काही काही व्यक्ती त्यांच्या भलत्याच कृतींसाठी जनमानसांत आदरांस प्राप्त होत असतात. म्हणजे हल्लीच्या काळात मोबाइल किंवा संगणक आणि इंटरनेट न वापरणारे अधिक वरच्या दर्जाचे वाटू लागतात. अशी आधुनिक आयुधे उपयोगात आणून आपले चित्त विचलीत होऊ न देण्याएवढी स्थितप्रज्ञता अंगी बाणवणे तसे कठीणच. परंतु त्याचेच अवडंबर माजवून आपली श्रेष्ठता सिद्ध करण्याची आवश्यकता रा.रा. संत भालचंद्रपंत नेमाडे यांना असण्याचे अजिबातच कारण नाही. एक तर त्यांनी आयुष्यभर जी साहित्यसेवा केली आहे, तिने अवघा महाराष्ट्र दिपून गेला आहे. अशी असामान्य प्रतिभा असणाऱ्यांना समाज संतच मानीत आला असल्याने, त्यांची कोणतीही कृती आदरास पात्र ठरणे स्वाभाविकच ठरते. संत नेमाडे यांनी फार पूर्वीपासून, म्हणजे मोबाइल, संगणक, फेसबुक, ट्विटर यांसारखी चहाटळपणास वाव देणारी आधुनिक साधने अस्तित्वात येण्यापूर्वीपासूनच वृत्तपत्रांचे वाचन हा एक खुळा उद्योग असल्याचे मत व्यक्त केले होते. तेव्हापासून महाराष्ट्रातील तमाम बुद्धिमंत आणि विचारवंतांची मोठीच पंचाईत होऊन बसली आहे. घरी रोजच्या रोज येणारे वृत्तपत्र लपवून ठेवावे किंवा कसे, असाही प्रश्न त्यांना पडू लागला. शिवाय वृत्तपत्रांत वाचनायोग्य असे असते तरी काय, असा प्रश्न उपस्थित करण्यासाठी ती वाचलीच पाहिजेत, असे काही नाही, असेही संत नेमाडे यांनी म्हणून ठेवल्याने या साऱ्यांची फारच पंचाईत झालेली. संत नेमाडे यांनी वृत्तपत्राबाबतची आपली भूमिका न सोडण्याचे घेतलेले व्रत आजतागायत पाळल्यामुळे आणि तरीही त्याबाबत अधिक छातीठोकपणे टिप्पणी करत आल्यामुळे मराठी विचारवंतांच्या जगात आता तीच एक ‘फॅशन’ बनून राहिली आहे. त्यातून संत असलेल्या नेमाडय़ांनी सर्वधर्मसमभावी असलेल्या विट्ठलाचे रूप पांघरलेल्या पांडुरंग सांगवीकरांस गेल्या पाच दशकांत कोठच्या कोठे नेऊन ठेवलेले. बाबा भांड यांच्यासारख्या साहित्यिकाच्या साहित्यबाह्य़ वर्तनाबद्दल वृत्तपत्रांतून जाहीर टीका झाली, तेव्हा ती संत नेमाडे यांनी वाचलेली असण्याचे कारणच नव्हते. तरीही भांड यांच्या समर्थनार्थ त्यांनी वृत्तपत्रांवर दुगाण्या झाडण्याची संधी मात्र दवडली नाही. मराठी संस्कृती संकुचित होण्यास वृत्तपत्रे आणि त्यातील बातम्यांवर अधिक प्रेम कारणीभूत असल्याचे सांगत असतानाच तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या चिरंजीवांच्या व्यसनाधीनतेचा खर्च विश्वकोशाच्या निधीतून होत होता, असा आरोप त्यांनी ठोकून दिला. वर या बातम्या त्या काळातील विचारवंत संपादकांनी का छापल्या नाहीत, असा सवालही केला. जे संत नेमाडे वृत्तपत्रच वाचीत नाहीत, त्यांना तेथे काय प्रसिद्ध होते हे कसे काय बुवा कळले, असे प्रश्न अशावेळी कुचकामी असतात, हे नेमाडपंथी वाचकांना कळून चुकलेले असते. बरे टीकेचा विषय असणारे सारेचजण विशिष्ट वर्गातील होते आणि त्यामुळेच त्यांनी अशी कृती केली किंवा केली नाही, असे अस्पष्टपणे सांगण्याची संत नेमाडे यांना काय गरज. ज्याने त्याने ती ओळखून घ्यावी आणि त्याचे अनेकार्थ शोधीत बसावे. संत नेमाडे यांचा जयजयकार करणाऱ्यांना किमान हे तरी कळावे की, त्यावेळी कोणीतरी चूक केली होती तेव्हा मात्र बभ्रा झाला नव्हता, असे ठासून म्हणण्यात आत्ताच्याही चुकांची वाच्यता नको, इतकाच मतलब उरतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व उलटा चष्मा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhalchandra nemade
First published on: 11-04-2016 at 02:57 IST