या देशात विद्वान, वैज्ञानिक, शास्त्रज्ञांची वर्गवारी करावयाची झाली तर या तीनही गुणांचा समुच्चय असलेल्या राजकारणी नेत्यांचा क्रमांक वरचा राहील. त्यानंतर चमत्कारी, साक्षात्कारी बाबांचा क्रमांक राहील व आजवर ज्यांना वैज्ञानिक, शास्त्रज्ञ म्हणून गौरविले गेले, अशा व्यक्ती तिसऱ्या क्रमांकावर राहतील. त्रिपुराचे युवा व सर्वज्ञानी मुख्यमंत्री विप्लब देव यांनी पदग्रहण केल्यापासून आपल्या बुद्धिसंपदेचे अमाप मोती समाजावर मुक्तहस्ते उधळून याची वारंवार प्रचीती दिली आहे. महाभारतकाळात इंटरनेट होते आणि व्हिडीओ कॉन्फरिन्सगद्वारे संजयाने धृतराष्ट्रास कुरुक्षेत्रावरील युद्धभूमीचे वार्ताकन करून दाखविले, असे सांगून विप्लब देव यांनी महाभारतासारख्या पुराणकथेला जो काही नवयुगाचा आयाम प्राप्त करून दिला, त्याला उपमा नाही. बेरोजगारीसारख्या समस्येवर तोडगा काय काढावा, या चिंतेने केंद्र आणि राज्यांची सरकारे उगीचच चिंताक्रांत असताना तरुण बेरोजगारांना पानाची दुकाने सुरू करण्याचा सल्ला विप्लब देव यांनी दिला, तेव्हा हा तोडगा आपणास का सुचला नाही, या भावनेने तमाम भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री स्वत:शीच चरफडले असतील यात शंका नाही. या देववाणीची दखल त्या वेळी साक्षात पंतप्रधानांनी घेतली आणि त्यांना तातडीने दिल्लीस बोलावून घेतले, तेव्हा यच्चयावत माध्यमांमध्ये तर्कवितर्क सुरू झाले होते. मोदी-देव भेटीत बहुधा या देवाच्या चरणी लीन होऊन, ज्ञानामृताचे कुंभ समाजाच्या प्रबोधनासाठी रिते करत राहण्याचीच प्रार्थना मोदी यांनी केली असावी, असा नवा तर्क करण्यास आता पुरेसा वाव आहे. आता एक नवा शोध विप्लब देव यांनी नुकताच जाहीर केला आहे. हे महाशय केवळ आपल्या संशोधनाची वाच्यता करून थांबत नाहीत, तर त्याचे आचरण करण्यासाठीदेखील स्वत: पुढाकार घेतात, हे त्यांचे एक आगळे वैशिष्टय़ आहे. पाण्यात पोहणाऱ्या बदकांमुळे पाण्यामध्ये प्राणवायूचे प्रमाण वाढते, त्याचे पुनर्चक्रीकरण होते व त्यामुळे अन्य जलचरांना अधिक प्राणवायू मिळतो, असा दावा या प्रकांडपंडित मुख्यमंत्र्याने केल्याने वैज्ञानिकांच्या क्षेत्रात अचंब्याच्या लाटा उसळू लागल्या असून, असे शोध आपण का लावू शकत नाही, या वैफल्याच्या भावनेने अनेकांना ग्रासले असावे अशी चर्चा सुरू झाली आहे. सध्या सांस्कृतिक पुनरुज्जीवनाचा वसा राजकारण्यांनी उचललेला असल्याने, कालपरवापर्यंत चलती असलेल्या बुवा-बाबांच्या मठ-मंदिरांमध्येही देववाणीच्या या नवनव्या आविष्कारांमुळे काळजीचे वातावरण पसरले असणार.. जी भाकिते किंवा उपदेशामृते हा आजवरचा आपला अधिकार होता, त्या अधिकारासच राज्यकत्रे नख लावत असून असेच चालत राहिल्यास, बाबा-बुवाबाजीच्या परंपरागत व्यवसायाचे भवितव्यच संकटात येईल, अशी भीतीही आता निर्माण होण्याची शक्यता आहे. केवळ सत्ताकारणाची गणिते बांधत आघाडय़ा, युतीची धडपड करून संख्याबळाची आकडेमोड करणाऱ्या राजकीय नेत्यांचा जमाना आता संपुष्टात येणार हे स्पष्ट होऊ लागले असून, राजकारणासोबत पुराणज्ञान, अध्यात्म आणि परंपराभिमान या गुणांचा समुच्चय आपल्या ठायी नसेल तर यापुढे राजकारणात टिकाव लागणे कठीण आहे, हे जुन्या ‘जाणत्यां’नी ओळखले पाहिजे..
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 30, 2018 2:31 am