कायमच सर्वाना छळत असलेला प्रश्न वारंवार अधिक गडद का होतो?.. ज्याला काहीसे घाबरून त्यापासून दूर पळतो, तोच प्रश्न आपला पाठलाग का करतो.. आणि कधी सापडतच नाही, त्या उत्तराच्या मागे का लागतो? हे कोणते कोडे आहे? ते आपल्याशी पाठशिवणीचा खेळ का खेळत असते, त्या खेळाची किंमत अनपेक्षितपणे कुणा भलत्यालाच का मोजावी लागते?.. सारेच प्रश्न अनाकलनीय, गूढ आहेत. त्यांचा ससेमिरा संपतच नाही. १२ वर्षांपूर्वी मुंबईत प्रलय झाला, तेव्हा अनेक चालतीबोलती माणसे एखाद्या गूढासारखी कुठल्यातरी मॅनहोलच्या उघडय़ा झाकणातून ओढली गेली आणि बघताबघता जिवंत जिवांचा भूतकाळच होऊन गेला. जगणे तर महाग झालेलेच आहे, पण मरण स्वस्त होणे हा त्या महागाईवरचा उतारा नव्हे हे माहीत असतानाही, तीच गोष्ट वास्तव म्हणून आपल्या माथी मारली गेली आहे. आपण ती नाइलाजाने स्वीकारलीच आहे. दोन दिवसांपूर्वी मुंबईच्या भांडुप उपनगरात सार्वजनिक शौचालय खचले. सरकारी किंवा सार्वजनिक बांधकामांचा दर्जा सर्वानाच माहीत असल्याने, सार्वजनिक शौचालय खचले यात आश्चर्य नाही. पण या दुर्दशेमुळे दोन जीव अनपेक्षितपणे काळाच्या पडद्याआड गेले. त्यांचे अस्तित्व एका क्षणात पुसलेच गेले. जगणे आणि मरणे यांच्यातील सीमारेषा धूसर, अस्पष्ट असते असे म्हणतात. ते खरेच असले, तरी एखाद्या आयुष्यातील ही सीमारेषा अशी अनपेक्षितासारखी पुसली जावी हे अनाकलनीयच! भांडुपमधील पाटीलवाडी चाळीच्या शौचालयाचा पाया एका सकाळी अचानक खचला आणि शौचालय होत्याचे नव्हते झालेच, पण त्या दुर्घटनेने दोन जिवांचा बळी घेतला. जगण्याच्या धडपडीत असंख्य समस्यांचा सामना करताना आला दिवस सुखरूप पार पडला की, दिवसाचे सार्थक झाल्याच्या भावनेने अंथरुणावर पहुडल्यावर नवे स्वप्न मनाच्या कोपऱ्यात साठवून दुसऱ्या, नव्या दिवसाला सामोरे जाण्याची तयारी करावी आणि अनपेक्षितपणे पुढचे सारे क्षण पुसून टाकले जावेत, आयुष्याचा भूतकाळ होऊन जावा, हा प्रकार भीषण आहे. क्षणभंगुरत्वाचा साक्षात्कार म्हणतात तो हाच असावा. खरे तर, आयुष्याच्या प्रत्येक नव्या दिवसाचा टप्पा नव्या स्वप्नांनी सजवावा अशा उमेदीने प्रत्येकाचाच नवा दिवस उजाडत असतो. ती स्वप्ने सोबत घेऊनच जगणे सोपे करण्याची धडपड करताना अचानक मरणानेच झडप घालून केवळ स्वप्नेच नव्हे, तर स्वप्ने पाहणारा जीवच गिळंकृत केला, तर नियतीसाठी केवळ क्रूर एवढेच विशेषण लागू पडते. रस्ते, रेल्वेमार्गावर याच नियतीच्या आडोशाला, मृत्यू दबा धरून बसलेलाच असतो. पण अगदी शौचालयात, मॅनहोलमध्ये, झाडावरच्या एखाद्या नारळात, फांदीतदेखील तो लपलेला असतो आणि कोणत्याही क्षणी कोणासही आपल्या कवेत कवटाळतो, हे पाहिले की जगणे महाग झाले आणि मरण झाले स्वस्त हेच खरे आहे याची खात्री पटते. मृत्यूच्या अशा लपंडावाच्या हौसेपायी जगण्याचे सारे क्षणही अनेकांच्या वाटय़ाला येतच नाहीत. कुणी जन्मापासूनच कुपोषणासारख्या समस्येशी झुंज झुंज खंगत मरणापुढे गुडघे टेकतो, तर कुणी आरोग्याची हेळसांड झाल्याने अखेरचा श्वास घेतो.. चहूबाजूंना असा भयाचा विळखा पडलेला असताना, आपण मात्र असाहाय्यपणे, दुर्घटनांच्या दु:खाचे ओझे मनावर पेलत आला दिवस ढकलून उद्याच्या स्वप्नांना आकार देण्याची केविलवाणी धडपड करतच असतो, आणि त्यालाच, जीवन ऐसे नाव देतो.. मरण अटळ असते हे खरेच आहे. ते आपल्या हातात नसते हेही खरेच आहे. पण सुखाचे जगणे शक्य नसेल, तर मरण तरी असे दुर्दैवी येणार नाही यासाठी कुणी काहीतरी केले पाहिजे, एवढे स्वप्न घेऊन जगणे मात्र आपल्याला शक्य आहे.