केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीनजी गडकरी यांच्या अथक प्रयत्नांतून गंगा नदीत व्यावसायिक मालवाहतूक सुरू झाली, तीही प्रायोगिक तत्त्वावर. गंगा नदीतून व्यावसायिक तत्त्वावर प्रवासी वाहतूक सुरू होण्यास काही काळ लागेल, आणि तोवर गंगा नदीतील होडय़ांमधून कुणी इकडून तिकडे गेलेच, तर तो काही खरा प्रवास म्हणता येणार नाही. त्याला फार फार तर, आनंदपर्यटन म्हणता येईल. इंग्रजीत यास पिकनिक असा प्रतिशब्द आहे.  ‘पिकनिक’ हा शब्द प्रचारात कोणी आणला, हा वाद अगदी ताजाच आहे. या वादाचा भाषाशास्त्राशी काही संबंध नाही. असलाच तर तो नितीनजी गडकरी यांच्यासह अख्ख्या भाजपच्या कर्तृत्वाशी आहे. आणि काँग्रेसच्या गलिच्छ राजकारणाशीही आहे.

आधी भाजपच्या कर्तृत्वाविषयी. या पक्षाने केंद्रात जसे कर्तृत्ववान मंत्री दिले, तसेच राज्याराज्यांत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीही दिले. महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री नाहीत, त्यामुळे फक्त मुख्यमंत्र्यांचेच कर्तृत्व दिसते. पण उत्तर प्रदेशात तसे नाही. तेथे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी ऊर्फ अजयसिंह बिष्ट यांच्याइतकेच उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा हेही कर्तृत्ववान आहेत. योगीजींचे कर्तृत्व असे की, त्यांनी उत्तर प्रदेशालगतच्या मध्य प्रदेश, राजस्थान यांसारख्या राज्यांत प्रचार केल्यास भाजपच काय, विरोधी पक्षही जिंकतात. दिनेश शर्मा हे कर्तृत्वाबाबत अत्यंत विज्ञाननिष्ठ वृत्तीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आदर्श ठेवणारे. गणपती हे सुघटन शल्यक्रियेचे- म्हणजेच प्लास्टिक सर्जरीचे- पहिले उदाहरण असल्याचे मोदी यांचे प्रतिपादन लोक २०१८ च्या मध्यापर्यंत विसरून गेले, तेव्हा भूमिकन्या सीता ही पहिली ‘टेस्ट टय़ूब बेबी’ असल्याचे शास्त्रीय प्रतिपादन दिनेश शर्मा यांनीच केले होते. शास्त्रीय प्रगतीच्या परंपरेची मळवाट त्यांनी रुंद केली होती.

शास्त्रीय आधार असल्याशिवाय दिनेशजी शर्मा बोलत नाहीत. उत्तर प्रदेशात झालेल्या प्रगतीची मोजमापे तर त्यांच्या जिभेवर असतात. त्यामुळेच काँग्रेसच्या नव्या सरचिटणीस प्रियंका गांधी गंगा नदीतून होडीने तीन दिवस प्रचार करण्याची तयारी करू लागल्या, तेव्हा क्षणाचाही विलंब न लावता दिनेश शर्मा यांनी त्यास ‘पिकनिक’ ठरवून टाकले. तांत्रिकदृष्टय़ा त्यांचे हे प्रतिपादन १०० टक्के अचूक! गंगा नदीतून जी माणसे होडीने इकडून तिकडे जातात, ती एक तर धार्मिक आचरण करीत असतात किंवा आनंदपर्यटन- म्हणजे पिकनिक. बरे, गंगेच्या पात्रात होडी शिरल्यावर प्रचार कुणापुढे करणार? पाण्यातल्या माशांपुढे?

प्रश्न शर्मा यांच्या टीकेचा नाही. तो काँग्रेसच्या गलिच्छ राजकारणाचाही आहे. जी नदी गलिच्छ झाली म्हणून स्वामी आत्मबोधानंद नामक इसम आज १४० व्या दिवशीही उपोषण सोडत नाही, ज्या नदीच्या स्वच्छतेसाठी मोदीजींनी काहीच केले नाही अशी ओरड सारे ‘कावीळग्रस्त’ करतात, तीच नदी पिकनिकसाठी का हवी? पिकनिकला प्रचार म्हणणार, प्रचारादरम्यान देवळांना भेट देणार, असा राजकारणाचा गलिच्छ खेळ काँग्रेसच्या प्रियंका गांधी यांनी आरंभला आहे. त्याविरुद्ध बोलणे आवश्यकच होते.

नाही तर, ही यात्रा तीन दिवसांची आहे वगैरे तपशिलाकडे उत्तर प्रदेशाबाहेर कुणाचे लक्ष वेधले गेले असते?