वादावर पडदा टाकायची दादांची रीत काही औरच! एका वादावर पडदा टाकण्यासाठी गुपचूप माफी मागून काही दिवस उलटत नाहीत तोच नव्या वादावर नवा पडदा टाकायची वेळ दादांवर यावी आणि त्यांच्या पक्षाला कानकोंडेपणाने सारवासारव करण्याची कसरत करावी लागावी हे बहुधा नेहमीचेच होणार असल्याने, दादा आज काय बोलतात याचा मागोवा घेणे हे आता पक्षप्रवक्त्यांचे प्रात:कर्म होणार अशी चिन्हे आहेत. तसेही, इतर राजकारण्यांप्रमाणेच, दादांनाही एक मार्ग मोकळा आहे. ‘आपण असे बोललो नव्हतो’, ‘आपल्या बोलण्याचा तो उद्देश नव्हता’, किंवा ‘त्यामागे कोणताही राजकीय हेतू नव्हता’ अशा काही नियमित वाक्यांपैकी एखादे वाक्य सोयीनुसार वापरले की पडदा पडतो, हे दादांसकट सर्वानाच माहीत असल्याने, मनाला वाटेल तेव्हा मनाला येईल ते बोलावे, हे आता सरसकटच झालेले आहे. गंमत अशी, की मातृभाषेत असे काही बोलले, की आपण नेमके काय बोललो ते जनापासून लपविले तरी किमानपक्षी मनाला तरी नेमके माहीत असते. जी भाषा आपली नाहीच, त्या भाषेत बोलणे म्हणजे अवघड जागीचे दुखणे! पण सत्तेवर असल्यावर अशी दुखणी हसतमुखाने झेलावीत, ती परतवून लावावीत यातच खरा पुरुषार्थ असतो हे दादांनी दाखवून दिले. कर्नाटकातील एका अत्यंत दुय्यम कार्यक्रमात दादा मित्रप्रेमापोटी सहभागी होतात काय, तेथे देवनागरीमध्ये लिहून दिलेल्या कागदावरचा कानडी मजकूर वाचून भाषणाला टाळ्या घेतात काय आणिपुढे त्या वाक्यावरून वादंग माजताच, आपल्या वक्तव्यामागे राजकीय हेतू नव्हता असे जाहीर करून सोबतचा पडदा त्या वाक्यावर टाकतात काय, सारेच मोठे गमतीदार झाले.. राजकारणी लोक विनोदी नसतात असे भासविले जाते. ज्यांची राजकीय जबाबदारी मोठी, ते तर अधिकच गंभीर असतात, असेही म्हणतात. पण या गंभीरपणाला थोडी विनोदाची झालर लावली, तर जबाबदारी हसत हसत पेलता येते हे बहुधा दादांनी दाखवून दिले. गेल्या काही दिवसांत त्यांनी विनोदाचे असेच काही चौकार मारून सीमारक्षणासाठी पक्षातील इतरांना  पळापळ करावयास लावले, ते पाहता, अशा विनोदांची आणखी कित्येक कारंजी या रसवंतीच्या मुखावर थुईथुई करण्यासाठी उत्सुक असावीत असेच वाटावे.. कर्नाटक हे महाराष्ट्राचे सख्खे शेजारी राज्य! या राज्याशी नाते असलेला कानडा विठ्ठलू महाराष्ट्राचे दैवत. पण त्या भाषेचा चक्रव्यूह भेदून त्यातून सुखरूप बाहेर पडणे काही येरागबाळ्याचे काम नव्हे, हे आता दादांच्या लक्षात आले असेल. आपण तसे बोललोच नव्हतो, असे म्हणण्याचे सारे मार्ग जेथे खुंटतात, तेथे सपशेल माघार घेण्यावाचून गत्यंतर नसते. केवळ हौसेपोटी कानडीतून केलेल्या भाषणाने दादांनी टाळ्या तर मिळविल्या; पण महाराष्ट्र-कर्नाटकाचे सौख्याचे नाते पाहता, आपण कर्नाटकाचे गौरव गीत गायिले हे त्यांना कळलेच नाही. समोर आलेला कागद कोणतीही शहानिशा न करता वाचून दाखवत टाळ्या मिळविण्याच्या नादात, ‘दादां’चा ‘मामा’ कधी झाला, हेही त्यांना कळले नाही. आता वाद तर होणारच  आणि पडदा तर टाकावा लागणारच!