एवढी मोठी फिल्म इंडस्ट्री, पण आहे का कुणी तिथे स्वत:च्या टॅक्सचे स्लॅब जाहीरपणे सांगणारा? सारेच लपवाछपवी करतात तिथे. मग स्वत:च्या कराविषयी जाहीरपणे बोलणाऱ्या कंगनाचे कौतुक नको का करायला? यालाच प्रामाणिकपणा म्हणतात. देशभक्तांसाठी आवश्यक असलेला हाच तो गुण. इंडस्ट्रीतल्या साऱ्यांशी तिने पंगा घेतला. कशासाठी? देशाच्या भल्यासाठीच ना! त्याची जबर किंमत तिला सध्या मोजावी लागतेय. तिला कुणी काम द्यायला तयार नाही. मग तिच्याकडे पैसे कुठून येणार? प्रवाहाविरुद्ध पोहणे सोपे नाही. तरीही सारी लढाई एकटीच्या बळावर लढतेय ती. सरकारने काय दिले तर फक्त सुरक्षा. पण म्हणे, त्यातल्या लोकांच्या चहापाण्याचा खर्च तिलाच करावा लागतो. ‘गरिबी में गिला आटा’ म्हणतात ते हेच. साऱ्यांशी वाईटपणा घेऊन, सर्वांबद्दल तक्रारी करून स्वबळावर उभी राहण्याचा प्रयत्न करतेच आहे की ती. अशा वेळी तिच्या वक्तव्याची खिल्ली न उडवता तिच्यामागे ठामपणे उभे राहण्याची गरज आहे. ते करायचे सोडून तिलाच त्रास देतात एकजात सारे राष्ट्रद्रोही. इंडस्ट्रीत काम मिळेनासे झाले म्हणून तिने ४० पैसे प्रतिट्वीटचा व्यवसाय स्वीकारला, राजकीय वक्तव्ये सुरू केली, ४० टक्के कर व ४० पैसे यांचा जवळचा संबंध आहे वगैरे वगैरे. एका स्त्रीला एवढे छळायचे? स्पष्ट व परखड बोलणाऱ्यांना नेहमी संकटाला सामोरे जावे लागते. कंगनाचीही तशीच कोंडी केली साऱ्यांनी. तरीही न डगमगता ती उभी राहण्याचा प्रयत्न करत असेल, एक सच्ची भक्त म्हणून साऱ्या गोष्टी जनतेशी शेअर करत असेल तर तिच्या पाठीशी उभे राहणे हे प्रत्येकाचे कर्तव्यच की नाही? आर्थिक संकटात असूनही ती कर चुकवते असे चुकूनही म्हणत नाही. पैसे आले की भरणार यावर ती ठाम आहे. तिचे हे मोठेपण लक्षात घ्यायला हवे.

तिला काम व त्यातून पैसे मिळावे म्हणून सरकारने इंडस्ट्रीवर दबाव टाकायला हवा हे भक्तांचे म्हणणेही चूकच. अशी मदत घेण्याचा तिचा स्वभाव नाही. पहाडी लोक फार स्वाभिमानी असतात. मूल्यांसाठी कोणतीही किंमत चुकवायला तयार असतात. कंगना अगदी तशीच आहे. म्हणून तर एकटीच्या बळावर इंदिरा गांधींवर सिनेमा करतेय ती. बघा कसा धो धो चालेल तो चित्रपट. सारे पैसे वसूल होतील तिचे व सरकारच्या कराचेसुद्धा. लढाईत हार मानणारी किंवा दिवस फिरले म्हणून बाजू बदलणारी कच्ची भक्त नाही ती. अशा भक्तांच्या पाठीशी किमान सरकारने तरी ठामपणे उभे राहायला हवे. भले तशी इच्छा तिने बोलून दाखवली नसली तरी. शेवटी भक्त आहे म्हणून सरकार आहे हे ध्यानात घ्यायला हवे. ‘एखादे वर्ष कर भरलाच नाही तरी चालेल पण कंगना तू तुझा लढा सुरू ठेव, आमचा भक्कम पाठिंबा आहे,’ अशा स्पष्ट शब्दांत तिची पाठराखण व्हायला हवी. ‘आज नाही तरी २०२४ नंतर हीच इंडस्ट्री तुझ्या पायाशी लोळण घेईल. तूच खरी होतीस अशी कबुली देईल,’ या शब्दात तिला धीर द्यायला हवा. आपली माणसे सरकारने सांभाळायचीच असतात. एवढे करूनही इंडस्ट्री वाकायला तयार नसेल तर तिकडे नोएडात तिच्याकरता स्वतंत्र ‘सृष्टी’ उभी करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. कार्यकर्ता, नेता असो वा भक्त, ते तयार व्हायला खूप काळ लागतो. त्यामुळे मोठी हिंमत दाखवून साऱ्यांचे दोष दाखवणाऱ्या कंगनाची काळजी सरकारने घ्यायलाच हवी. नारीशक्तीचे प्रतीक म्हणून स्मृती इराणींवरच भार का?  तेव्हा, ‘कंगना तुम आगे बढो…’ हाच सूर भविष्यात मोठा व्हायला हवा!