टाळ्या वाजवीत ते उद्गारले.. ‘सल्लागारांपैकी कोण आहे रे तिकडे?’ काही क्षणांतच एक सल्लागार अदबीने पुढे आला. ‘काय कारणांनी आठवण केलीत?’, त्याने विचारले. ‘दोन महिन्यांपूर्वी आपल्या प्लॅननुसार संदेश धाडले होते ना भारतात?’.. विचारता विचारता त्यांनी आपल्या टेबलाचा वरचा ड्रॉवर उघडून त्यातील ‘बिल्ड इन इंडिया’ असे ठळक अक्षरांत लिहिलेली फाइल बाहेर काढली. ‘तुम्ही सांगितल्यानुसार धाडले होते संदेश. त्याआधी आपल्या व्हाइट हाऊसमध्ये कावळे, कबुतरे यांना खास प्रशिक्षणही दिले होते. कुठल्या कावळ्याने किती अंतर जायचे, कुठल्या कबुतराने कशी मार्गक्रमणा करायची, कुठल्या देशातील आपल्या दूतावासापर्यंत ते जाणार, त्यापुढे कुठल्या कावळ्यांनी, कबुतरांनी आणि ठिकठिकाणच्या विविध जाती-प्रजातीच्या पक्ष्यांनी संदेश पुढे न्यायचे, याबाबतची सगळी योजना अगदी तपशीलवार आखली होती..’ सल्लागाराने माहिती पुरवली. ‘शाब्बास. निरोपाचा हा मार्ग एकदम भरवशाचा. कसले ते ई-मेल वगैरे करत बसायचे. जगातला एक संगणक विश्वास ठेवण्याच्या लायकीचा नाहीये’, त्यांनी एक जागतिक सत्य सांगून टाकले. ‘तुम्ही म्हणता ते अगदी खरे आहे’, सल्लागाराने चेहऱ्यावर अदबीचा थर चढवीत त्यांना दुजोरा दिला. ‘पण कामाचे पुढे काय झाले?’ त्यांनी सल्लागारांना पुन्हा विचारले. ‘होय होय.. तीच माहिती घेऊन आलोय आज’, असे सल्लागाराने म्हणताच त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. इतक्यात त्यांच्या टेबलावरील फोन खणखणला. ‘रशियातून फोन आहे,’ असे ऑपरेटरने त्यांना सांगितले. त्यासरशी, ‘युनोच्या बैठकीची तयारी करतोय.. तासाभराने फोन करायला सांगा,’ असे म्हणून त्यांनी फोन ठेवून दिला. सल्लागार सांगू लागला.. ‘आपले एकूण ७४ संदेश भारतात पोहोचवायचे होते. त्यासाठी ७४ पक्षी लागणार होते आणि पक्षी बदलत बदलत जाणार असल्याने त्यांची एकूण संख्या लागणार होती ७८५. त्या सगळ्यांच्या पायांना चिप्स लावलेल्या होत्या. तर, संदेश घेऊन एकूण ७४ पक्षी भारतात पोहोचले बरोबर. पण पुढे काही तरी घोळ झाला. हे सगळे पक्षी पुण्यानंतर त्या या गावाला जायला हवे होते ना..’ सल्लागार गावाचे नाव विसरला. ‘बारामती..’ त्यांनी गाळलेली जागा भरून काढली. ‘हां.. पण त्यातील काही पक्षी पुण्यानंतर दिल्लीकडे वळल्याचे दिसतेय. दिल्लीत ‘लोककल्याण मार्ग’ नावाच्या रस्त्यावरील सात क्रमांकाच्या बंगल्यात ते सध्या असल्याचे चिप्सवरून कळतेय.’ ‘काय?’ सल्लागाराने दिलेली माहिती ऐकून ते अस्वस्थ झाले. त्यांनी झर्रकन खिशातील पत्त्यांची डायरी काढली व सल्लागाराने दिलेला पत्ता शोधून काढला. या पत्त्याचा बंगला कुणाच्या मालकीचा आहे, हे त्यांना समजताच ते आणखीनच अस्वस्थ झाले. त्यांनी ऑपरेटरला फोन केला. ‘तातडीने सात लोककल्याण मार्गला फोन करा’, त्यांनी ओरडून सांगितले. फोन ठेवून ‘तुम्ही निघा आता’, असे सल्लागारावर ते करवादले आणि नंतर फोन वाजण्याची वाट बघत हताशपणे बसून राहिले..