देशाच्या समर्थ नेतृत्वाकडून राजधानीत काही दिवसांपूर्वीच स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रीय झोप नियंत्रण कक्षात गोव्यातून आलेल्या एका बातमीने खळबळ उडवून दिली. प्रगती साधायची तर प्रत्येक व्यक्ती कार्यक्षम होऊन उत्पादकता वाढणे गरजेचे. हे घडवून आणायचे असेल तर आळसाला निमंत्रण देणारी झोप कमी करणे आवश्यक, असा नवा व ओजस्वी विचार नेत्याने मांडल्यानंतर सरकारने तातडीने या कक्षाची स्थापना केली. ‘देशवासीयां’च्या झोपेच्या वेळांचा अभ्यास करून, ती कमी कशी करता येईल यावर उपाय सुचवणे, ही कामे या कक्षाची. नेतृत्वाने संस्कृतीचा संबंध उत्पादकतेशी जोडत झोपेला लक्ष्य केल्याने सत्ताधारी पक्षाने संस्कृती कक्षाला, कुंभकर्णाच्या सर्व कथा काढून टाकायला लावल्या व त्याऐवजी ससा व कासवाच्या शर्यतीची प्रेरक कथा समाविष्ट करण्याचे आदेश दिले. नेत्याच्या आवाहनानंतर करोडो भक्तांनी

झोप-त्याग करत असल्याचे समाजमाध्यमांतून जाहीर करणे सुरू केले. तोच, ही विरजण घालणारी बातमी आल्याने केवळ कक्षातच नाही तर मंत्रीपातळीवरसुद्धा खल सुरू झाला. ‘कोण हे देसाई? यांचे ‘सर’ फारच तल्लख दिसते’ अशी टिप्पणी एका उत्साही मंत्र्याने केली तरी बाकीचे मंत्री मात्र चिंतेत होते. नेतृत्वाने राष्ट्राला दिलेल्या कार्यक्रमाला टाचणी लावण्याचे काम करणारा हा लहानसा पक्ष कधीकाळी आपल्या सत्तावर्तुळाचा भाग होता असे एकाने लक्षात आणून दिले. देशाचे नेतृत्व सलग १८ ते २२ तास काम करते हा राष्ट्राभिमानाचा विषय ठरला असताना मुख्यमंत्री झालो तर दुपारी दोन तासांची झोप अनिवार्य करू, असे म्हणणाऱ्या या नेत्याने थेट नेत्यालाच आव्हान दिले आहे. त्यामुळे त्याचा बंदोबस्त करणे भाग आहे असा आग्रह काहींनी धरला. संस्कृतीवर भाष्य करण्याचा अधिकार केवळ आणि केवळ सत्ता परिवाराला असताना हा कोण टिकोजीराव लागून गेला, असे एक मंत्री संतापाच्या भरात बोलून गेले. झोपेच्या आमिषाचा वापर करता येतो हे आपल्याला कसे सुचले नाही? आपला पक्षपातळीवरचा समृद्ध संशोधन विभाग झोपा काढतो की काय, अशा शब्दांत दुसऱ्याने त्रागा केलेला. शेवटी गोव्याच्या प्रांतप्रमुखांशी बोलायचे ठरले. त्यांनी आजकाल तो पक्ष आपले ऐकत नाही असे म्हणत हात वर केले. मग खल करणाऱ्या सर्वाना अचानक नितीनभौंची आठवण झाली. तेच तर गोव्याचे प्रभारी. त्यांनी दिग्गीराजाला झोपेत ठेवूनच सरकार बनवण्याची अचाट कामगिरी केली होती. निघण्याच्या आधी एकाने घडय़ाळात बघितले तर दुपारचे तीन वाजलेले. अरे ही तर भौंची वामकुक्षीची वेळ. नंतरचा एक तास कसाबसा काढत सारे त्यांच्याकडे पोहोचले. र्तीपोहे व चहा झाल्यावर विषय ऐकून घेताच भौ मनसोक्त हसले. राज्याच्या सरकारात मंत्री असताना पंतांच्या झोपेमुळे एक कार-प्रकल्प कसा चेन्नईला गेला याची आठवण त्यांना झाली. झोप-विरोधाने पुण्याचीही जागा गमवावी लागेल, अशी भीतीही त्यांच्या मनाला चाटून गेली. दुसऱ्या दिवशी नितीनभौ गोव्यात दाखल झाले. नेत्याच्या राष्ट्रीय कार्यक्रमात अडथळा ठरू पाहणाऱ्या सरदेसाईंची समजूत काढण्यासाठी ते आल्याची वार्ता सर्वदूर पसरली होती. दुपारच्या आरामानंतर त्या दोघांची झालेली भेट अर्ध्या तासात संपली. राष्ट्रहित लक्षात घेत मी ही घोषणा मागे घेतो, असे सरदेसाईंनी जाहीर केले. तोडगा कसा काढला, हे नेतृत्वाने विचारल्यावर ते म्हणाले : ‘वास्को द गामा झोपून राहिला असता तर गोव्याचा शोध लागला नसता’ एवढेच एक वाक्य बोललो!