काँग्रेस पक्षाने मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा काढलेलाच नाही. त्याऐवजी ‘वचनपत्र’ प्रसृत केले आहे. खरे तर ११२ पानांचे पुस्तकच ते. पत्र काय म्हणायचे त्याला? या वचनपत्रातून काँग्रेस नेमका कोणता खेळ खेळते आहे, हे सांगणे भल्याभल्यांनाही अवघड ठरेल. भलेभले लोक केवळ सत्तेतच असतात असेही नाही. त्यामुळे खुद्द काँग्रेसवाल्यांनाही आपल्या या एवढय़ा मोठय़ा वचनपत्राचा हेतू नेमका काय, हे सांगणे अवघडच जाईल, हे नक्की. या वचनपत्रात ‘राज्य सरकारी नोकरांसाठी इलेक्ट्रॉनिक उपस्थितीची पद्धत बंद करणार’ अशा भलत्या मुद्दय़ापासून ते ‘राज्यात विधान परिषद स्थापन करणार’ अशा नेहमीपेक्षा निराळ्या आणि ‘शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंत कर्जमाफी देणार’ अशा नेहमीच्या मुद्दय़ांसह एकंदर ७२ मुद्दे आहेत. त्यात पुन्हा उपमुद्दे.  यापैकीच एक उपमुद्दा आहे तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्या सांस्कृतिक संघटनेच्या कामासाठी यापुढे राज्य सरकारच्या कर्मचारी वा अधिकाऱ्यांना सूट किंवा सवलत मिळणार नाही, असा. शिवाय सरकारच्या मालकीच्या जागांवर रा. स्व. संघाच्या शाखा लावूच देणार नाही, असाही उल्लेख याच ‘४७.६२’ क्रमांकाच्या उपमुद्दय़ात आहे. ‘हे काँग्रेसचे खरे रूप उघड करणारे आहे’, ‘काँग्रेसला सुडाचे राजकारण करायचे आहे’ अशी टीका होते आहेच. पण रा. स्व. संघाशी असे थेट वैर घेतल्यानंतर काँग्रेसला तेथील कुणी ‘हिंदूविरोधी’ असे का बरे म्हणालेले नाही?

नव्हे नव्हे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही केवळ हिंदूंची संघटना नसून भारतीयांची आणि भारतीयत्व जपणारी ती एक सांस्कृतिक संघटना आहे, हे सर्वाना माहीत असतेच. पण खासगीत तरी मध्य प्रदेशच्या काँग्रेस वचनपत्रास कुणी  हिंदूविरोधी म्हणावे.. हे ‘खासगी मत ’ एखाद्या मंत्री वा उच्चपदस्थाकडून व्यक्त व्हावे.. मग रा. स्व. संघ हा सर्वानाआपलाच वाटतो अशा स्पष्टीकरणाची मुहूर्तमेढ त्या खासगी मतप्रदर्शनातून रोवली जावी, तेही होताना दिसत नाही. त्याऐवजी काँग्रेसवर टीका होते आहे ती, ‘लोकशाहीविरोधी’, ‘एकाधिकारशाही’ वगैरे.

याचे कारण काँग्रेसच्या वचनपत्रातील अन्य मुद्दे. ‘प्रत्येक पंचायत समितीच्या क्षेत्रातील गावांसाठी किमान एक गोशाळा स्थापन करणार’, ‘गोमूत्राचा व्यावसायिक वापर व्हावा यासाठी प्रोत्साहन देणार’ आणि हे कमी म्हणून की काय, मध्य प्रदेशातील चित्रकूट आदी ठिकाणांहून जाणाऱ्या ‘राम वनगमन पथा’चा विकास करणार, असे मुद्देही या काँग्रेसी वचनपत्रात आहेत. या मुद्दय़ांवरून काँग्रेस ‘सेक्युलरविरोधी’ असल्याची टीका आणखी मोठय़ा आवाजात सुरू आहे.

आपण हिंदूविरोधी की सेक्युलरविरोधी, असा प्रश्न काँग्रेसमधल्या कुणालाच बहुधा आतापर्यंत कधीही पडला नसावा. जाहीरनाम्यामुळे मात्र तो पडू शकतो. पण मग, जर काँग्रेस हिंदूविरोधी नाही आणि सेक्युलरविरोधी मात्र आहे, तर काँग्रेसने थेट ‘कलम ३७० रद्द करणार’, ‘समान नागरी कायदा आणणार’ आणि मुख्य म्हणजे ‘अयोध्येत भव्य राममंदिर उभारणार’ अशीच आश्वासने का देऊ नयेत, हा उपप्रश्नदेखील प्रत्येक सच्च्या काँग्रेसीच्या मनात  येणार. राममंदिर बांधू म्हटले की कसा राजकीय फायदा होतो, हे महाराष्ट्रातील एका प्रादेशिक पक्षाच्या कार्याध्यक्षांकडून काँग्रेसने आता शिकावे आणि थेट म्हणावे.. ‘तुम्हाला नाही जमले तर आम्हीच बांधू मंदिर’.. हा राममंदिराचा शंखनाद काँग्रेसने करावाच.. काँग्रेसजनहो, घ्या तो शंख आणि टाका फुंकून..