13 December 2018

News Flash

देखो मगर प्यार से..

निधन सेलेब्रिटीचे असेल तर ते धक्कादायक, श्रद्धांजलीप्रतिक्रियालायक व संशयास्पदही असते.

संग्रहित छायाचित्र

कोणताही मृत्यू हा नेहमीच दु:खद असतो. त्यातही अचानक कोणाचे निधन झाले, तर ते अधिकच दु:खद असते. निधन सेलेब्रिटीचे असेल तर ते धक्कादायक, श्रद्धांजलीप्रतिक्रियालायक व संशयास्पदही असते. त्यावर चार दिवस २४ तास बातम्या चालविता येतात. पण मुंबईच्या राणीच्या बागेतील ती मगर ही काही कोणी तारका नव्हती. छोटीशीच तर होती. अचानक गेली एवढे सोडता त्यात काहीही धक्कादायक नव्हते. त्या निधनाबद्दल तसे आम्हांलाही दु:ख आहे. परंतु त्याची बातमी ठळक टंकात छापून यावी हे काही आमच्या मनास पटत नाही. हीच ती हल्लीची नकारात्मक पत्रकारिता. आता या बातमीमुळे खळबळ माजणार. कोणी तरी प्राणीअधिकारवाले जागे होणार. राणीच्या बागेत गजाआड ठेवलेल्या मगरीचा संशयास्पद कोठडीमृत्यू असा आरोप करणार. मग सत्ताधाऱ्यांनाही उगाच नक्राश्रू ढाळावे लागणार. वस्तुत: सत्ताधाऱ्यांनाच काय, अगदी विरोधकांनाही अशा मगरी पकडून गजाआड ठेवण्याची फार हौस असते अशातला भाग नाही. अनेकदा तर छातीवर पत्थर ठेवूनच त्यांना ही अशी कृत्ये करावी लागतात. प्राणिसंग्रहालयातील पिंजरे उगाच छोटय़ा-मोठय़ा प्राण्यांनी भरले की ‘पब्लिक पस्रेप्शन’ वेगळे होते. तशात कधी तरी पेंग्विनसारखे सेलेब्रिटी प्राणी पिंजऱ्यांत ठेवले आणि मग त्यांची तेथे किती ठेप ठेवण्यात येते, त्यांच्यासाठी कसे वातानुकूलित वातावरण निर्माण केले जाते, त्यांच्या खाण्यापिण्याची पंचतारांकित व्यवस्था केली जाते, त्यांच्या मनोरंजनाची काळजी घेतली जाते, हे सारे जनतेस समजले की मग उगाचच सरकारबाबत संशय निर्माण होतो लोकांच्या मनात. तेव्हा मग लोकांच्या समजुतीचे व्यवस्थापन करण्यासाठी ठेवल्या जातात पिंजऱ्यात एखाद-दोन मगरी. पण सत्तेवर कोणीही असो; त्यांना मगरी पकडून ठेवण्यात खरोखरच आनंद नसतो. याचे कारण हा सत्तेचा गुणच आहे. ती लाभली की आपोआपच मनात ‘भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे’चे सूर निनादू लागतात, काळजात मगरी, सुसरी, लांडगे, कोल्हे, गिधाडे, झालेच तर उडय़ा मारणारी माकडे अशा विविध प्राणीजातींबाबत माया निर्माण होते. म्हणूनच कधीही पाहा, कुठे पंचगंगेत, कुठे पवई तलावात, कुठे एखाद्या नाल्यात मगर दिसल्याचे बलगाडीभर पुरावे आहेत असे म्हणत तिला पकडण्याची मागणी करणारे विरोधक सत्तेवर येताच एकदम प्राणिमित्र बनतात. ‘देखो मगर प्यार से’ असेच होऊन जाते त्यांना. शिवाय आपल्याकडे मोठाल्या मगरी पकडण्याचे तंत्र आणि व्यवस्था दोन्हीही अविकसित. या मगरींना पकडण्यास सत्ताधारी गेले आणि मगरीने त्यांचाच पाय जबडय़ात पकडला तर उगाच गजेंद्रमोक्ष व्हायचा. त्यापेक्षा पंचतंत्रातील त्या माकडाप्रमाणे मगरीच्या पाठीवर बसूनच सत्तेची ही भवनदी पार करणे केव्हाही सोपे. आता कधी कधी असे होते, की या मगरीही वाघाप्रमाणे नरभक्षक होतात. अशा वेळी तिला पकडण्यापेक्षा या नदीतून त्या नदीत हाकलून लावणे अधिक शहाणपणाचे असते. त्यातून दोन गोष्टी साधतात. लोकांना वाटते की सत्ताधारी किती शूर. मगरमर्दन केले त्यांनी. काळा डोह स्वच्छ केला. हे समजले की लोकच मग डोह संवर्धनाचे ‘अँथेम’ तयार करतात. दुसरीकडे मगरींनाही आपल्याला कोणी वाली नाही असे वाटत नाही. त्याही खूश होतात, मगरप्रेमीही खूश होतात आणि जैविक साखळीही अबाधित राहते. तेव्हा वार्ताहरांनी हे नीट समजून घ्यावे. त्याच्या नकारात्मक बातम्या छापून वातावरण गढूळ करू नये.

First Published on March 6, 2018 2:15 am

Web Title: crocodile dies in rani baug