‘अध्यात्म’ ही एक अशी गोष्ट आहे, ज्याचा कोठेही, कोणत्याही वेळी आणि कोणत्याही रूपात उत्कट साक्षात्कार होत असतो. अनेकदा अजाणतादेखील अध्यात्माची जाणीव होते, आणि ‘खरा धर्म’ कोणता याचे उत्तरही त्यातूनच मिळून जाते. ग्राहकाने मागविलेले अन्नपदार्थ एखाद्या रेस्टॉरंटमधून उचलून त्या ग्राहकाच्या घरी पोहोचविण्यापुरतीच लहानशी आणि ‘निमित्तमात्र’ भूमिका बजावणाऱ्या एका ‘डिलिव्हरी बॉय’वर ओढवलेल्या एका अप्रिय प्रसंगामुळे या अध्यात्माचा साक्षात्कार उभ्या जगाला झाला आणि ‘अन्नाला धर्म नसतो, तर अन्न हाच धर्म असतो’ या आध्यात्मिक सत्याची ओळख जगाला पटली. अन्नाला धर्म नसतो हे जितके खरे, तितकेच ‘गरिबीला आवाज नसतो’ हे सत्यही या प्रसंगाने अधोरेखित केले. अन्नाला धर्म नसतो, हे ‘झोमॅटो’च्या व्यवस्थापनाने ठणकावल्यामुळे त्यापैकी पहिल्या सत्याचा आवाज जगाच्या कानाकोपऱ्यात तरी पोहोचला. पण त्याच वेळी, हा अप्रिय प्रसंग घडला त्या गावात, केवळ उदरनिर्वाहाचे साधन म्हणून नोकरी करणाऱ्या त्या डिलिव्हरी बॉयच्या तोंडून या प्रसंगानंतर जेमतेम उमटलेला ‘गरिबीचा आवाज’ मात्र क्षीणच राहिला. गरिबीला आवाज नसतो, हे वास्तव त्याच्या तोंडून उमटले असले, तरी झोमॅटोच्या ‘ठणकावण्या’पुढे ते फिकेच पडले. ‘अन्न’ आणि ‘उदरनिर्वाह’ या एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात. ग्राहकाने मागविलेले अन्न त्याच्यापर्यंत पोहोचविणे हे त्या डिलिव्हरी बॉयच्या उदरनिर्वाहाचे साधन असताना, या दोन्ही बाजूंचे पितळ ज्या प्रसंगामुळे उघडे पडले, त्यामागचे ‘धर्मकारण’ मात्र भलतेच निघाले. त्यानंतर निर्माण झालेल्या वादाचे वलय घेऊनच उजाडलेला पवित्र श्रावण या दुर्दैवी वादामुळे नक्कीच विव्हळून गेला असेल यात शंका नाही. श्रावण महिन्याचे माहात्म्यच या घटनेमुळे पणाला लागले, आणि सहिष्णुतेच्या वारशाची कसोटीही सुरू झाली. त्याबरोबरच झोमॅटोच्या ‘व्यापारनीती’चीही चर्चा सुरू झाली. डिलिव्हरी बॉयच्या धर्मावरून ‘श्रावणश्रद्धे’चा मुद्दा उगाळणाऱ्या कुणा पंडित शुक्लाचे चुकले की बरोबर, या वादाला आता समाजमाध्यमांवर जोर चढला आहे. याच कंपनीच्या इतिहासातील काही नेमक्या प्रसंगांची उजळणीही या निमित्ताने सुरू झाली आहे. अन्नाला धर्म नसतो, गरिबीला आवाज नसतो, या आध्यात्मिक वास्तवाचा जसा पंडित शुक्लाच्या एका ट्वीटमुळे समाजाला साक्षात्कार झाला, तसाच एक साक्षात्कार झोमॅटोच्याच एका डिलिव्हरी बॉयच्या एका कृतीमुळे सुमारे सात महिन्यांपूर्वी समाजास झाला होता. अन्न आणि उदरनिर्वाह हे अध्यात्माचे मूळ असते, हेही एक अध्यात्मच! सुमारे सात महिन्यांपूर्वी, डिसेंबर २०१८ मध्ये, झोमॅटोच्याच एका डिलिव्हरी बॉयने ग्राहकासाठी पाठवायच्या अन्नाचे पाकीट फोडून त्यातील पदार्थ चाखत स्वतची भूक भागविली, तेव्हाही अशाच एका वादाचा जन्म झाला. पण ‘भुकेला लाज नसते’ हे विदारकवास्तव मात्र त्या वादामुळे उजेडात आलेच नाही. आताही तसेच होत असावे. ‘अन्नाला धर्म नसतो, अन्न हाच धर्म’ या अध्यात्माचा एवढा बोलबाला सुरू झाला आहे, की गरिबीला आवाज नसतो हे वास्तविक अध्यात्म मात्र त्यापुढे दबूनच राहिले आहे. धर्माच्या नावाने गाजणाऱ्या वादाच्या गदारोळात गरिबीचा आवाज असा क्षीण झाला, तर ते काळजी वाटण्याजोगेच..