बऱ्याच दिवसांनंतर कार्यालयात येताच रावसाहेब थेट आपल्या दालनात गेले. पण या वेळी सोबत लवाजमा आलाच नाही. दोन-चार कार्यकर्त्यांनी दरवाजा किलकिला करून बाहेरूनच त्यांना सलाम केला आणि पुन्हा रावसाहेब एकटे झाले. आज कुणीच दालनात फिरकलेदेखील नव्हते. पण रावसाहेबांना त्याचे आश्चर्य वाटलेच नाही. इथून निघायची वेळ झाली, हे त्यांनी केव्हाच ओळखले होते. आता मुक्काम इथून हलवायला हवा, असे स्वत:शीच पुटपुटत समोरच्या ट्रेमधील टपालाची चळत रावसाहेबांनी बाहेर काढली. पूर्वी हे काम त्यांच्या दालनाबाहेर खडा पहारा देणारा शिपाई करायचा. एक एक टपालाचे पाकीट निगुतीने फाडून रावसाहेबांच्या हाती द्यायचा. मग ते वाचून किंवा न वाचताच त्यावर लाल, निळ्या किंवा हिरव्या शाईने ठरावीक खुणा करून रावसाहेब ते टपाल ‘पुढील कार्यवाही’साठी बाहेर पाठवायचे. मग धावपळ सुरू व्हायची. शाईच्या रंगांनुसार पाकिटांची वर्गवारी केली जायची. दालनाबाहेर जमलेल्यांच्या आशाळभूत नजरा त्या टपालाचा पाठलाग करायच्या.. आज टपालाची सारी पाकिटे स्वत:च्या हाताने उघडताना रावसाहेबांना ते सारे आठवले. मग त्यांनी टेबलवर पाहिले. लाल, हिरव्या शाईची पेनंही तेथून गायबच झाली होती. एक सुस्कारा सोडून रावसाहेबांनी पुढचे पाकीट उचलले आणि त्यांना धक्का बसला. ते चक्क ‘कोरे पाकीट’ होते. त्यावर काहीच लिहिलेले नव्हते. तरीही रावसाहेबांनी ते उलटेसुलटे करून पाहिले. सरकारी कार्यालयात तीच तीच पाकिटे कोरा कागद वर चिकटवून पुन:पुन्हा वापरली जातात, हे रावसाहेबांना अनुभवाने माहीत होते. त्यांनी ते कोरे पाकीट उजेडासमोर धरले. बाहेर चिकटविलेल्या कोऱ्या कागदाआड काही तरी लिहिलेले होते. रावसाहेबांचा तर्क खरा ठरला. खानापूरचा पत्ता असलेले ते पाकीट कोल्हापूरमार्गे कार्यालयापर्यंत पोहोचले होते, हे त्यांच्या चाणाक्ष नजरेने ओळखले. वरकरणी कोरे दिसणारे ते पाकीट रावसाहेबांनी बाजूला ठेवले आणि कोरा कागद पुढे ओढला. निघायची जवळ आलेली वेळ ती हीच आहे, हे त्यांच्या ध्यानात आले. मग त्यांनी कागदावर आपला राजीनामा खरडला. औपचारिकता म्हणून आभाराचे व शुभेच्छांचे चार शब्दही लिहून टाकले आणि कोरे पाकीट बंद करून रावसाहेबांनी बेल वाजविली. बाहेरचा शिपाई जणू त्याचीच वाट पाहात होता. त्याने तातडीने आत येऊन ते कोरे पाकीट घेतले आणि धावतच तो बाहेर गेला. तातडीने त्यावर नवा पत्ता लिहिलेला एक कागद चिकटवला गेला आणि पाकीट रवाना झाले. पुढच्या एका दिवसातच, प्रवास पूर्ण करून ते पाकीट पुन्हा त्याच जागी आले होते. पाकीट परत येताच त्यावरील पत्त्याच्या जागी नवा कोरा कागद चिकटविला गेला. पुन्हा पाकीट कोरे झाले. आता त्यामध्ये कोणता कागद येणार, याची प्रतीक्षा सुरू झाली. काही वेळातच तो कागद आला. पुन्हा पाकिटावर नव्या पत्त्याचा कागद चिकटविला गेला, आणि पाकीट फोडण्यात आले. पुढच्याच क्षणी बाहेर जल्लोष सुरू झाला होता.. हे अगोदरच ठाऊक असल्यासारख्या नजरेने कोरे पाकीट टेबलावर दिमाखात बसून तो जल्लोष न्याहाळू लागले. आता आपली जबाबदारी वाढली आहे, हे त्याच्या लक्षात आले; आणि आता आपल्यावर कोणत्या नव्या पत्त्याचा कागद चिकटविला जातो, याची वाट पाहायचे त्याने ठरविले. पुढचा पत्ता कोण लिहिणार आणि आत कोणता कागद असणार, हे माहीत असूनही त्याने आपला चेहरा कोरा कागद चिकटविलेल्या कोऱ्या पाकिटासारखाच ठेवला होता. तरीही बाहेर जल्लोष सुरू होता. गावी परतलेले रावसाहेब तो जल्लोष टेलिव्हिजनवरून विमनस्कपणे पाहात होते..