लातूरच्या महाआरोग्य शिबिरात घसघशीत घोषणा करून मुंबईकडे निघालेल्या मुख्यमंत्र्यांनी निरोप पाठवून तातडीची गुप्त बैठक बोलावली. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याआधी ज्या अधिकाऱ्यांना बोलावले होते, तेच अधिकारी बंगल्यावर दाखल झाले; पण मुख्यमंत्र्यांच्या मागावरच्या माध्यमांना मीटिंगचा सुगावा लागला होता. मग मुख्यमंत्र्यांनी चलाखी करून तातडीने मीटिंगची जागाच बदलली आणि जुन्या फायली घेऊन अधिकारी नव्या जागी धावले. मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर हवेतून जमिनीवर उतरल्याचा निरोप आला आणि सर्वानी जुन्या फायली पुन्हा चाळायला सुरुवात केली. या फायली आणण्यास मुख्यमंत्र्यांनी का सांगितले असेल ते बैठक सुरू झाल्यावर कळेलच, असा विचार करून कुणीच या प्रश्नाच्या खोलात शिरले नव्हते. मुख्यमंत्री हेलिकॉप्टरमधून उतरले, बंगल्यावर जाऊन ताजेतवाने झाले आणि तातडीने ताफा बैठकस्थानी रवाना झाला. बैठक सुरू झाली. साहेबांच्या चेहऱ्यावर तणाव दिसत होता. सत्ता हाती घेण्याआधी राज्याचा आढावा घेऊन साहेबांनीच निवडणुकीच्या प्रचाराची रणनीती आखली होती. म्हणूनच, ‘कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा?’ असा खणखणीत सवाल तेव्हाच्या सत्ताधाऱ्यांना करता आला होता. आता पुन्हा नव्या निवडणुका येऊ घातल्या आहेत, त्यासाठी नवी घोषणा करावी लागेल, हे एव्हाना अधिकाऱ्यांच्या लक्षात आले होते. ‘आंबेडकरांच्या पुतळ्यासाठी राज्य गहाण ठेवावे लागले तरी बेहत्तर’ अशी खणखणीत घोषणा नुकतीच केली होती, पण तिचे आकर्षण एकुणात कमीच. ‘पुढच्या वेळीही आपणच मुख्यमंत्री होणार’ अशी घोषणा केली, तेव्हा लगेच युतीचा प्रश्न कुणी तरी पत्रकाराने पुढे केलाच. ‘युती झाली नाही तर आम्हाला दोघांनाही फटका बसणार’ असे उत्तर देऊन आपण वेळ मारून नेली. ‘मग तुम्ही पुन्हा मुख्यमंत्री कसे होणार?’ असा खवचट सवाल एकाने विचारलाच. तेव्हा पिकलेली खसखस अजूनही अस्वस्थ करीत होती. म्हणूनच, गांभीर्याने काही तरी विचार करावा असे ठरवूनच त्यांनी गुप्त बठकीचे आयोजन केले होते. आधीच्या सरकारच्या काळात कर्जाचा डोंगर, रखडलेले प्रकल्प, भ्रष्टाचार, वीजटंचाई, महागाई हे प्रश्न होते, असे अधिकाऱ्यांनी जुन्या फायली पाहून पुन्हा नव्याने सांगितले. त्यावरूनच तर आपण तेव्हाच्या सरकारला जाब विचारला होता आणि ‘सर्वात पुढे आहे महाराष्ट्र माझा’ असा आवेशपूर्ण जबाब तेव्हाच्या सत्ताधाऱ्यांनी दिला होता, हेही त्यांना आठवले. पुढे ती निवडणूक झाली, महाराष्ट्र सापडला, त्याला आता चार वर्षे झाली. ‘कुठे नेऊन ठेवला..’ हा सवाल विरोधकांनी आता आपल्याला विचारला तर?.. ते पुन्हा बेचन झाले. मग चर्चा सुरू झाली. ‘हा प्रश्न विरोधकांनी विचारला तर त्याला खणखणीत उत्तर द्यायला हवे’.. अधिकाऱ्यांकडे रोखून पाहात मुख्यमंत्री म्हणाले आणि अधिकाऱ्यांनी नम्रपणे माना हलविल्या. आता ते विचारात गढले. बाजूलाच बसलेल्या प्रदेशाध्यक्षांकडेही त्यांनी नजर फिरविली; पण ते लक्षात येताच पक्षाध्यक्षांनी मान फिरविली. अधिकारीही उगाचच विचारात गढल्यासारखे दाखवू लागले. तेवढय़ात मुख्यमंत्र्यांनी चुटकी वाजविली. ‘लिहा.. नवी घोषणा.. सर्वात पुढे आहे, महाराष्ट्र माझा!’ मुख्यमंत्री आनंदाने ओरडले आणि पक्षाध्यक्षांच्या चेहऱ्यावरचे नेहमीचे प्रश्नचिन्ह ठळक झाले. ‘काळजी करू नका.. महाराष्ट्र पुढेच राहील. त्यासाठी राज्य गहाण ठेवावे लागले तरी बेहत्तर’.. मुख्यमंत्र्यांनी पक्षाध्यक्षांना दिलासा दिला आणि बैठक संपली. नवी घोषणा देतच ते बंगल्याकडे निघाले.. असे आमच्या सूत्रांनी आम्हास गुप्ततेच्या अटीवर सांगितले.