आपल्या देशाचे महत्भाग्य असे, की थोर थोर विचारवंत, सर्जनशील, मानवतावादी, सहिष्णुतेचे महामेरू, पापभीरू, सज्जन, सत्शील, सुविचारी व्यक्ती आपल्याला राजकीय नेते म्हणून लाभलेल्या आहेत. एक काळ होता, जेव्हा अध्यात्म, परमार्थ, मानवता, सहिष्णुता आदी विचारांचे संस्कार स्वत:वर घडविण्यासाठी बाबा-बुवा, साधुसंतांच्या चरणी लीन व्हावे लागायचे. त्यांचा कृपाप्रसाद प्राप्त झाल्याखेरीज सन्मार्गाचे दिव्य ज्ञान प्राप्त होत नसे. सांप्रतकाळी समाजमाध्यमे तसेच इलेक्ट्रॉनिक वगैरे माध्यमे फोफावल्यापासून, राजकीय नेत्यांनाही आपल्या अंगीच्या सद्गुणांचे साक्षात्कार होऊ  लागले असून, आपले विचारधन समाजापर्यंत पोहोचविण्यास ते उतावीळही होऊ  लागले आहेत. खरे म्हणजे, आपल्या रोजच्या जगण्यात असे अनेक अनुभव आपल्यालाही येत असतात, की त्या वेळी परिस्थितीपुढे गुडघे टेकून शरणागतभावाने वास्तवास सामोरे जाण्यातच शहाणपण असते. पण अशा प्रसंगात, की, गुरुविण कोण दाखविल वाट, अशी आपली पारंपरिक श्रद्धाच असल्यामुळे, एखाद्या गुरूने सांगावे आणि आपण शिरोधार्य मानून परिस्थिती पेलण्याचे बळ मेळवावे, ही तर आपली परंपराच आहे. सध्याच्या प्रगत विज्ञानयुगात अशा अध्यात्माला आपण पारखे होऊन जाऊ  की काय अशा भीतीचे वातावरण असतानाच, राजकीय नेत्यांच्या रूपाने आपल्याला परिस्थितीचे भान देणारे गुरू लाभावेत, हे आपले पूर्वसंचितच होय. आपला देश अवाढव्य व  लोकसंख्या प्रचंड असल्याने देशात एखाद्दुसरा बलात्कार होणारच, हे वास्तव स्वीकारण्याची आपल्या मनाची मानसिकता असायला हवी. ती घडविण्याचे काम आपले राजकीय नेते इमानेइतबारे करीत आहेत. कथुआ आणि उन्नावमध्ये घडलेल्या बलात्कार प्रकरणांनंतर, देशात संतापाचा उद्रेक झाला हे काही समंजस समाजाचे लक्षण नव्हे, हे केंद्रीय मंत्री संतोष गंगवार यांना जाणवले, आणि ते व्यथित झाले. एवढय़ा मोठय़ा देशात, एखाद्दुसरा बलात्कार होणारच, त्यात एवढे अवडंबर माजविण्यासारखे काय आहे, असा सवाल करीत गंगवार यांनी समाजाचे कान टोचले. ही गोष्ट समाजाला अगोदरच कळावयास हवी होती. एवढा मोठा देश, प्रचंड लोकसंख्या असलेला समाज जिथे असतो, तिथे एखाद्दुसरा बलात्कारच काय, एखाद्दुसरा खून होऊ  शकतो, एखाद्दुसरा दरोडा होऊ  शकतो, एखादा नीरव मोदी जन्माला येऊ  शकतो, एखादा बँकबुडव्या विजय मल्या अवतरू शकतो, हे आपण समजून घ्यायला हवे. एखाद्या कलबुर्गीची, एखाद्या दाभोलकरांची, एखाद्या गौरी लंकेशची हत्या झाली, तर एवढी वादळे का बरे माजावीत?.. अशा घटना तर होतच असतात, आणि त्या झाल्या तरी नवा दिवस उजाडला नाही असे होतच नाही. जनजीवनाचा गाडा तर हाकला जातच असतो. एवढय़ा मोठय़ा देशात, लोकसंख्या प्रमाणाबाहेर फुगत असताना अशा घटना होणारच, असे आपल्या देशातील एक विचारवंत खासदार हेमा मालिनी यांनी म्हटलेच होते. तेव्हा, जनहो, शहाणे व्हा!.. असे काही घडले, तर, त्यावर आपली मते व्यक्त करण्याआधी, एवढय़ा मोठय़ा देशात.. असा विचार करून बघा. तुमच्या वेदनांवर नक्कीच एक फुंकर बसेल. गंगवारना धन्यवाद द्यायलाच हवेत!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व उलटा चष्मा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Crime in india
First published on: 23-04-2018 at 02:03 IST