अलीकडे जगभरातच, राजकारणाकडे पाहण्याबाबत समाजाच्या मनात गांभीर्याचा एकूणच अभाव असावा असेच वातावरण दिसत आहे. आधीच निरुत्साह आणि त्यात निवडणुका, म्हणजे तर गांभीर्य या शब्दाचेही गांभीर्य संपून जावे अशी स्थिती.. कदाचित, आपल्याकडे मतदान यंत्रावरील नोटा नावाच्या पर्यायास मिळणारा वाढता पाठिंबा हा त्याचाच परिणाम असावा. अन्यत्र अशी काही सोय असते किंवा नाही याचा शोध घ्यावा लागेल. निवडणुका म्हणजे, इथून तिथून सारे काही सारखेच वाटावे असेच सगळीकडचे वातावरण. त्यामुळे निवडणुकांमध्ये काही नेमकी साम्यस्थळे आढळणे हेदेखील अपरिहार्यच. खरे तर युक्रेन हा आपल्या राजकीय औत्सुक्याचा विषय नाही, पण काही बाबींमुळे युक्रेनकडे जगाचे लक्ष लागले तसे आपलेही लक्ष लागेल हे मात्र खरे. तेथेही सामान्य जनतेने निवडणुकांतील विनोदाचे गांभीर्य ओळखले असावे. अलीकडे नेते आणि अभिनेते यांच्यातील अंतर फारच कमी होत आहे, हे निवडणुकांच्या राजकारणातील सार्वत्रिक साधम्र्य असल्यामुळे, युक्रेनी मतदारांनी राष्ट्राध्यक्षपदासाठी एका विनोदवीराची निवड करून हे अंतर पुसूनच टाकले. युक्रेनच्या दूरचित्रवाणी मालिकांवर राष्ट्राध्यक्षपदाची भूमिका करताना आपल्या विनोदबुद्धीने प्रेक्षकांना हसवणारा विनोदवीर प्रत्यक्षात राष्ट्राध्यक्ष झाला!

राजकारणात विनोदवीरांना गांभीर्याने घेण्याची समाजाची मानसिकता जागतिक स्तरावर वाढत चालली आहे, हे या निवडणुकीने अधोरेखित केले असे मानावयास हरकत नाही. युक्रेनच्या अध्यक्षपदी प्रचंड मतांनी विजयी झालेला विनोदवीर अभिनेता व्लोदिमीर झेलेन्स्की याच्या पक्षाचे नावही, सर्व्हट ऑफ द पीपल पार्टी असेच आहे.. आपल्या भाषेत, जनसेवकांचा पक्ष! सहाजिकच, या पक्षाचा नेता, म्हणजे जनतेच्या सेवकांचा नेता म्हणून झेलेन्स्की हा तेथील ‘प्रधान सेवक’ ठरतो. योगायोगाने याच नावाच्या तेथील एका चित्रवाणी मालिकेत, अनपेक्षितपणे राष्ट्राध्यक्ष झालेल्या शिक्षकाची भूमिका वठविणाऱ्या झेलेन्स्कीने वास्तवातील राष्ट्राध्यक्ष-निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर करून पेट्रो पोरोशेन्को या मावळत्या अध्यक्षांस पहिला हादरा दिला. आता पराभव स्पष्ट झाल्यानंतर पोरोशेन्को यांच्या भावना लपून राहिलेल्या नाहीत. आपण पदावरून दूर होत आहोत, राजकारणापासून नाही.. हे त्यांचे मत त्यांच्या आशावादाचे द्योतक मानले पाहिजे. वास्तवातील देशाच्या प्रमुखपदाचा कारभार हाकण्याचा कोणताही अनुभव गाठीशी नसलेल्या झेलेन्स्कीने प्रचारादरम्यान फक्त आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत, आपणास काहीही अशक्य नाही, असा जोरदार दावा केला, आणि प्रचाराच्या भाषणांत, ध्वनिचित्रफितींमध्ये, ‘मित्रहो’ अशी साद घालत विनोदांची पखरण केली. अगोदरच हास्य हरवलेल्या असंतुष्ट जनतेस त्याचीच भुरळ पडली. आपल्या अभिनयाने छोटा पडदा गाजविणारा विनोदवीर वास्तवातील भूमिका वठवण्यासाठी राजकारणाच्या रंगभूमीवर उतरला आहे.. तेही, त्या देशापुढील कोणत्याही महत्त्वाच्या  प्रश्नावरील भूमिका स्पष्ट न करता!  पुढच्या पाच वर्षांत त्याचे काय होणार, याची कल्पना करणे अलीकडच्या जागतिक राजकारणाच्या वातावरणात अगदीच अशक्य नाही.