मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्लीचा झंझावाती दौरा करून मुंबईत पोहोचले आहेत. वेगवेगळ्या सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, ते दहा मिनिटे, तीस मिनिटे, पंचेचाळीस मिनिटे पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले. आपापल्या आवडीनुसार मिनिटे निवडण्याची मुभा सूत्रांना देण्यात आलेली आहे! या गाठीभेटीची वाच्यता ठाकरेंनी कोणा म्हणजे कोणाकडे केली नव्हती, असे म्हणतात. खरे तर त्यांच्याबरोबर दोन मंत्री होते; पण त्यांनाही भेटीची माहिती नव्हती. ते दोघे ९० मिनिटांच्या अधिकृत बैठकीत मात्र उपस्थित होते. ठाकरे-मोदी यांची एकांतातील बैठक या दोन मंत्र्यांचा डोळा चुकवून झाली म्हणतात. या फावल्या वेळात या मंत्र्यांनी काय केले याचा सविस्तर तपशील सूत्रांकडे आला आहे. हे मंत्री आनंदाने आणि कौतुकाने पंतप्रधान निवासातील मोर पाहण्यात गुंग होते, तेवढ्यात ठाकरे-मोदी एकांतातील बैठक झाली… याआधी मोदींशी झालेल्या अधिकृत बैठकीत बारा मुद्दे मांडले गेले, त्यातील मराठा आरक्षणाचा विषय संवेदनशील आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती हे दिल्लीत येऊन मोदींना भेटण्यापूर्वीच ठाकरे व त्यांच्या दोन वेगवेगळ्या पक्षांतील मंत्र्यांनी मोदींची भेट घेतली. पण त्यांच्या हाती काय लागले, हे कळलेले नसून सूत्रे ही माहिती खोलात जाऊन शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. ‘तुम्ही बारा पत्रे दिली आहेत, ती वाचतो मग बघू काय करता येईल,’ असे मोदींनी थेट सांगून टाकले म्हणतात.

सूत्रांना आणखी एक माहिती मिळाली आहे की, मोदी हे नवाझ शरीफ नव्हेत! मोदी स्वत:हून शरीफांना पाकिस्तानात भेटायला गेले होते, ही बाब ठाकरे यांना थोडी उशिरा कळली असे म्हणतात. महाराष्ट्र सदनात पत्रकारांना ठाकरे म्हणाले की, आम्ही तिघे भेटलो ना मोदींना, पुन्हा भेटेन, गैर काय?… हे सांगताना सूत्रांना कळलेल्या दहा मिनिटे, तीस मिनिटे, पंचेचाळीस मिनिटांच्या एकांतातील बैठकीबद्दल काहीच बोलले नाहीत. सूत्रांच्या माहितीनुसार, दहा मिनिटांच्या बैठकीत त्यांनी मोदींना मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवा, अशी विनंती केली. तीस मिनिटांच्या बैठकीत स्फोटकांचे प्रकरण दमाने घ्या असे ते म्हणाले. पंचेचाळीस मिनिटांच्या बैठकीत पुन्हा एकत्र यायचे का, अशी विचारणा केली. ठाकरे महाराष्ट्र सदनात येईपर्यंत सूत्रांची ही माहिती उघड झालेली होती. सगळेच अचंबित झाले, त्यात ठाकरे स्वत:देखील होते. एकाच वेळी मी तीन-तीन बैठका एकांतात घेतल्या तरी केव्हा, अशा प्रश्नार्थक चेहऱ्याने ते बघत राहिले असे म्हणतात.

सूत्रांच्या म्हणण्यानुसार, आता महाराष्ट्रात राजकीय नाट्य रंगणार! गेल्या आठवड्यातही सूत्रांनी एकनाथ खडसे हे देवेंद्र फडणवीसांना भेटल्याची माहिती दिली होती, मग खडसे ‘सिल्व्हर ओक’वर शरद पवारांना भेटले होते, ते तिथून जाताच फडणवीस हे पवारांच्या भेटीला आले होते. तेव्हा राजकीय नाट्य घडणार असे सूत्रे म्हणत होती. दीड वर्षापूर्वी पवार-मोदींच्या बैठकीतील माहितीदेखील सूत्रांनी हातोहात मिळवली होती. त्याची सविस्तर चर्चा पुन्हा कधी तरी; पण तेव्हा वेगळाच राजकीय स्फोट झाला होता. मोदी-पवार भेटीचे पर्यवसान राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन होऊन ठाकरे मुख्यमंत्री बनण्यात झाले होते.

दोन-तीन महिन्यांपूर्वी पवार- शहा-अदानींच्या कथित भेटीचीही माहिती सूत्रांनी मिळवली होती. राजकीय नाट्याचा अंदाज तेव्हाही सूत्रांनी व्यक्त केला होता. हे तिघे दिल्लीत न भेटता अहमदाबादेत का भेटले, याची माहिती सूत्रे अजून घेत आहेत. आत्ताही सूत्रांनी ठाकरे-मोदी भेटीची माहिती गोळा केली आहे. आता महाराष्ट्रात राजकीय नाट्य काय घडणार याची माहिती घेण्यासाठी सूत्रांचे काम सुरू असून, तोवर घेऊ या एक ब्रेक!