सांप्रतकाळी महाराष्ट्रप्रांती मोठ्ठी क्रांती होऊ  घातलीये महाराजा. कसली क्रांती म्हणून काय विचारता? ऐतिहासिक क्रांती. महाराष्ट्रप्रांतीच्या रयतेची चलनवर्तणूक बदलणारी ही क्रांती. त्यांच्या जीवनातील काळाकुट्ट अंधार दूर सारणारी ही क्रांती. रोकडे महाराज सांगूनच गेलेत.. ‘करावया शुद्ध चलन। क्रांतिविन नसे उपाय॥’. तर त्यावर आजचं हे कीर्तन. काय आहे ही क्रांती महाराजा, कशी आहे ही क्रांती, कशी घडणार ही क्रांती. तर आता अवधान द्यावं पुरं. तुमचं घर चालतं कशावर? तर त्याच्या इच्छेवर आणि चलनावर. त्याच्या म्हणजे वरच्याच्या महाराजा, उगाच गैर काही मनी नको. तर चलन म्हणजे एकदम चंचल वस्तू. आज आहे तर उद्या नाही. आज इकडे तर उद्या तिकडे. आता काहींची अवस्था कशी असते? तर, ‘रोकडरहिताचे कौतुक ना मुळी। आम्ही तो जन्माचे कॅशलेस॥’, अशी. त्यांच्यासाठी रोकडे महाराज सांगून गेलेत. ‘चलन चंचल, जणू मायाजाल..’ तर त्यामुळे त्यावर फार माया करू नका. महत्त्वाचं म्हणजे या चलनाला ग्रहण फार लवकर लागतं. दडवून ठेवलंत.. अडवून ठेवलंत तर त्याचा रंग बदलतो महाराजा. पांढऱ्याचा काळा होऊन जातो. असं काळं चलन प्रांताच्या अर्थआरोग्यासाठी अहितकारी. तर मग त्यावर उपाय नाहीच का काही? तर आहे महाराजा. रोकडे महाराजांनी सांगून ठेवलेय. ‘जरी दिसो नाही येत, वारा वाहतो सावध..’ म्हणजे काय? तर चलन वाहू द्यायचं, पण ते वाऱ्यागत. इतरांना दिसणार नाही असं. शहरी लोक त्यास काय म्हणतात माहितीये.. कॅशलेस. तर नीट अवधान द्या जी.. यापुढे हे असेच वारे आपल्या प्रांती वाहणार आहेत. क्रांती क्रांती म्हणतात ती हीच महाराजा. या क्रांतीची अस्त्रे कुठली? क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि ते काय म्हणतात ते ईवॉलेट. आता ही अस्त्रं तुमच्या हाती नसतील आणि ती कशी चालवायची ते तुम्हाला ठाऊक नसेल तर दोष तुमचा बरं. ते तुम्ही शिकायला हवे. तुमच्या खात्यावरील चलन दुबळं असेल आणि ते वाऱ्यासारखं वाहात नसेल तर त्याची जबाबदारी तुमची बरं. पण मग मंत्रालयात, जि.प. कचेरीत, निबंधकांकडे काय होणार? रोकडे महाराजांनी सांगूनच ठेवलेय.. ‘चिल्लरांसी ध्यान, देऊ नये मुळी। चलन चालवावे आपुले जी॥ ’