या जगात अनेक गोष्टी आपल्याला हव्या असतात, पण हाताला लागत नाहीत. मग त्या गोष्टी स्वप्न होऊन मनात रुंजी घालत राहतात. रिकामा वेळ असला, की स्वप्नांची पोतडी उघडतो, आणि ते आवडते स्वप्न पाहू लागतो. मुंबई-दिल्लीसारख्या महानगरातील मध्यमवर्गीय माणूस असे एक स्वप्न नेहमीच पाहात असतो.. एखाद्या उंच इमारतीच्या पंचविसाव्या मजल्यावर त्याचे स्वप्नातले आलिशान घर असते. एखाद्या रविवारच्या निवांत सकाळी वाफाळत्या चहासोबत वर्तमानपत्रे वाचताना तो उंचावरून खिडकीबाहेर नजर फिरवतो, आणि दूरवरच्या डोंगरावरची हिरवाई त्याला स्पष्ट दिसू लागते.. दुसऱ्या खिडकीतून लांबवर चमचमणारी क्षितिजरेषा त्याला भुरळ घालत असते. हे सारे त्याला एवढे स्पष्ट दिसू लागते, की आपण स्वप्न पाहात आहोत याचाच विसर पडतो. क्षणभरानंतर जाग येते आणि भानावर येऊन आजूबाजूस पाहातो. तो आपल्याच खुराडय़ाएवढय़ा घरात वर्तमानपत्र चाळत सकाळचा चहा घेत असतो. मग त्याच घराच्या खिडकीच्या चौकटीतून बाहेरचा सवयीचा निसर्ग न्याहाळून क्षणापूर्वीच्या स्वप्नातला तो निसर्ग शोधण्याचा प्रयत्न करू लागतो. पण बाहेर सारे धुरकट धुक्याच्या पडद्याआड झाकोळलेले असते. तो डोळे फाडून त्या पडद्याआडचा डोंगर शोधू लागतो. तो दिसेनासा झालेला असतो. खिडकीबाहेरचे नेहमीचे ते खरे चित्रच प्रदूषित धुराच्या पडद्याआड धूसर झालेले असते. आपण जागे आहोत आणि पूर्ण भानावर आहोत याची खात्री करून घेण्यासाठी डोळे चोळू लागतो, आणि अचानक डोळे चुरचुरू लागतात. धुरक्याचा एक लोट घरात घुसून श्वास घुसमटू लागतो. खिडकीतून जेमतेम दिसणाऱ्या रस्त्यावर भर दिवसा दिव्यांची धूसर रांग सरकू लागते, आणि दिल्लीची आठवण होते. गेल्या तीन वर्षांपासून पारदर्शकतेचा नारा घुमत असताना, अचानक सर्वत्र असे धूसर का व्हावे असा प्रश्न पडतो, आणि गोंधळून तो स्वतलाच एक चिमटा काढतो. आपण आहोत तिथेच, मुंबईतच आहोत, हे त्याच्या लक्षात येते. धुरक्याच्या पडद्याआड दिल्ली काय आणि मुंबई काय, दोन्ही सारखेच, याचा एक ‘दिव्य साक्षात्कार’ त्याला होतो, आणि या गोंधळलेल्या अवस्थेतून बाहेर पडून वास्तवात यावे या अपेक्षेने तो रेडियो सुरू करतो, तोच एका वास्तवाची साक्ष पटते. आज रविवार आहे, हे लक्षात येते. मग तोच, ओळखीचा, ‘सारे काही पारदर्शक आहे’, याची ग्वाही देणारा तो सूर त्याच्या कानावर पडतो, आणि तो पुन्हा खिडकीतून बाहेर डोकावतो. खिडकीतून नेहमी दिसणारा तो दूरवरचा डोंगर धुरक्याच्या पडद्याआड धूसरच झालेला असतो.. स्वयंपाकघरातून एक चिडका सूर उमटतो, ‘कुठे आहे ती पारदर्शकता?’.. मग तो स्वतचीच समजूत काढतो, ‘सूर्य डोक्यावर आला, की आपोआप धुरके निवळेल आणि सारे काही पारदर्शक होईल.’ मग दुपारकडे कलणारा सूर्य तो खिडकीच्या चौकटीतून शोधू लागतो..