपल्या लाइफमधला वेगळा दिवस आहे. काय समजलात.. कालपरवापर्यंत चाकू चालविणाऱ्या मला एकदा तुरुंगात या साहेबांनी चरखा चालवायला दिला आणि आता बास झालं, असा विचार माज्या मनात आला. बापूजी चरखा चालवायचे, हे मला त्या दिवशी कळालं. तोवर गांधीजींना मी फक्त नोटांवर पाहिलं होतं. नोट खरी की बनावट हे गांधीजींचं नोटेवरचं चित्र बघून मी ओळखून दाखवायचो. आम्ही मुंबईत भरपूर राडे केले, सुपाऱ्या वाजवल्या, राजकारण केलं.. साहेबांचं तर माझ्यावर प्रेम होतं. ‘तुमचा डी तर आमचा डॅडी’ असे ते जाहीरपणे सभेतून सांगायचे. तर, आमी जे काय करत होतो, ते गांधीसाठीच तर असायचं. रोज संध्याकाळला घरात किती गांधीजी आले याचा हिशेब मी मागायचो आणि कुणी हिशेब दिला नाही, तर त्याला ठोकायचं, हाच तर आमचा धंदा होता. काय समजलात?’’ एवढं बोलून भाई क्षणभर थांबले.. समोरच्या श्रोत्यांच्या चेहऱ्यावर कमालीचे कौतुक दिसत होते..  हीच वेळ आहे, हे भाईने ओळखले आणि भाषणाचा सारा सूरच पालटला.. ‘‘पन, भाई लोग, गादीखाली ढिगानं गांधीजी असले, तरी रात्री झोप लागायची न्हाई.. कधी कोण तरी कुठून तरी येऊन टपकवेल याचा भरोसा वाटत नव्हता.. नोटांवरच्या गांधीच्या धंद्यापायीच तर हितं आलो, आणि भितीवरचा ह्य़ो गांधीबाबा दिसला.. चरखा सापडला.. संध्याकाळी भजन लागलं, की  ह्य़ो गांधी काय तरी वेगळा आहे, हे कळायला लागलं.. मग मी बापूजींची पुस्तकं वाचली.. बापूंनी एका पुस्तकात म्हटलं होतं की, असं जगा की तुम्ही उद्याच मरणार आहात. असे काय तरी शिका, की तुम्ही कायमच जिवंत राहणार आहात..

आमी तर तसंच जगत होतो; पण बापू सांगतात ते वेगळं आहे, हे मला इथे आल्यावर कळालं. भाई लोग, स्वत: मेल्याशिवाय स्वर्ग कळत न्हाई, तसं, आपल्या धंद्यातल्या लोकांना तुरुंगात आल्याशिवाय गांधी कळत न्हाई.. आपन तर आख्खी जिंदगी गांधीजींच्या कमाईसाठी घालवली, पण खरा गांधी इथे कळला..’’ एवढे बोलून डॅडीने गांधीजींच्या फोटोला नमस्कार केला आणि पुन्हा भजनाचे सूर सभागृहात सुरू झाले..