25 April 2019

News Flash

नैतिक उपोषण!

आमचा हा देश खरे तर उपोषितांचा देश आहे. उपवास करणे ही आमच्या देशाची सांस्कृतिक विरासत आहे.

 

देखो भैया, उपोषण उपोषणात एक फरक असतो. आम्हीसुद्धा हिंदू संस्कृती पाळतो. अधूनमधून मंदिरपर्यटन करतो. आता आम्हाला मंदिराच्या स्थापत्यकलेत तेवढा रस नाही, हे आम्ही मान्य करतो. देखो भैया, हाच त्यांच्यात आणि आमच्यात फरक आहे. आम्ही अशा गोष्टी मान्य करतो. ते मान्य करीत नाहीत.. आम्हाला मंदिरांमध्ये हल्ली फारच रस येऊ लागला आहे. तेव्हा सांगण्याची गोष्ट काय, की आम्ही हिंदू संस्कृती पाळत असल्याने उपोषणाचे महत्त्व आम्हाला चांगलेच माहीत आहे. आमचा हा देश खरे तर उपोषितांचा देश आहे. उपवास करणे ही आमच्या देशाची सांस्कृतिक विरासत आहे. पण खूप दुखाची गोष्ट आहे की आज ही विरासत लोक विसरत चालले आहेत. तो वारसा जागृत करण्यासाठीच आम्ही उपोषणाचा कार्यक्रम आयोजित केला. त्यावरून आमच्यावर काही लोकांनी टीका केली. पण आम्हाला त्याचा राग नाही. कारण आम्ही रागाने नाही, तर प्रेमाने लोकांना जिंकण्यावर विश्वास ठेवतो. ते म्हणतात की आमच्या कार्यकर्त्यांनी उपोषणापूर्वी छोले-भटुरे खाल्ले. भैया, छोले-भटुरेच खाल्ले हे ते असे सांगताहेत की जणू काही अभक्ष्यच खाल्ले. खरे तर अशी टीका करणे हे चूक आहे. आम्ही असे विचारतो, की छोले-भटुऱ्याऐवजी ढोकळा-खाकरा खाल्ला असता तर अशी टीका केली असती का? ही खाद्य विभाजनाची राजनीती आपण चालू देता कामा नये. छोले-भटुरे खाऊन उपोषण करू नये असे कुठे लिहिले आहे का? आज तुम्ही छोले-भटुरे खाऊन उपोषण करण्यावर टीका करता आहात, उद्या  उपोषणाच्या वेळीही छोले-भटुरे खाण्यावर टीका कराल. ही आपली संस्कृती नाही. त्यांच्या उपोषणात उपोषणाच्या वेळी काहीही खात नसतील. पण भैया, ही आपली संस्कृती नाही. उपोषणाच्या वेळी काही पिणे ही आपली संस्कृती आहे. अण्णाजीसुद्धा हेच सांगतील. उपोषणाच्या वेळी काही खाणे ही आपली  संस्कृती आहे. आमचे दिल्लीतील सगळेच नेते हे सांगतील. देखो भैया, आपण जेव्हा एकादशी आणि दुप्पट खाशी असे म्हणतो तेव्हा ही संस्कृतीच पाळत असतो. ही संस्कृती नसती, तर आपल्या देशात बटाटय़ाची भाजी, बटाटय़ाचा कीस, शेंगदाणे, केळी, साबुदाण्याची खिचडी, वडे, झालेच तर उपासी मिसळ असे काही पदार्थ जन्माला आलेच नसते. हे पदार्थ उपासाचे आहेत असे म्हणतात. परंतु भैया, उपास आणि उपोषण यात तसा काय फरक असतो? आमच्या पक्षाची ही नेहमीच भूमिका राहिलेली आहे, की या  देशातील कोणाचेही पोट रिकामे राहता कामा नये. असे असताना उपोषणापूर्वी पोट रिकामे ठेवण्याचा अपराध आम्ही कसा करू? आमचे म्हणणे असे, की परिणामकारक उपोषण व्हावे यासाठी उपोषणकर्त्यांचे पोट हे नीट भरलेलेच असले पाहिजे. उद्या तीन तासांचे आमरण उपोषण केले आणि त्यात कुणाचा भूकबळी  गेला तर  हेच सत्ताधारी लोक संसद बंद पाडतील. तसे  होऊ देता कामा नये. आम्ही त्यांच्याविरोधात सकाळ-संध्याकाळ नाश्ता करून उपोषण  करू. त्यांच्या आयटी सेलला काय म्हणायचे ते म्हणू दे. जसा पराभव हासुद्धा आमचा नैतिक विजय असतो, तसेच भरल्यापोटी उपोषण हे आमचे नैतिक उपोषण आहे.

First Published on April 11, 2018 2:32 am

Web Title: congress hunger strike chole bhature