लोकशाहीपेक्षा ठोकशाही जवळची वाटते अशी जाहीर कबुली मागे एकदा दिलेल्या आपल्या राज्यातील एका पक्षाच्या दृष्टीने सध्या अभिमान वाटावा अशी स्थिती आहे खास. कारण ‘ठोकल्याने होत आहे रे आधी ठोकलेचि पाहिजे’ हे वाक्य सध्या चलनी नाणे बनले की काय असे वाटून जाते. ‘जिसने यूपी नहीं देखा उसने भारत नहीं देखा’ अशी एक रेडिओ जाहिरात कुंभमेळ्याच्या निमित्ताने उत्तर प्रदेश सरकारने प्रसारित केली होती. यूपीमध्ये भारताचे प्रातिनिधिक चित्र खरोखरच दिसते, असे परवा त्या राज्यातील सत्तारूढ पक्षाच्या खासदार-आमदारातील बूटयुद्ध पाहून जाणवले. रस्त्याच्या पायभरणी समारंभातील कोनशिलेवर नाव का कोरले नाही, असा जाब विचारून खासदारसाहेबांनी आमदार साहेबांच्या कानशिलावर स्वत:च्या बुटाचा छापा कोरण्याचा प्रयत्न केला. ते आमदारसाहेबही मुख्यमंत्र्यांच्या कसल्याशा संघटनेच्या तालमीत घडवले गेल्यामुळे तयारीतले होते. खासदारसाहेबांच्या प्रेमभेटीची परतफेड त्यांनीही तितक्याच उत्कटतेने करण्याचा प्रयत्न केला. अनेक पदाधिकारी आणि एका मंत्र्याच्या उपस्थितीत घडलेला हा प्रकार काही मिनिटांनी वृत्तवाहिन्यांवर आणि दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रांमध्ये ठळकपणे झळकला.  ‘बडों का गुस्सा बडों का प्यार होता है’ या वाक्याची इतकी प्रदर्शनीय प्रचीती या निवडणुकीच्या निमित्ताने प्रथमच मिळाली. यापूर्वी आंतरराष्ट्रीय नेत्यांपासून आपल्या देशातील बडय़ा नेत्यांच्या पत्रकार परिषदांमध्ये प्रेक्षकांकडून बूट भिरकावला गेल्याचे अनेकांनी पाहिले असेल. पण बुटाचा याहूनही परिणामकारक वापर शोधण्याचे श्रेय संबंधित खासदार-आमदार यांच्या जोडीला दिले गेलेच पाहिजे.

चर्चेविना ठोकून काढण्याचे हे लोण आता महाराष्ट्रातही नव्याने येणार काय, याविषयीदेखील उत्सुकता आहे. नाही, खळ्ळ खटॅकच्या परिणामांच्या मर्यादा दिसून आल्या आहेत हे खरे. त्याविषयी बोलायची गरजच नसते. विखारी आणि ‘पेड’ ट्रोलिंगने हैराण झालेल्या एका नेत्यांनी आपल्या अनुयायांना थेट आदेशच दिला.. ट्रोल किंवा जल्पकांना ठोकून काढावे, असा! त्यामुळे ठोकण्याची ही संकल्पना आता पक्षातीत बनल्याचे समाधान वाटते! ठोकणे किंवा ठोकण्याचा आदेश देणे ही कोण्या एका पक्षाची मक्तेदारी राहिलेली नाही. निवडणुकीतील ठोकताळे बांधताना असल्या ‘ठोक’ताळ्यांचाही गांभीर्याने विचार होऊ लागला आहे काय, याविषयी त्यामुळे उत्सुकता दाटून आली आहे. परवाच आणखी एका केंद्रीय मंत्रिमहोदयांनी ठोकण्याविषयी मौलिक मार्गदर्शन केले. यांच्या सभेत काही जणांकडून वारंवार व्यत्यय आणला जात होता. अशा वेळी त्यांना उत्तर देण्याऐवजी त्यांचा बंदोबस्त करणेच हितकारक या विचाराने, व्यत्ययकारांना ठोकून काढावे अशी इच्छा या मंत्रिमहोदयांनी बोलून दाखवली आणि ‘त्यांना बाहेर काढा’ या आदेशाचे पालन कार्यकर्तेच करीत असल्याचे दिसल्यानंतर वातावरण शांत झाले. ‘घरमे घुसके मारा’ची चर्चा गल्लीबोळात रंगात आलेली असताना, ठोकण्याचे नवनवे देशांतर्गत प्रयोग आता राजकारण्यांकडून राबवले जाऊ लागले आहेत. उत्तर प्रदेशात जे दिसले आणि नंतर किमान दोन वेळा मंत्रिमहोदयांनी जे बोलून दाखवले ते, ठोकशाहीकडे वाटचाल सुरू झाल्याचीच नांदी ठरते काय?