राजकारणात पक्के मुरल्याखेरीज त्या खेळात पडू नये हे राज्यमंत्री दिलीप कांबळे यांना एव्हाना कळून चुकले असेल, अशी त्यांच्या पक्षातील अन्य वाचावीरांची समजूत साफ खोटी ठरली आहे. कारण, ‘हम भी कुछ कम नहीं’ हे दिलीपरावांनी पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. सहा महिन्यांपूर्वी दिलीपरावांनी (सुप्त) भावनेच्या भरात केलेले एक वक्तव्य अंगाशी आल्यावर मागावी लागलेली माफी आणि करावी लागलेली कसरत यांचा त्यांना एवढय़ातच विसर पडला असेल, तर अशा येरागबाळ्यांनी राजकारणात राहू नये असेही राजकारणातील इतर सर्कसवीरांना वाटू लागले असेल. ‘आपण कुणालाही घाबरत नाही, कारण घाबरायला मी काही ब्राह्मण नाही,’ असे बोलून दिलीपरावांनी आपल्या ‘सामाजिक न्याय’ राज्यमंत्रिपदाची शान पणाला लावली होती. आपण कुणालाच घाबरत नाही अशी समजूत असलेले अनेक जण वादात अडकल्यानंतर पद गमावण्याच्या भयाने तरी राजकारणात प्रसंगी माघारही घेतात. गेल्या मार्चमध्ये दिलीपरावांनी आपल्या विचारवृक्षावरील ही मुक्ताफळे स्वैरपणे समाजात भिरकाविली आणि मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या कानपिचक्या झोंबल्यावर सपशेल माफी मागून माघार घेतलीदेखील होती; पण काहींचा पिंड शहाणपणात रमतच नसावा. दिलीपरावांचाही नाइलाजच होत असावा. राज्यमंत्री असूनही मनात धुमसणारे सळसळते विचार व्यक्त करण्याची संधी क्वचितच मिळत असल्याने, कधी एकदा व्यासपीठ मिळते आणि आपण ‘बातमी’त येतो असे त्यांनाही वाटतच असावे. तब्बल सहा महिन्यांनंतर तशी संधी मिळाल्यामुळे बहुधा त्यांचे रक्त पुन्हा उसळलेच. ‘कायद्यातील ज्या कलमाच्या आधारे छगन भुजबळ यांना कायद्याच्या कचाटय़ात अडकविण्यात आले, ते कलमच रद्द झाल्यामुळे भुजबळ जामिनावर सुटतील’, असा दावा करून दिलीपरावांनी आपल्या वैचारिक उत्साहाला पुन्हा वाट करून दिली आहे. ‘समाजासाठी ते बाहेर असणे गरजेचे आहे’, असेही दिलीपरावांना वाटते. आता अशा गरजा लक्षात घेऊन कायदे व्हायला हवेत, असा एक सूचक संदेशच दिलीपरावांनी आपल्या अभ्यासू वक्तव्यातून दिला आहे. आपल्या राज्यमंत्रिपदामध्ये ‘न्याय’ असा शब्द असल्याने, कायदे व न्याय यांबाबत बोलण्याचा आपल्यास अधिकार असल्याची त्यांची समजूत असावी. ‘पूर्वजन्मीच्या पापाची फळे याच जन्मात भोगावी लागतात’ असे एक बेभान विधान करून दोनचार दिवसांपूर्वी आसामच्या आरोग्यमंत्र्यांनी आपल्या वक्तव्याची फळे लगेचच भोगली होती. पूर्वी एक बरे होते. ‘आपण असे बोललोच नाही’ असे ठोकून देण्याची सोय होती. आता कॅमेरे पाठीशी लागल्यापासून ती सोय संपली. त्यामुळे, ‘आपल्या बोलण्याचा विपर्यास केला गेला’ असे बोलून वेळ मारता येत असली तरी दिलगिरी चुकविता येत नाही. छगनरावांच्या जामिनावर सुटकेबाबत केलेल्या वक्तव्यानंतर उद्या वाद उफाळलाच, तर माफी मागून वक्तव्य मागे घेण्याची दिलीपरावांची ही दुसरी वेळ ठरेल. असे जेव्हा वारंवार होईल, तेव्हा ते राजकारणात मुरले असे म्हणता येईल. तोवर ते कच्चे लिंबूच राहणार!