आनंद ही एक मानसिक स्थिती असली, तरी ती मोजण्याचा एखादा निर्देशांक असतो आणि भारतातील जनतेच्या आनंदाचा निर्देशांक खूपच खाली आहे, ही बाब जेव्हा स्पष्ट झाली, तेव्हा आनंदाचा स्तर उंचावण्याचा गंभीर विचार सुरू झाला असावा. काही अन्य राज्यांप्रमाणेच, महाराष्ट्रही असे विचार करण्यात मागे नसते, हे सर्वानाच माहीत आहे. त्यानुसार, महाराष्ट्रातील जनतेच्या आनंदाचा स्तर उंचावण्यासाठी राज्यात ‘आनंद मंत्रालय’ स्थापन करण्याचा विचार सुरू असल्याची ‘आनंद वार्ता’ जुलै महिन्याच्या एका ‘आनंद दिनी’ राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी उपराजधानी नागपुरातून दिली, तेव्हा राज्यातील जनतेचा आनंदस्तर काहीसा उंचावला होताच. आनंदस्तर ही मानसिक अवस्था असल्याने, आनंद मंत्रालयाच्या बातमीमुळे उंचावलेला आनंदस्तर अजूनही बऱ्यापैकी उंचावलेला असताना आणि त्याच स्तरावरून दसरा-दिवाळीसारखे, ‘..नाही आनंदा तोटा’ मानसिकतेचे सण साजरे करण्यासाठी सारे जण आतुरलेले असताना अचानक आनंदस्तरावर फटाकेबंदीचे विरजण पडले आणि शेअर बाजारात निर्देशांक ढेपाळल्यानंतर ज्याप्रमाणे गुंतवणूकदारांचे नुकसान होऊन मानसिक आनंदही ढळतो, तसेच काहीसे सामान्यजनांचे झाले. फटाके वाजविणे हा आनंद व्यक्त करण्याचा आपला आगळावेगळा मार्ग असला तरी त्याच्या वेळा ठरवून देऊन दिवसातून दोनच तास आपल्या आनंदाची आतषबाजी करावी असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. खरे म्हणजे, आनंद काय किंवा दु:ख काय, या दोन्हीही केवळ मानसिक अवस्था असल्याने व कोणत्या परिस्थितीस काय मानावयाचे हे सापेक्षपणे ज्याच्या त्याच्या वैचारिकतेवरच अवलंबून असल्याने, कोणत्या वेळी आनंद मानावा आणि कोणत्या वेळी दु:ख मानावे हे ठरवून देणे तसे अवघडच! पण फटाके वाजविणे हा आनंद साजरा करण्याचा मार्ग असेल, तर दिवाळीच्या दरम्यान सर्वानीच केवळ रात्री आठ ते दहा या वेळेतच साजरा करावा, असे न्यायालयाने बजावल्याने, आनंदाच्या अभिव्यक्तीला वेळेची शिस्त लागेल, असे मानावयास हरकत नाही. शिवाय, दु:खाची अभिव्यक्ती या वेळेत कोठेही दिसणार नाही, असाही या निर्णयाचा एक आनंददायी अर्थ होऊ शकतो. एका परीने, आनंद मंत्रालय स्थापन करून राज्यातील जनतेचा आनंदस्तर उंचावण्याचे जे काही गंभीर विचार सध्या शासन स्तरावर सुरू आहेत, त्याला न्यायालयाचा हा निर्णय काहीसा पोषक ठरेल यात शंका नाही.

किमान, रात्री आठ ते दहा या वेळेत तरी आनंदाची दृश्य अभिव्यक्ती सर्वत्र अनुभवता येईल. भविष्यात ‘आनंदस्तरा’चा अहवाल तयार करताना, याच दिवसांतील याच वेळेत सर्वेक्षण वगैरे केले गेले तर आनंदस्तर कमाल उंचावल्याचा निष्कर्ष काढणेही सोपे जाईल. फटाके वाजविण्यात वेळेची वेसण घातली गेल्याने काहींच्या आनंदावर विरजण पडले असले, तरी त्यातून सावरणे काही अवघड नसते. एखाद्या विशिष्ट वेळी सर्वत्र आनंद साजरा होत असताना दुर्मुखलेले राहण्यात मजा नाही, हे आपोआपच जाणवेल आणि दोन तासांचा आनंद अनुभवण्यातच आनंद आहे, हेही हळूहळू जाणवू लागेल.