..आणि या मुंबापुरीमध्ये साती बेटांतील साऱ्या देवदेवतांच्या, पंचमहाभूतांच्या, चंद्र-सूर्याच्या, उफाणत्या समिंदराच्या, भरल्या नाल्यांच्या, धावत्या लोकलांच्या, वाहतूक कोंडीच्या, रस्त्यावरल्या खड्डय़ांच्या, दुमजली-तिमजली झोपडय़ांच्या, एफएसआय पचवून ढेकर देणाऱ्या बिल्डरांच्या, पुनर्वसन प्रकल्पांच्या, संक्रमण शिबिरांच्या, व्यापाऱ्यांच्या, फेरीवाल्यांच्या आणि सरते शेवटी या मुंबापुरीतील तमाम बंधू-भगिनी नावाच्या मतदारांच्या साक्षीने मतमाऊलीच्या जत्रेमध्ये शक्ती-तुऱ्याचा खेळ सुरू झालेला आहे. सालाबादप्रमाणे तुरेवाले भेदिक नेहमीचेच आहे. त्यांची हलगी, त्यांची तुणतुणी नेहमीचीच आहेत. शक्तिवाले मात्र, मंडळी, यंदा बदलले आहेत. ५६ इंचांची छाती घेऊन जिंकण्याचा विडा उचलून अवतरले आहेत. गडाचे सारे दोर आपल्या हाती ठेवून त्यांचे सारे शेलार-मामा रंगमंचावर दातओठ खाऊन उभे ठाकले आहेत. आणि ते पाहा, झगडय़ाला सुरुवात झाली आहे ती पहिल्या कवनातून. हे मुंबईचे कवन. खरे तर मुंबई तोडण्याचे कवन. परंपरेने त्यापासूनच कलगीतुऱ्यास प्रारंभ करायचा असतो. त्याचा मथितार्थ तसा साऱ्यांच्या ओळखीचा असतो. म्हणजे एक राक्षस असतो दिल्लीतला. त्याची वाकडी नजर असते मुंबापुरीवर. ती म्हणजे महाराष्ट्राच्या काळजाचा तुकडा. तो त्या राक्षसाला तोडायचा असतो. ऐका, हे तुरेवाले काय म्हणताहेत ते. गाताहेत – मुंबई नगरी बडी बांका, तिला बुल्लेट ट्रेनपासून धोका.. साधुनी मोका, पाडणार तुकडा. ही बुलेट ट्रेन म्हणजे मुंबापुरीला महाराष्ट्रापासून तोडायचा डाव आहे गडय़ांनो. तसे शक्तिवाले सरसावले. म्हणाले, हे देशप्रेमाचे काम, याला कितीही मोजून दाम, करणार तमाम, ट्रेन ही जोडणारी.. मित्रों, ही बुलेट ट्रेन साधी नाही. ती मुंबईला देशाशी जोडणारी आहे. नव्हे, नव्हे, जगाशी जोडणारी आहे. अखेर जग म्हणजे तरी असते काय? जग म्हणजे माया नव्हे की ब्रह्म नव्हे. ऐका – सांगतो आतली बात, तुमच्या कानात, ठेवा ध्यानात, की जग म्हणजे हो गुजरात.. जे गुजरातमध्ये तेच जगात. जे पिंडी, तेच ब्रह्मांडी. तेव्हा मुंबई जोडली जाणार ती जगाशी. ती कशाने तर बुलेट ट्रेनने. आणि एकदा मुंबई जगाशी जोडली की काय होणार? वेगाने होणार विकास, येणार दिवस खास, कोणा न पडणार उपास, सर्वाच्या मुखी घास.. हो इडली डोशाचा.. थोडक्यात काय, तर मुंबापुरीचा कायापालट होणार. बुलेट ट्रेन आली की इथली लोकल सुधारणार. खड्डे बुजणार. भरपूर पाणी मिळणार. परवडणारी घरे लाभणार. मज्जानूं लाइफ होणार. तर येणेप्रकारे मंडळी, मस्त रंगलेला आहे जंगी सामना. पूर्वी तुरेवाले मुंबई तोडण्याची कवने म्हणत नि सामना जिंकून जात. आता मुंबई जोडण्याच्या कवनाचा जोर आहे. तेव्हा लोकहो, सामन्याची मजा लुटा. रोजरोज काही शक्तिवाले आणि तुरेवाले असे मुंबापुरीत येत नसतात..