अरिवद केजरीवाल हे या देशातील एक थोर थोर गृहस्थ आहेत. त्यांच्याइतका थोरपणा या भरतभूने मोहनदास करमचंद ऊर्फ महात्मा गांधी यांच्यानंतर आजतागायत पाहिलेला नाही. मराठीतील दुसरे थोरथोर संपादक आचार्य प्रल्हाद केशव अत्रे आम्हा बोरूबहाद्दरांऐवजी आजच्या काळात लिहिते असते तर गेल्या १० हजार वर्षांत केजरीवाल यांच्याइतका महान गृहस्थ या देशात झाला नाही, असे म्हणून गेले असते. बिचारे अत्रे. त्यांच्या नशिबी हे महान व्यक्तिमत्त्व पाहणे नव्हते. असो. तर केजरीवाल यांना थोर ठरविले जावे याची कारणे अनेक. यात अण्णा हजारे यांच्यासारख्यांना त्यांनी टोपी घातली हे कारण  नाही हे आधी स्पष्ट केलेले बरे. मुळात अण्णा यांना टोपी घालणे हे तसे थोर कामच नव्हे. कारण अशीही अण्णांना टोपी आवडतेच. टोपीशिवाय अण्णा म्हणजे कवचकुंडलांशिवाय राधेय. ती त्यांच्या अस्तित्वाचाच भाग आहे. तेव्हा अण्णांचे अवतारकार्यच टोपी घालून घेण्यासाठी आहे, हे विसरता येणार नाही. स्वर्गवासी विलासराव देशमुख ते विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशा अनेकांनी अण्णांना टोप्या घातल्या. तेव्हा केजरीवाल यांनीही अण्णांना टोपी घातली याचे अप्रूप का बरे? या प्रश्नाचे उत्तर असे की अण्णांना टोप्या घालणारे अन्य हे सर्व विरोधी पक्षातले होते. म्हणजे समोरच्या बाजूचे. पण केजरीवाल यांचे तसे नाही. ते अण्णांच्याच बाजूचे. अगदी भ्रष्टाचार निर्मूलनार्थ निघालेल्या अण्णा या रामाचे ते जणू हनुमानच. अण्णांनी बिचाऱ्यांनी या हनुमानाच्या जिवावर किती इमले रचले. हा देश भ्रष्टाचारमुक्त होईल, गेलाबाजार लोकपाल तरी आणला जाईल आणि मग सारे जग आपणास दुवा देण्यासाठी राळेगण िशदीस येईल. पण कसचे काय! अण्णांनी ज्यांच्याविरोधात जंग पुकारली त्यांनाच की हो केजरीवाल जाऊन मिळाले, एवढेच नव्हे तर त्यांनी राजकीय पक्षही काढला, निवडणुकाही लढवल्या अणि थेट मुख्यमंत्रीही झाले की ते. भ्रष्ट व्यवस्था सुशोभीकरणाचा नारा दिला अण्णांनी. आणि त्या महिरपीत मानाने जाऊन बसले ते केजरीवाल. हे असे सोपे असते की काय? अण्णांना स्वप्नातदेखील जे शक्य झाले नसते ते या पठ्ठय़ाने प्रत्यक्षात करून दाखवले. तेदेखील अण्णांच्याच मार्गाने.

हा मार्ग म्हणजे या पृथ्वीतलावर आपण सोडून सारे जग हेच कसे भ्रष्ट आहे हे सांगण्याचा. ते सांगायचे म्हणजे इतरांवर चिखलफेक  करणे आलेच. आणि चिखलफेक ही  नेहमीच दिलखेचक असते. आपल्या देशात भ्रष्टाचार आरोपाचा चिखल ज्याच्यावर फेकला जातो  त्याने कितीही डोके आपटले तरी एकवेळ डोके फुटेल पण आरोपाचा डाग काही जाणार नाही. असे आरोपास्त्र-प्रवीण विश्वनाथ प्रताप सिंग हे केजरीवाल यांचे परात्पर गुरू शोभावेत. असो. तर आरोप करायचे.  समोरच्याला घायाळ करायचे आणि तो घायाळ झाला की हळूच  त्याची माफी मागून मोकळे व्हायचे. अरुण जेटली, कपिल सिबल, नीतीन गडकरी. किती हे माफीनामे. न जाणो उद्या नरेंद्र मोदी यांचीदेखील ते माफी मागतील आणि भाजपच्या वळचणीखाली जातील. काय  सांगावे?कारण त्यांचा पक्ष म्हणजे आपला संवाद आपणाशी असेच तर आहे.