News Flash

राष्ट्रभक्तीची शाळा

सारा कचरा साफ करण्यासाठी त्यांच्या मेंदूत राष्ट्रभक्तीचे औषध फवारणे आवश्यकच असते.

चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग

शाळा, महाविद्यालये, संशोधन संस्था यांतील बुद्धिजीवींमधील राष्ट्रभक्तीची पवित्र भावना अधिक प्रज्वलित करण्याकरिता खास वर्ग चालविण्यात येणार आहेत, हे वृत्त वाचले आणि आमच्या लहान व मोठय़ा अशा दोन्ही मेंदूंमध्ये शब्दश समाधानाच्या झिणझिण्या उठल्या. तसे पाहता आम्हांस हे सरकार, त्याचे ते हुकूमशाही प्रवृत्तीचे नेते कणमात्र आवडत नाहीत. त्यांची ती भाषणे, ती गरिबांप्रतिची ढोंगी सहानुभूती, गोतगणंगांची धन करणारी त्यांची ती धोरणे, त्या गाजरछाप योजना, त्यांचा तो प्रचार, ते जुमले.. घृणा येते आम्हांस या साऱ्यांची. आणि का न यावी? शत्रू नंबर एक आहे ते सरकार आपले. आठवा आठवा, तो पंचशील करार, ते ६२चे युद्ध, ते डोकलाममधील आक्रमण.. पण तरीही आज आम्हांस त्या सरकारचे, त्यांचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांचे आणि ही राष्ट्रभक्तीच्या वर्गाची योजना जाहीर करणाऱ्या चिनी कम्युनिस्ट पार्टीचे कौतुकच करावेसे वाटते. किती छान आहे ही कल्पना. राष्ट्रभक्तीचे वर्ग.. तेही बुद्धिजीवींसाठी. फार भयंकर असतात हे बुद्धिजीवी. विचार करतात. प्रश्न विचारतात. मानवता, मानवाधिकार, व्यक्ती, स्वातंत्र्य, समता.. काय काय भरलेले असते त्यांच्या त्या इवल्याशा मेंदूंमध्ये. सारा कचरा साफ करण्यासाठी त्यांच्या मेंदूत राष्ट्रभक्तीचे औषध फवारणे आवश्यकच असते. हे औषध इतके प्रभावी असते, की त्याने माणसांच्या झुंडीच्या झुंडी हव्या तशा, हव्या तिकडे वळवता येतात. ते या बुद्धिजीवींना देणे हे राष्ट्रकार्यच ठरते कोणत्याही सरकारचे. चीनमध्ये हेच करण्यात येत आहे हे पाहून, खरे सांगतो, आम्हांस अगदी गदगदूनच आले. चिन्यांची असली म्हणून काय झाले, पण त्यांची ती राष्ट्रप्रेमाची भावना पाहून आमच्या पापण्यांत पाणीच तरळले आणि पुन्हा खरेच सांगतो, आमच्या ज्ञानचक्षूंसमोर त्या राष्ट्रभक्ती वर्गाचे चिनीचित्रच उभे राहिले.. ते सगळे बुद्धिजीवी असे पांढरा सदरा, खाकी अर्धी विजार अशा गणवेशात आहेत. आधी चिनी राष्ट्रभक्तीपर गीते. मग गोष्टींचा तास. त्यात क्षी जिनपिंग लहानपणी कसे मगरीशी लढले, माओजींनी कसे गरिबीत दिवस काढले व नंतर ते कसे गरिबांचे कैवारी बनले वगैरे गोडगोड गोष्टी.  मग ड्रॅगनमाता की जय, चिनी माता की जय अशा घोषणा.. की मग सर्व बुद्धिजीवी विद्यार्थी एका रांगेत वर्गात दाखल. तास पहिला. यात ‘नेता हेच राष्ट्र’ हा धडा. राष्ट्राला काही चेहरामोहरा नसतो. तेव्हा त्याची सगुणभक्ती करणे बुद्धिजीवींना जमत नाही. म्हणून राष्ट्राला नेत्याचा चेहरा द्यायचा.. की सारे कसे सोप्पे. तास दुसरा. सकारात्मकतेचा. भ्रष्टाचार, वशिलेबाजी, घोटाळे, गैरकारभार, महागाई अशा विषयांवर बोलणे हे कसे नकारात्मक असते हे यात शिकविले जाते. तास तिसरा. हा खेळाचा तास. बुद्धिजीवींनाच काय, सर्वानाच पुस्तकांतून बाहेर आणणे गरजेचे असते. त्याशिवाय माणसे रांगेत व रांगत चालू शकत नाहीत. तेव्हा या तासामध्ये खेळ खेळावा आंधळ्या कोशिंबिरीचा. पुढे पुढे सर्वानाच त्याची सवय लावावी. एवढी की डोळ्यांवर पट्टी लावली तरी आपण पाहतोय असे त्यांना वाटले पाहिजे.. असे अनेक विषय आहेत. त्यातील अनेक असेही शिकविले जातातच कळत-नकळत. पण तरीही अशी शाळा हवीच राष्ट्रभक्तीची. ती चिनी असली, तरी आसूडधारी सरकारचा पाया भक्कम करते..

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 10, 2018 1:04 am

Web Title: china plans patriotism classes for intellectuals
Next Stories
1 न खाने दूंगा..
2 सारे काही तेच ते..
3 महागुरू..
Just Now!
X