News Flash

चांदोबा, चांदोबा भागलास का..

गूढाच्या विश्वात घेऊन जाणाऱ्या कथादेखील तेथे दडल्या आहेत, पण आता ते बालविश्व उरलेलेच नाही.

चांदोबा, चांदोबा भागलास का..
(संग्रहित छायाचित्र)

ती बातमी ज्यांनी वाचली, त्यांना हारून अल रशीद नावाचा बगदादचा बादशहा नक्कीच आठवला असेल. तोच.. जो दररोज रात्री वेषांतर करून राज्यात फेरफटका मारायचा, लोकांची गाऱ्हाणी ऐकायचा आणि प्रजेला त्रास होऊ नये म्हणून कारभारात सुधारणाही करायचा.. सातासमुद्रापारच्या हारून अल रशीद नावाच्या एका बादशहाला आपल्या लहानपणीचा जिवलग दोस्त बनविणारा चांदोबा त्या बातमीमुळे आठवणींच्या कप्प्यातून हळूच बाहेर आला असला तरी त्याने अनेकांचा दिवस अस्वस्थ केला असेल. बशीत बचकाभर चुरमुरे घेऊन ते खाता खाता झोपाळ्यावर बसून चांदोबाची चित्रे न्याहाळत रंगीत गोष्टींमध्ये रमून जाण्याचे सुख ज्यांनी अनुभवले, त्यांना चांदोबाची नवी व्यथा वाचून दु:खच झाले असेल. कधीकाळी असंख्य बालकांना आनंद देणारा हा चांदोबा अचानक रुसला, निंबोणीच्या झाडामागे दडून बसला आणि पुन्हा कधी बाहेरच आला नाही. चांदोबाच्या रंगीबेरंगी दुनियेत उमलण्याचं वय सरून तारुण्याकडे झुकणाऱ्या मनांना चांदोबाच्या हळव्या आठवणी अशा व्याकुळ करू लागल्या, की ‘गदिमां’चं ते गाणं आठवायचं आणि त्याच्या प्रत्येक ओळीसोबत, आठवणीतल्या चांदोबाचं एक एक पान नजरेसमोरून पुढे पुढे सरकायचं.. आईबाबांवर रुसलास का, असाच एकटा बसलास का, असे या चांदोबाला विचारताना, डोळ्यांच्या कडा नकळत ओल्या व्हायच्या.. चांदोबा चांदोबा कुठे रे गेलास, बघता बघता गडप झालास.. हाकेला ओ माझ्या देशील का, पुन्हा कधी आम्हाला दिसशील का, असा व्याकुळ सवाल करूनही तो चांदोबा पुढे पुन्हा कधी दिसलाच नाही. बालविश्व समृद्ध करणारा तो चांदोबा, बघता बघता गडप झाला आणि जुन्या खजिन्यातून हाताला लागलेल्या चांदोबाला लाखाचं मोल लाभलं.. ‘माझ्याकडे चांदोबाचे जुने अंक आहेत’, असं अभिमानाने सांगणाऱ्या एखाद्याचा हेवा करणाऱ्यांना या बातमीने पुन्हा हळवेही करून टाकले. तो आपला चांदोबा आता कधीच दिसणार नाही. चंदामामा हरवला आहे आणि चांदोबाच्या नावाने फोफावलेल्या एका धंद्यावरचे काळे ढग मात्र, अधिक गडद झाले आहेत. पानापानावरल्या जादूच्या गूढरम्य गोष्टी, त्यातील राजे, राण्या, राजपुत्र, राजकन्या, पऱ्या, वेताळ, जादूगार आणि आई-मुलांच्या मनोरंजनासाठी जणू जिवाचे रान करणारी ही सारी पात्रे, आंतरजालावर उमटल्यावर पुन्हा एकदा तो खजिना जिवंत होणार या आशेने अनेक जण आपले वाढलेले वय विसरून गेले होते, पण ती आशादेखील मालवली. आठवणींच्या कप्प्यात दडलेले ते जयशील, मकरकेतू, मांत्रिक सिद्धसाधक, राजकुमारी कांचनमाला, डोक्याची शंभर शकले होऊन तुझ्या पायाशी लोळू लागतील असे विक्रमादित्याला बजावणारा आणि विक्रमादित्याने मौन सोडताच शेपटीला झोकदार वळसा देत पुन्हा झाडाकडे झेपावणारा वेताळ, झाडांच्या फांद्या-पानांआड दडून अचंबित नजरेने तो प्रसंग न्याहाळणारी लहानमोठी भूतं, विक्रमादित्याच्या पायाखालून वेताळाकडे पाहणारा नागमोडी साप, ही सगळी मजा, काळासोबत धूसर होत गेली आणि आता कायमची नष्ट झाली. मुंबईच्या कुठल्याशा गोदामात हा खजिना अजूनही दडलेला आहे. हाताने रंगविलेली असंख्य चित्रे तेथे धूळ खात पडली आहेत. गूढाच्या विश्वात घेऊन जाणाऱ्या कथादेखील तेथे दडल्या आहेत, पण आता ते बालविश्व उरलेलेच नाही. ते गाणेही आता फारसे वाजतच नाही. चांदोबाची चित्रे कागदाच्या पट्टीवर चिकटवून त्याचा पूर्ण चित्रपट बनविणारं आणि तो पाहून हरखणारं बालपणही आता संपलंच आहे. चांदोबा पुन्हा कधी दिसलाच नाही, म्हणून आताचं बालविश्व खंतावणारही नाही..

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 17, 2018 1:01 am

Web Title: chandamama firm rare papers key patents lie locked up in mumbai building
Next Stories
1 .. की घुंगरू  तुटलं रे!
2 नाना-नानींचा ‘आनंद’ मार्ग ..
3 मुंबईवर भरोसा नाय काय?..
Just Now!
X