उत्तर प्रदेशातील बुंदेलखंडची लोकसंख्या माहितीये? जवळपास ८२ लाख. मारुती गाडीची किंमत माहितीये? किमान तीन-साडेतीन लाख. आता करा गुणाकार. ८२ लाख गुणिले तीन लाख. पण आपल्यासारख्या साध्यासुध्या मराठी माणसाकडे इतका मोठा हिशेब करणारा कॅल्क्युलेटर कुठून येणार? आपल्या वजाबाक्या मोबाइलवर होतात.. एवढे लांबलचक आकडे झेपत नाहीत आपल्यासारख्यांना. मोठा गुणाकार करायचा तर भारतातील- नव्हे जगातील सर्वाधिक प्राथमिक सदस्य असलेल्या भारतीय जनता पक्षाचे रँग्लरबुद्धीचे, गणितज्ज्ञ अध्यक्ष अमितभाई शहा यांच्याकडे कॅल्क्युलेटर मागायला हवा. मोठमोठी गणिते करण्यात त्यांचा हात कुणीच धरू शकत नाही. आता हे बुंदेलखंडी गणित त्यांनी अगदी परवाच मांडले. या बुंदेलखंडात खाणकामाचा जोर फार मोठा. ‘या खाणी खणून सत्ताधारी समाजवादी पक्षाने चिक्कार पैसा गाठीशी लावला’, असे रँग्लर शहा यांचे म्हणणे. ‘हा पैसा सुयोग्य रीतीने वापरात आणला तर जिल्ह्य़ातील प्रत्येकाला मारुती कार मिळू शकेल’, असे त्यांचे गणित. म्हणूनच ८२ लाखांच्या लोकसंख्येस मारुती गाडीच्या तीन-साडेतीन लाख रुपये किमतीने गुणायला हवे. हा गुणाकार शहाच करू जाणेत. शहाच काय, भारतीय जनता पक्षाची सगळीच मंडळी गणितात अगदी अव्वल. त्यांचे पाढे पावकी, निमकी, पाऊणकी असले किरकोळ नसतात. गेल्या लोकसभा निवडणुकीआधी, ‘परदेशांतला सगळा काळा पैसा भारतात आणू आम्ही.. त्यातून प्रत्येक भारतीय नागरिकाच्या बँक खात्यात १५ लाख रुपये जमा केले जातील’, असे भरभक्कम गणित नरेंद्र मोदी यांनी मांडले होते. म्हणजे सुमारे १.२१ अब्ज लोकसंख्येच्या खात्यात प्रत्येकी १५ लाख रुपये. पण नंतर अमितभाईंना बहुधा अचानक सत्य काय ते सांगून टाकावे, अशी ऊर्मी दाटून आली. त्यातून मग, ‘अशी आश्वासने निवडणुकीआधी द्यावी लागतात’, असे सत्यवचनी बोल त्यांनी समस्त जगास ऐकविले. जुमला या शब्दाची देणगी राजकारणास मिळाली, ती सत्याच्या याच प्रयोगातून. त्यामुळे, काही नतद्रष्ट मंडळी या बुंदेलखंडी गणितालाही जुमला म्हणू लागली आहेत. पण ते अगदी हेत्वारोपच झाले. अमितभाईंच्या गणितज्ञानाची माहिती असलेले लोक, हे आश्वासन अमितभाई पूर्ण करणारच, असे छातीठोकपणे सांगतील. त्यावरही, बुंदेलखंडात गरिबी किती भीषण आहे.. दारिद्रय़ रेषेखालील नागरिकांची संख्या कशी प्रचंड आहे.. पोट भरण्यासाठी काहींवर अगदी गवत खाण्याची वेळ येते.. वगैरे प्रसारमाध्यमांतील बातम्यांकडे काही जण बोट दाखवतील. पण ही झाली नकारात्मक मानसिकता. एकदा का उत्तर प्रदेशात भारतीय जनता पक्षाची सत्ता आली, बुंदेलखंडातील प्रत्येकाकडे गाडी आली आणि सारे आपापल्या गाडीत बसले की त्यांची तहानभूक हरपणार, याची खात्रीच. त्यामुळे या क्षुल्लक गोष्टींची चिंताच नको. हो.. पण एवढय़ा गाडय़ा आल्या की पार्किंगची समस्या मात्र उभी राहणार समोर. ती कशी सोडवायची हे अमितभाईंनी जरा बघावे. म्हणजे नंतर त्यावर काथ्याकूट करायला नको, एवढेच.