अरेरे! या देशाने एक मोठी शैक्षणिक संधी गमावली. शाळांतील, विद्यापीठांतील, स्पर्धा परीक्षेच्या शिकवणी वर्गातील कोटय़वधी विद्यार्थ्यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले. केवळ त्यांचेच नव्हे, तर त्यांच्या पालकांचेही. एका रोमांचकारी अशा शैक्षणिक मनोरंजनास ते मुकले. केवळ शैक्षणिकच नव्हे, तर राजकीय क्षेत्राचीही प्रचंड हानी झाली. लोकशाही म्हणजे काय, ती दिसते कशी, चालते कशी, बोलते कशी असे एक समग्र चित्र या भारतदेशी उभे राहणार होते. परंतु उमटण्याआधीच त्याच्या रेषा पुसल्या गेल्या. एक इतिहास घडता घडता राहिला. कल्पना करा, तिकडे हिलरी क्िंलटन कातावून बोलत आहेत. डोनाल्ड ट्रम्प त्यांना मागून शब्दढुशा देत आहेत. दूरचित्रवाणीवरून अवघा देश हा कार्यक्रम पाहात आहे. त्यातून  शिकत आहे. त्यासरशी हिलरी आणि ट्रम्प यांचे मताधिक्य कमी-जास्त होत आहे. अहाहा! लोकशाहीचा हा किती भव्यदिव्य प्रयोग. परंतु तो अमेरिकेतला. समजा, हाच खेळ आपल्या भारतदेशी झाला तर? वाचकहो, झाला तर नव्हे, झालाच असता. सगळी तयारी झाली होती. एकीकडून भारताचे स्वयंघोषित लोकपाल आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि दुसरीकडून काँग्रेसचे पंजाबातील नेते कॅप्टन अमरिंदरसिंग असा शक्तीतुऱ्याचा – माफ करा, वादविवादाचा कार्यक्रम अगदी होणारच होता. ट्विटर हे त्यासाठीचे एक सभ्य, सुसंस्कृत व्यासपीठ. त्यावरून सोमवारी दुपारच्या सुमारास केजरीवाल आणि अमरिंदरसिंग यांची छान सभ्य, सुसंस्कृत चर्चा रंगली. ती सभ्यच होती, त्यातील आरोपही चिखलशुद्ध होते यात शंकाच नाही. हीच चर्चा आपण पुढे जाहीर व्यासपीठावर नेऊ या असे एका क्षणी कॅप्टनसाहेबांना वाटले. वाटण्याचा तो क्षण फार महत्त्वाचा होता. त्या एका क्षणाने भारतीय लोकशाहीच्या इतिहासात डिबेटयुग सुरू झाले असते. आता अशा वादचर्चेला केजरीवालांची कधीही ना नसते. अण्णाजी, बेदीजी, प्रशांतजी अशा अनेकांना ते चांगलेच माहीत आहे. तेव्हा केजरीवालही नेकी और पूछ पूछ म्हणत तयार झाले. यानिमित्ताने आपण एक पारदर्शी लोकपाली लोकशाही कशी असते हे जगाला दाखवू आणि मग नंतर त्याची जाहिरात सर्व पेपरांतून छापून आणू असेही त्यांच्या मनात असणार. पण क्षणात त्यांना वाटले, आपण चर्चा करावी ती आपल्या बरोबरीच्या लोकांबरोबरच.. उदाहरणार्थ मोदी, सोनिया! हे कोण कॅप्टन अमरिंदरसिंग? असे नकोच. बान की मून, डोनाल्ड ट्रम्प हेच खरे आपले प्रतिस्पर्धी असू शकतात. तरीही भारतीय लोकशाहीच्या भल्यासाठी त्यांनी वादास होकार दिला. पण तितक्यात त्यांना आठवले, की हाय रे कर्मा! आपण यावर अजून जनमत चाचणी घेतलेलीच नाही. तेव्हा आपण कसे चर्चेत सहभागी होणार?.. वाचकहो, आणि अशा प्रकारे एका ऐतिहासिक संधीस आपण सारेच मुकलो आहोत.