News Flash

देवाची तिजोरी..

एक गाणे मागे खूप गाजले होते.

एक गाणे मागे खूप गाजले होते. आजही रेल्वेच्या डब्यात या गाण्याचे वेडेवाकडे शब्द ऐकू येतात, आणि केवळ चालीमुळे ते गाणे तेच होते, हे उमगून जाते. पण काळ बदलला, आणि हे वेडेवाकडे शब्दच गाण्याचे मूळ शब्द झालेत. आता कानावर हे नवे शब्द पडले, की लगेचच पाचशे हजारांच्या नोटांनी भरलेली ‘देवाची तिजोरी’ नजरेसमोर दिसू लागते, आणि पापाचा काळा पसा देवाच्या पायी ओतून पुण्य मिळविण्याच्या लालसेची कमाल वाटू लागते. पंढरीचा विठूराया हा खरं म्हणजे, गरीब, कष्टकरी, माळकरी, वारकऱ्यांचा देव! त्याच्या पायावर केवळ भक्तिभावानं डोकं ठेवलं, मायेनं पांडुरंगाची पावलं कुरवाळून दयेचं साकडं त्याला घातलं, की त्यातून मिळणारे समाधान एवढे मोठे, की त्यापुढै पशाची श्रीमंतीही फिकी पडावी, असा आजवरचा समज! म्हणूनच, त्या सावळ्या विठ्ठलाची तिजोरी कधी काळ्या पशानं भरलीच नाही. नोटाबंदी आली, आणि ‘देवाची तिजोरी’ शोधत वणवण करणाऱ्या पुण्यशोधकांचे पाय आता पंढरीकडेही वळले. सगळ्या देवांची तिजोरी सारखी श्रीमंत नसते. पशाचे ओझे वाटू लागले, की त्याचे हिशेब देण्यापेक्षा मुंबत सिद्धिविनायकाच्या तिजोरीत ते ओतले, की त्या काळ्याचे पांढरे करण्याची त्या तिजोरीचीच किमया असते, हे माहीत असलेल्यांनी त्या देवाची तिजोरी भरण्यात कधीच कसूर केली नाही. काही निवडक देवांच्या तिजोरीत काळ्याचे पांढरे होते, तेथे पशाच्या राशी गोळा होतात, आणि फकिरीत आयुष्य घालविलेल्या एखाद्या संताच्या फाटक्या कपडय़ातील मूर्तीही सोन्याने मढून जातात. काही देवांना सोन्याच्या दागिन्यांचे ओझे होऊ लागते. पंढरीचा विठोबा मात्र त्यापासून चार हात दूर राहिला होता. पण मोदी सरकारने नोटांच्या निश्चलनीकरणाचा निर्णय घेतला, आणि अठ्ठावीस युगांपासून कटेवरी कर ठेवून निश्चल राहिलेल्या या सावळ्या विठोबाची तिजोरीही काळ्या पशानी ओसंडू लागली. पंढरीच्या विठोबालादेखील हा चमत्कार पाहून अचंबा वाटला असेल. कदाचित, आसपास कुणीच नसेल, तेव्हा, एकांतात त्याची रखुमाईशी चर्चादेखील झाली असेल, आणि कुणालाच पत्तादेखील लागणार नाही याची खात्री असलेल्या वेळी त्याने कदाचित कमरेवरचे हात कपाळावरही मारून घेतला असेल. सावळ्या विठ्ठलाच्या या नव्या रूपाकडे पाहताना वामांगीच्या रखुमाईलादेखील कमरेवरचा हात बाजूला करून तोंडात बोट घालण्याचा मोह आवरला नसेल. गरीब देवाच्या तिजोऱ्या संपत्तीने भरलेल्या सगळ्यांनीच पाहिलेल्या आहेत. पण गरिबांच्या देवाची तिजोरीही संपत्तीने ओसंडू लागली असली, तरी या निश्चल देवाच्या सावळ्या मुखावर निश्चलनीकरणाच्या तेजाची झळाळी चढविता येणार नाही, याची त्या काळ्या पशालाही कदाचित कल्पना असेल. पण पंढरीच्या ‘देवाची तिजोरी’ मात्र, अचानक सुरू झालेला हा पशाचा पाऊस पाहून शरमून गेली असेल. आता आपल्यावर सोन्याचा मुलामा चढणार नाही ना, या काळजीने पुंडलिकाने शतकांपूर्वी दिलेली विठ्ठलाच्या पायीची ती वीटही, कदाचित थरारली असेल..

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 21, 2016 2:10 am

Web Title: black money in temples
Next Stories
1 अर्थकारणाचे सीमोल्लंघन..
2 आपले मोक्षदाते
3 ‘विनये’ विद्या न शोभते..
Just Now!
X