21 October 2018

News Flash

वाऱ्यावरची वरात..

पुण्याच्या भांडारकर रोडवर मालती-माधव अपार्टमेंटमध्ये घुसून चोरटय़ांनी पुन्हा ते घर फोडले

पुण्याच्या भांडारकर रोडवर मालती-माधव अपार्टमेंटमध्ये घुसून चोरटय़ांनी पुन्हा ते घर फोडले आणि ‘एका फसलेल्या दरोडय़ा’ची बातमी ‘वाऱ्यावरची वरात’ होऊन घरोघरी पसरली. शब्दांपलीकडच्या जगात असूनही भाईंच्या कानावर ती बातमी सकाळी पोहोचलीच आणि सुनीताबाईंना ती सांगत भाई गालात हसले. चष्म्याआड त्यांचे डोळे किंचित चमकले. ‘आपल्या रिकाम्या फ्लॅटमध्ये घुसलेल्या चोरांची आपल्याशी गाठ पडली असती तर?’ असा एक विचार त्यांच्या मनात आला आणि पूर्वी सहसा न हाताळलेली फॅण्टसी पुलंच्या मनात आकार घेऊ  लागली.. ‘एका मराठी लेखकाच्या घरी दरोडा घालण्याचा घाट घातला जातोय म्हणजे मराठी साहित्याला आता बरे दिवस येऊ  लागले आहेत’.. भाई स्वत:शीच पुटपुटले. ‘‘आपण  तिथे असतो तर, एवढय़ा रात्री, शेजाऱ्यांना त्रासदेखील होणार नाही याची काळजी घेत आवाजही न करता घरात आलेल्या या पाहुण्याचा नक्कीच सन्मान केला असता, नाही का?’’.. भाईंनी सुनीताबाईंना विचारले. सुनीताबाईंनी भुवया उंचावूनच ‘कसा?’ असा प्रश्न केला. ‘‘एवढय़ा सभ्यपणे आजकाल कुणी कुणाकडे जातात का? दिवसाढवळ्या दरोडा घालायला ते काही राजकारणी नव्हेत.. अमावास्येच्या अंधारात, जीव धोक्यात घालून घरात घुसलेल्या त्या चोरामुळे मराठी साहित्यविश्वाचा केवढा सन्मान झाला आहे, माहिताय का तुम्हाला? शिवाय, ‘साहित्यिकाच्या घरी चोरी’ ही वृत्तपत्रांची मोठय़ा मथळ्याची बातमी होते ते वेगळेच. मराठी लेखकास अशा चोरीचा फारसा पूर्वानुभव नसायचा.. कधी झालेच, तर वाङ्मयचौर्याचे गुपचूप प्रकार घडणार, अशीच साऱ्यांची समजूत असायची.. पण दिवस किती झपाटय़ाने बदलतायत ना? लेखकाच्या घरातही काही चोरण्याजोगे सापडेल असा विचार आजकाल चोरांची जमात करू लागलीय. मराठी लेखनसृष्टीचे दिवस नक्कीच पालटतायत.. आमच्या बटाटय़ाच्या चाळीत कधीमधी चोरीची चर्चा व्हायची, पण हृदयचोरीच्या घटना जास्त. त्याची कधी कुणी पोलिसात कम्प्लेन्ट करत नसे. या घरात चोरण्यासारखं काही नसणार हे चोरांनाही तेव्हा ठाऊक असायचे. म्हणून अशा चोरीनंतर पुढे काय करायचे याचाही आम्हाला अनुभव नव्हता.. परवा त्या चोराला कपाटात चोरण्यासारखं काहीच सापडलं नाही म्हणे..  मग ती हस्तलिखितं, ती पत्रं म्हणजे काय केवळ कागदाचे तुकडे राहिले की काय? किती आदबीनं जपून ठेवलं होतं तुम्ही ते.. तुम्ही म्हणायचात, भाई, या कागदांना सोन्याची किंमत आहे..  म्हणून कपाटं भरून गेली त्या कागदांनी. तेव्हा डिजिटलायझेशनची सोय असती आणि दोनचार पेन ड्राइव्हांत साठवून ठेवलं असतं, तर त्या बिचाऱ्या चोराला कपाटं उपसायचेही कष्ट घ्यायला लागले नसते.. तरी बरं झालं. चोरानं सगळी कागदपत्रं उचकटली म्हणून आता ती कपाटं तरी पुन्हा नीट लावून ठेवतील कुणी तरी. एवढय़ासाठी तरी, पोलिसांना जर तो चोर सापडलाच तर त्याला चहापाणी तरी द्या बुवा!’’

First Published on December 21, 2017 3:15 am

Web Title: attempt to burgle apartment of marathi litterateur p l deshpande in pune