उत्तर प्रदेशचे नवनियुक्त भाजप अध्यक्ष केशव मौर्य यांचे अनुयायी, तसेच भक्तगण हे काहीसे गोंधळलेले आहेत म्हणून त्यांच्यावर टीका करणे हा विरोधकांनी केलेला विरोधासाठीचा विरोध आहे, हे स्पष्टपणे सांगणे हे आमचे कर्तव्य आहे. मौर्य यांनी उत्तर प्रदेशात ‘रामराज्य’ आणण्याची घोषणा केली आहे. तेव्हा मौर्यभक्तांना त्यांच्यात किमान रामदूत दिसायला हवा होता. परंतु त्यांना दिसला तो कन्हैया. याची कारणे दोन. एक म्हणजे मौर्य यांच्या नावातच केशव आहे. दुसरे म्हणजे प्रत्येक नरात एक नारायण असतो यावर त्यांच्या अनुयायांची श्रद्धा आहे. तशी श्रद्धा नसती, तर त्यांना मौर्य यांच्यात कृष्णाऐवजी कंस दिसला असता. पण केवळ या श्रद्धेमुळे मौर्य यांच्यावरील खुनाचे वगैरे आरोप कंसात गेले आणि कंसाबाहेर आले ते त्यांचे विजयोत्सुक विश्वरूप. त्या स्वरूपावर भाळूनच तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी त्यांच्या गळ्यात प्रदेशाध्यक्षपदाची कमलमाला घातली आणि मौर्य यांच्या भक्तांनी लागलीच वाराणसीत त्यांच्या छबीचे भित्तिपत्रक झळकावले. त्यात उत्तर प्रदेशमाता द्रौपदीच्या स्वरूपात केविलवाणी उभी आहे, कांशीराम शिष्य मायावती, गांधीपुत्र राहुल, मुलायमपुत्र अखिलेश, भाजपरिपु ओवेसी असे ‘दु:शासक’ तिचे चीरहरण करीत आहेत आणि एका बाजूला भगवान केशव मौर्य हातात सुदर्शनचक्र घेऊन उभे आहेत, असे ते चित्र. उत्तर प्रदेशात रामराज्य आणण्यासाठी कलियुगातील हे कृष्णभगवान अवतरले आहेत, असा संदेश या चित्रातून जात आहे हे कोणीही मान्य करील. हे केशवबाप्पा अलाहाबादेतील भगतगणांना अर्जुनाच्या रूपात दिसतात. अलाहाबादेतील भित्तिपत्रकात भगवान केशव रथामध्ये अर्जुनाच्या रूपात गांडीव सरसावून उभे असून, त्यांच्या रथाचे सारथ्य करीत आहेत भाजपचे स्थानिक नेते डॉ. विक्रम पटेल. इतिहासाचे पुनर्लेखन म्हणून त्याकडे विरोधकांना दुर्लक्ष करता आले असते. पण त्यांच्यात तेवढा उमदेपणा कोठून असणार? त्यांनी केशवगुप्त मौर्यावर टीकेचे बाण सोडले. अखेर केशवगुप्तांनी आपल्या भक्तांना आचारसंहितेचे गीतामृत द्यावे लागले. कोणीही आपणांस देवदेवतांच्या रूपात दाखवून पक्षाची आणि आपली छबी खराब करू नये, असा इशारा त्यांना द्यावा लागला. याला म्हणतात उमदेपणा! पण तो दुर्लक्षित करून विरोधकांनी पुन्हा विरोधासाठी विरोध केलाच. मौर्य यांच्या कानपुरातील भक्तांनी त्यांची बाप्पा मौर्या हो म्हणत नाणीतुला केली. त्यासाठी किती तरी अडचणी – म्हणजे ९६ किलो नाणी जमविणे, नाण्यांच्या वापराविषयीच्या कायद्याचा भंग करणे – त्यांना पार कराव्या लागल्या. तरीही त्यांच्यावर टीका झालीच. या अशा गोष्टींत कोणास व्यक्तीपूजा दिसली, कोणास लाळघोटी भाटशाही, तर कोणास सामंतशाही मनोवृत्तीचे अवशेष. पण हल्लीच्या राजकारण आणि समाजकारण यांचा हाच जर पक्षनिरपेक्ष परम उपासनामार्ग असेल, तर त्यावर टीका करणे हाच पाखंडीपणा झाला. विरोधकांनी तो सोडावा हेच भले.