दिवस उन्हाळी सुट्टय़ांचे आहेत त्यावरून आठवले.. दर सुट्टीत आम्ही मुले आणि मोठी माणसे दुपारभर पत्त्याचा डाव मांडत असू- आपल्याकडील हुकमाचे पान कोणते, हे कोणीही काही केल्या दुसऱ्याला समजून देत नसे त्या काळी!! हे सारे ज्या पुरोगामी महाराष्ट्रात घडत असे, त्या राज्यापेक्षाही अमेरिका नामक महासत्ता काहीशी प्रगतच आहे असे समजावयास हवे.. तेथील राष्ट्राध्यक्ष कोणी एक बराक ओबामा म्हणून आहेत, ते गेल्या पाचेक वर्षांत पत्ते हातात नसतानाच ‘हुकमाचा पत्ता दडवण्या’चा खेळ खेळू लागले. वास्तविक याच ओबामांनी सत्तापदी आल्या आल्या- म्हणजे २००९ सालात इतक्यांदा आणि इतक्या देशांची माफी मागितली होती, ‘माफी मागून टाकणे’ हाच त्यांच्या हातातील हुकमाचा पत्ता असल्याचा सुगावा आम्हांस लागला होता. ‘आम्ही कधीकधी चुकतो’ अशा शब्दांत २७ जानेवारी २००९ या तारखेस मुस्लीम जगताची माफी मागितली आणि पुढल्या अवघ्या सहामाहीत दहा माफ्या त्यांनी मागितल्या.. ‘वॉर ऑन टेरर’ हा ओबामांच्या आधीचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश यांचा हुकमाचा पत्ता चुकलाच होता, असे ओबामांनी २१ मे २००९ रोजी जाहीरपणे कबूल केले. अमेरिका ‘उर्मटपणे वागते’ म्हणून फ्रान्स आणि ब्रिटनपुढे नरमाईचा सूर, ‘इतिहासात बरेच काळे कालखंड आहेत’ म्हणून तुर्कस्तानी जनतेपुढे दिलगिरी, ‘नव्याने नाती जोडू’ असे जी-२० या राष्ट्रगटापुढे सांगताना पुन्हा ‘अमेरिकेलाही झुकावे लागेल’ अशी छुप्या माफीची बंद तोंडाची तान आणि ‘हुआन्तानामो बे येथील तुरुंग म्हणजे आमच्या मूल्यांचा त्यागच’ असा थेट लोटांगणाचा ढाल्या आवाज अशी या माफीची विविध रूपे जगाने पाहिली.. मुद्दा हा की, ती रूपे पाहूनही जगाला ‘हुकमाचे पान’ समजलेच नाही. या जागतिक असमंजसपणाचा परिणाम हा की, त्याच वर्षी ओबामा शांततेचा नोबेल पुरस्कार घेऊन गेले. मग पुढली सहा वर्षे अमेरिकेने कोणतेही नवे युद्ध केले नाही हे खरे, त्यामुळे हुकूम वापरून दुसऱ्या देशाचे हात स्वतकडे घेण्याची संधीच ओबामांना मिळेना हेही खरे. पण क्युबासारख्या एकेकाळी अमेरिकेनेच पुंड मानलेल्या देशाशी नाते जोडताना ओबामांनी पुन्हा हे हुकमी पान काढलेच. आता येत्या २१ मेपासून म्हणे ओबामा व्हिएतनाम आणि जपानच्या- तेथेही हिरोशिमा शहराच्या – भेटीस जाणार आहेत! ज्या हिरोशिमाला अमेरिकेने ६ ऑगस्ट १९४५ या दिवशी बेचिराख केले आणि ज्या व्हिएतनाममध्ये ‘नापाम बॉम्ब’सारखी संहारक रासायनिक अस्त्रे वापरली, त्याच शहरात आणि त्याच देशात ओबामा जाणार म्हणजे तेथे ते काय करणार, हे वेगळे सांगायला नकोच. ओबामाविरोधी रिपब्लिकन पक्षाकडून राष्ट्राध्यक्षपदासाठी अद्याप धड उमेदवारीसुद्धा न मिळालेल्या डोनाल्ड ट्रम्पनाही ते चांगलेच कळले आणि त्यांच्या समर्थक प्रसारमाध्यमांनी ‘माफीखोर ओबामा’ असा प्रचार सुरू केला. इतका की, अखेर ताज्या बातमीनुसार- व्हाइट हाऊसच्या प्रवक्त्याने ‘ओबामा हिरोशिमा बॉम्बफेकीबद्दल माफी मागणार नाहीत’ असे स्पष्टीकरण दिले आहे. ओबामांकडे हुकमी पान असेल; पण ओबामांनाही हुकूम देणारा पत्ता ‘व्हाइट हाऊस, वॉशिंग्टन’ हाच आहे, हेही आम्हीच सांगायला हवे का?