आमची टिंगल करणाऱ्यांनो, घ्या डोळ्यांमध्ये हे अंजन घालून. हे अंजन साधेसुधे नाही. बाजारात मिळणाऱ्या काळ्या रंगाच्या बोगस काजळाशी तुलनाच नका करू याची. त्यास काय काजळ म्हणायचे? काळा रंग तर कोळशाचाही असतो. तो कोळसा परवडला असले असते ते बाजारू, गल्लाभरू अंजन. आमचे हे अंजन तसे नाही. गाईच्या दुधापासून बनलेल्या तुपामध्ये भिजवलेली कापसाची वात चांदीच्या निरांजनात लावून, त्याच्या ज्योतीवर काढलेले हे अंजन आहे. १७ औंस गोमूत्र, २० औंस गाईचे दूध, १६ औंस एरंडेल, २ औंस तिळाचे तेल हे सगळे मिश्रण खलून केलेले हे अंजन आहे. ते डोळ्यांत घातल्याने दिव्यदृष्टी येते आणि भविष्यकाळही दिसू लागतो. तसाच तो आम्हास दिसला. अहाहा.. किती रम्य भविष्यकाळ वाट बघत आहे आपली. सुखशाली, समृद्धशाली, वैभवशाली, बलशाली, नीतिशाली अशा राष्ट्राची उभारणी येत्या काही वर्षांतच होणार आहे. काय रमणीय, सुंदर दृश्य असेल ते. त्या दृश्याला साथ असेल ती अत्यंत मधुर नादाची. अहाहा! ते दृश्य आत्ताच आम्हाला दिसते आहे.. तो मधुर नाद आत्ताच आमच्या कानांत गुंजतो आहे. खेडय़ांमध्ये ‘घर तिथे गाय’ योजना. प्रत्येकाच्या घरापुढे एक एक गाय बांधलेली असेल. मोठय़ा शहरांमध्येही ती योजना राबविली जाईल. शहरांमध्ये जागा नसते, असे म्हणताच नाही कामा कुणी. प्रत्येक इमारतीखालची वाहनांच्या पार्किंगची जागा गाईंसाठी राखीव ठेवली जाईल. वाहनांसाठी वेगळी व्यवस्था केलेली असेल. प्रत्येक इमारतीच्या पार्किंगमध्ये धेनूंचा वावर. त्यांचे ते सवत्सल हंबरणे, त्यांच्या गळ्यांतील घुंगरांचा तो मधुर ध्वनी. ओहोहो! हे सारे कशासाठी? वर वर्णन केलेल्या राष्ट्राच्या उभारणीसाठी. ही उभारणी होणार कशी? गाईच्या आशीर्वादाने. सकाळी राष्ट्रातील नागरिकांना जाग येईल ती त्यांच्या हंबरण्याने. मोबाइलमधील सकाळचे सुप्रभाती संदेश म्हणजे त्या हंबरनादापुढे अगदीच किरकोळ. नागरिकांच्या दिवसाची सुरुवातच मंगल, प्रसन्न वातावरणात होईल. मग गरमागरम.. अहं! चहा नव्हे.. गाईचे धारोष्ण दूध. बहुगुणी, बहुउपकारी. स्वयंपाकात बाजारू तेलाचा वापर बंद. गाईचे शुद्ध तूपच फोडणी व इतर कामांसाठी. शिवाय दही आणि रोज संध्याकाळी गोमयापासून तयार केलेल्या शेण्यांची धुरी घरोघरी. ही इतकी तजवीज केल्यानंतर काय बिशाद आजार कुणाच्या घरात प्रवेश करतील आणि चुकून शिरलाच एखादा आजार कुणाच्या घरात तर गोमूत्रासारखे जालीम औषध आहेच दिमतीला. अशी सगळी व्यवस्था केल्यानंतर नागरिक धष्टपुष्ट होणार आणि त्यांच्यासोबत राष्ट्रही धष्टपुष्ट. हे सारे होण्यासाठी आता थोडीशी प्रतीक्षा करावी लागेल. पंचगव्याचा अभ्यास करण्यासाठी केंद्र सरकारने समिती नेमली आहे. समितीचा अहवाल आला की मग राष्ट्र बलशाली होण्यापासून कुणीही आपल्याला रोखू शकणार नाही. समितीने तेवढा आपला अहवाल शीघ्र द्यावा. चांगल्या कामात कालापव्यय कशाला..