साहित्य संमेलनाच्या संवादमंचावर राजकीय नेत्यांना स्थान असावे की नाही, हा संमेलनांच्या परिसंवादांमधील शाश्वत प्रश्न असला, तरी राजकीय नेत्यांच्या मंचावर साहित्यशारदेला स्थान मिळावे यापरते दुसरे समाधान नाही. कमी बोलायचं आणि जास्त काम करायचं ही आपल्या साधुसंतांची शिकवण आहे. हा खरे तर सगळ्याच राजकीय नेत्यांनी आचरणात आणावा असा मुद्दा.. आम्ही तो कसा अमलात आणतो आहोत, हे सांगण्यासाठी जास्तीत जास्त वेळ बोलत राहणारा एखादा नेता जेव्हा राजकारण किंवा सत्ताकारणाच्या मंचावर दिसतो, तेव्हा त्यास अधिवेशन म्हणावे, कवी संमेलन म्हणावे, साहित्य संमेलन म्हणावे, की अभंग-भारुडाने भारलेला ‘संतसंग’ आहे, हेच कळेनासे होते. महाराष्ट्राच्या विधिमंडळ सभागृहात दीर्घ काळानंतर असाच एक प्रतिभेचा मोहोर फुलला.. ज्ञानदेवांपासून गाडगेबाबा आणि तुकडोजी महाराजांच्या संतवचनांनी सभागृहाचे वातावरण भक्तिरसात न्हाऊन निघाले. उद्याचा महाराष्ट्र कसा असावा, सरकार त्यासाठी नेमके काय करणार आहे, सरकारकडे कोणता कार्यक्रम आहे, या प्रश्नांची उत्तरे सभागृहात ज्यांच्याकडून मिळावयास हवीत, त्यांनी ‘देसाई ते कसाई’ यांसारख्या कोटय़ांचा आणि अधूनमधून यमकांचा उत्फुल्ल वापर करत संतवाणीतून महाराष्ट्राच्या भविष्याचे चित्र रंगविण्याचा केलेला प्रयत्न उत्तरांच्या शोधातील जनतेला बुचकळ्यात टाकणारा असला, तरी बगल देण्याच्या खेळातील आगळा प्रयोग म्हणावा लागेल. या सभागृहाने राजकीय चातुर्याने भारलेली भाषणे असंख्य ऐकली. पण अभंग, भारुडे आणि पुराणकथांचे दाखले देत केवळ जनतेच्या मनास स्वतभोवती गरगर फिरविण्याचे चातुर्यदर्शन बहुधा प्रथमच महाराष्ट्रासमोर आले. दोनशे, तीनशे, चारशे वर्षांपूर्वी संतांनी जे सांगून ठेवले, ते उद्याच्या महाराष्ट्राला आजही मोलाचे मार्गदर्शक आहे, हा त्रिकालाबाधित वास्तव असलेलाच साक्षात्कार जणू नव्याने सभागृहाच्या माध्यमातून समाजास होणे हा प्रतिमानिर्मितीचा अव्वल प्रतिभायोग म्हणावा लागेल. संतवचनांच्या गुलदस्त्यात समस्यांची उत्तरे बेमालूम दडविण्याचा प्रयोग करणाऱ्या मुख्यमंत्र्यांचे त्यासाठी कौतुक करावयास हवे.  घरातल्या घरात ट्रेडमिलवर चालण्याचा व्यायाम करताना, भरपूर चालणे संपले तरी आपण ज्या जागी आहोत तेथेच असतो. मुख्यमंत्र्यांचा हा दाखला ज्यांनी त्यांच्या भाषणाच्या सुरुवातीस ऐकला, त्यांना मुख्यमंत्र्यांचे भाषण संपल्यावरही त्याच दाखल्याची आठवण झाली असेल. राज्यपालांच्या अभिभाषणावर एवढे प्रतिभासंपन्न भाषण सभागृहाने आणि राज्याने बहुधा प्रथमच ऐकले असेल. त्या भाषणात इतिहास होता, पुराणातील वानग्या होत्या, थोडासा भूतकाळही होता. या साऱ्यांची बेमालूम सांगड घालत स्वप्रतिमानिर्मिती करणे हे कसरतीचेच काम! ती कसरत साधण्याचा प्रयत्न ज्या कौशल्याने मुख्यमंत्र्यांनी केला, ते पाहता महाविकास आघाडी सरकार कोणत्या दिशेने वाटचाल करणार, याकडे राज्यातील तमाम जनता आता कायम कमालीच्या उत्सुकतेने केवळ नजरा लावून बसणार यात शंका नाही. ज्ञानेश्वर, गाडगेबाबा, तुकडोजी महाराजांच्या उपदेशवाणीचा उच्चार मुख्यमंत्र्यांच्या मुखातून झाला आणि राजकारणापलीकडचे भारूड सभागृहाच्या माध्यमातून समाजास ऐकावयास मिळाले, हा महाराष्ट्राचा भाग्ययोगच! प्रतिभेलाही कधी कधी पाहुणेपणाच्या भावनेने संकोच वाटावा अशा या प्रांगणात काव्यशास्त्रविनोदाची अशी पखरण होत असताना, ‘नका होऊ अधीर, झालात तुम्ही बेकार, म्हणून अजब वाटते आमचे सरकार’ अशा ‘चारोळ्या’ ऐकताना, अशाच प्रतिभेने अधूनमधून बहरलेले संसदेचे सभागृह ‘आठवले’, तर त्यात वावगे काहीच नाही..