चिंतन आणि मनन हे संघ परिवाराच्या कार्यपद्धतीचे अविभाज्य अंगच असल्याने, सार्वजनिक स्वरूपात कितीही बरळले, तरी नंतर त्यावर चिंतन केल्यास सत्याचाच साक्षात्कार होतो, हा या परिवाराचा अनुभवसिद्ध निष्कर्ष असावा. म्हणूनच, सार्वजनिकरीत्या केलेल्या एखाद्या विधानानंतर त्यावर सारवासारव करता येते, बुद्धिमत्तेचा कस लागतो आणि दरम्यानच्या काळात जनमानसाचा कौलही अजमावता येतो, हे तिहेरी फायद्याचे गणित संघ परिवाराने स्वीकारलेले दिसते. एखाद्या मुद्दय़ावर एखादे विधान करायचे, त्यावर उमटणाऱ्या प्रतिक्रिया अनुकूल असतील तर तो मुद्दा पुढे रेटायचा आणि प्रतिकूल वाटू लागल्या तर कोलांटउडी मारून मुद्दय़ाला बगल द्यायची, ही राजकारण नीती परिवाराने स्वीकारल्यामुळे, आपणही त्यात मागे राहू नये असे प्रत्येकास वाटू लागले असावे. म्हणूनच, लोकसभा निवडणुकीत समाजमाध्यमे  प्रभावी ठरल्याचे सिद्ध होऊनही, ‘या माध्यमांचा वापर जपून करा’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बजावले, पण पक्षात ते पचनी पडलेले दिसत नाही. समाजमाध्यमांपासून दूर राहणे म्हणजे प्रसिद्धीच्या झोताकडे जाणीवपूर्वक पाठ फिरविणे असाच समज असलेल्या  नेते-कार्यकर्त्यांनी मोदींचा उपदेश बासनात गुंडाळून ट्विटरवर बोटे चालविण्याचा उद्योग सुरूच ठेवला. मूत्र आणि शेणालाही मोल असलेली गाय हा एक उपयुक्त पशू असल्याचे सावरकरांनी सांगितले असले तरी तिच्या ठायी देवत्व असल्याच्या भावनेवरून उठलेले वादळ शमण्याची चिन्हे नाहीत. ‘ते गोमांस होते’ म्हणून जमावाकडून झालेला खूनही माफ, अशी हवा असताना भाजपच्या एका खासदाराने नेमकी उलटी बाजू मांडल्याने त्यांच्यावरही चिंतन आणि मननाची पाळी आली. जमैकाच्या उसैन बोल्ट नावाच्या धावपटूने गोमांसाचा खुराक घेतल्याने त्याला रियो ऑलिम्पिकमध्ये नऊ सुवर्णपदके मिळाल्याची ‘ट्विप्पणी’ भाजपचे खासदार आणि ‘अखिल भारतीय अनुसूचित जाती/जमाती महासंघा’चे संस्थापक-अध्यक्ष डॉ. उदित राज यांनी केल्यानंतर वादळ उठणारच होते. तसे ते उठलेच. साक्षात परिवारानेच मान्य केलेल्या गौमाहात्म्याच्या मुद्दय़ावरच प्रश्नचिन्ह उमटविण्याचा हा प्रकार असल्याची जाणीव उदित राज यांना झाल्यावर पश्चात्ताप म्हणून परिवाराच्या चिंतन नीतीचा अवलंब करण्याची वेळ त्यांच्यावर येणार, हेही साहजिकच होते. गोवंश हत्याबंदीचा ठाम पुरस्कार करणाऱ्या पक्षातच गोमांस सेवनाच्या सार्वजनिक समर्थनाचे महापाप धुऊन काढण्यासाठी केवळ गोमूत्राचे शिंपण पुरेसे नाही, तर ज्या माध्यमात बोटे चालविली त्याच माध्यमातून लोटांगण घालणे हाच पापक्षालनाचा मार्ग असू शकतो, याची खात्री उदित राज यांना पटली असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमांचा वापर करताना कोठे थांबायचे, याचे चातुर्य दाखविले होते. पण ‘परिवारा’बाहेरचे आणि फेब्रुवारी २०१४ पासूनच भाजपवासी झालेले उदित राज हे सार्वजनिक विधानांतून प्रभाव निर्माण करण्याची परिवाराची नीती परिवारावरच चालवू शकत नाहीत, हे या लोटांगणातून सिद्ध झाले.