तसे (किंवा फॉर दॅट म्याटर कसेही) पाहू जाता, हल्ली आंब्याचा असा एकच एक मोसम राहिलेला नाही. म्हणजे पूर्वी पाहा एक कायद्याचा नियमच होता, की केवळ उन्हाळ्याच्या सुटीतच कोकणच्या राजाने झिम्मा खेळावा. तो नियम तशा अनेक नियमांप्रमाणे केव्हाच गारद झाला आहे. त्यालाच तर प्रगती म्हणतात. तेव्हा कोकणच्या प्रगतीचे काही माहीत नाही, परंतु त्या राजाने चांगलाच म्हणजे अगदी ‘जीआय टॅग’ प्राप्त करण्याइतका विकास साधलेला आहे. आजकाल तर चोवीस गुणिले सात (हे हल्लीचे काळाचे मापटे!) आंबा पिकलेलाच असतो, रस गळतच असतो. त्या रसप्राशनाच्या छंदाने लोकांच्याही जिवाला अगदी पिसे लावलेले आहे. सतत नवनवा आंबा हवा असतो चोखण्यासाठी त्यांना. तो नाही मिळाला तर चुकल्याचुकल्यासारखे वाटते त्यांना. आणि त्यात त्यांचे काही चुकले असे कसे म्हणावे? आयुष्य सुकलेल्या कोयपाटासारखे असते अनेकांचे. जीवन नीरस असते अनेकांचे. त्यात रस भरण्यासाठी आंबा हवाच.  कर्म कितीही करा एरवी कोणत्याही फळाची अपेक्षा करणे फोलच असते हे जाणतात ते. पण म्हणूनच त्यांना हे फळ हवे असते. ते अगदी डोळ्यांनी, मेंदूने, काळजाने चोखावे.. तरोताजा व्हावे. त्यावर भरभरून बोलावे, चर्चा करावी. जे हे आमसूत्र जाणतात, त्यांना लोकांना खूश ठेवण्यासाठी अन्य काही करावेच लागत नाही. पण हेही सोपे नसते. त्याकरिता सतत पुरवठा करावा लागतो पिवळ्याधम्मक, रसाळ, मोहक आंब्यांचा. हापूस, केसर, पायरी, दशेरी, लंगडा, नीलम, तोतापुरी, नागीण, बारशा, खोबऱ्या, झालेच तर गोवा मानकूर, रत्ना, मल्लिका, सुवर्णरेखा.. अगदी गावरानही.. पण आंबा सतत समोर हवाच. आता तो हवा तेव्हा आणायचा कसा बॉ, असे एक भाबडे सवालियां निशान काहींच्या मनात फडफडू लागेल. परंतु सुजनहो, कधी तरी ही आम्रकथा नीटच परीसा बरे. देशोदेशीच्या आमसूत्रकारांनी, आम्रव्यापाऱ्यांनी एक शास्त्रच विकसित केले आहे त्याचे. कोणत्या वेळी कोणता आंबा चोखण्यासाठी द्यायचा हे बरोबर माहीत असते त्यांना. त्याची रीत अशी, की योग्य वेळ येताच दगड मारून कैरी पाडावयाची.  त्या उपयुक्त नसतील, तर मारावेत दगड. साधारणत: आंबा पिकण्याची एक नैसर्गिक प्रक्रिया असते. पण आम्रव्यापाऱ्यांना तेवढे थांबता येत नसते. ते सरळ कृत्रिमपद्धतीने कैरीचा आंबा करतात. त्यासाठीची रसायने बाजारात उपलब्ध असतातच. कोणी कॅल्शियम कार्बाइडचे खडे वापरतात, तर कोणी इथिलिनच्या गॅसचेंबरमध्ये ठेवतात. कोणी त्यावर बेथिलीन फवारते, तर कोणी त्याला आणखी कसली कसली हवा देते. या सगळ्यांचा धर्म एकच – कोणत्याही आंब्याला पाहता पाहता पिकवणे.. म्हणजे काय, तर तो पिवळाधम्मक दिसेल, लोकांना त्याचा मोह पडेल असे पाहणे. एकदा माणसांच्या डोळ्यांत तो रंग उतरला की काम झाले.. त्या रंगातच ते झिम्मा खेळू लागतात. आंबा पिकतो एवढेच त्यांना दिसते, त्यातून कोणता रस गळतो याचेही भान उरत नाही.. पण ‘चोवीस गुणिले सात’ उपलब्ध करून दिले जाणारे हे आंबे कितीही मोहक, कितीही रसाळ असले, तरी आपण लक्षात ठेवायला हवे, की त्याने कर्करोग होण्याची शक्यता असते.. कर्करोग मनांचा.. समाजाचा..