दुसऱ्या कुणाच्या तरी खांद्यावर चढून आपल्या मनोरथांचे उंच मनोरे रचावेत आणि सर्वात वरच्या थरावर सरसर चढून ईप्सितसिद्धीच्या लोण्याच्या गोळ्यास हात घालणार, तोच पलीकडच्या गॅलरीतून कुणीतरी घागरभर पाणी अंगावर फेकावे.. मग बघता बघता पायाखालचा निसरडा थर कोसळून पाय जमिनीवर यावेत, तसे काहीसे झाले, तर दहीहंडीच्या उत्साहास मजा ती काय राहणार? मुळात दहीहंडी हा मनोरंजनाचा प्रकार आहे, खेळ आहे, की सण-उत्सव आहे, याचा संभ्रम दिवसागणिक वाढत असताना आणि उत्सवमूर्तीच्या – म्हणजे सेलिब्रिटींच्या – हजेरीमुळेच त्याला झळाळी येते हे उघड असताना, सण म्हणून साजरा करण्यासारखे यात काय राहिले, ही भावना तसेही आजकाल बळावतच चालली आहे. त्यात भर म्हणून, दहीहंडीला क्रीडाप्रकार म्हणून मान्यता द्या, अशी मागणी काही नेतेमंडळी कधीचीच करीत होती. त्यावर अनेक वैचारिक खलबते करून अखेर राज्य शासनाने ते कधीचेच मान्य करून टाकले आहे आणि ‘प्रो गोविंदा’ स्पर्धेच्या निमित्ताने गेल्या वर्षी त्यावर शिक्कामोर्तबही केले आहे. कुठे संघर्ष, कुठे संस्कृती, तर कुठे संकल्प.. सर्वत्र या खेळाचा उत्सव झाला.. अशा या हंडीच्या अद्भुत ‘खेळा’त, थरावर थर रचून जिवावर उदार होणाऱ्या गोविंदांच्या गदारोळात कॅमेऱ्यांचे प्रकाशझोत स्वत:च्या अंगावर ओढत कुणी तरी एखादा आकाशाएवढय़ा उंचीचा होऊ पाहतो. आता आपले हात अस्मानाला टेकले असे वाटत असतानाच, जीभ सैल होते. शिखरावर चढल्याच्या मस्तीचा एखादा आविष्कार घडविण्याची खुमखुमी अनावर होते आणि ‘पळवापळवी’ची ‘अराजकीय’ आश्वासने देण्याचा मोहदेखील आवरत नाही. मनोऱ्याच्या थरा-थरांवरील मानगुटींवर पाय देऊन शेवटच्या थरावर पोहोचल्यानंतर हंडीतील लोण्याचा गोळा गिळंकृत करण्याचा क्षण समोर आलेला असतानाच, नेमक्या याच मोहाचे पाणी त्यावर फेरले जाते आणि थरावरून पाय घसरून थेट जमिनीवर येऊन आदळल्याचा नकोसा अनुभवही पदरी पडतो. असे काही झाले, की त्या क्रीडाप्रकाराचा -किंवा उत्सवाचा- उत्साहच संपून जातो. गेल्या वर्षीच्या अपार उत्साहाचा अंश यंदाच्या दहीहंडीमध्ये दिसणार नाही, अशी चर्चा आहे. कारणे काहीही असली, तरी यंदा सगळीकडे भरलेल्या निरुत्साहाची दृश्ये दाखविण्यासाठीही ‘बूमधारी’ माध्यमांना धावाधाव करावीच लागणार आहे. कोणत्याही क्रीडाप्रकारात जिंकायचे असेल, तर संघर्ष असतोच. विजयाचा संकल्प सोडावा लागतो; पण कोणत्याही खेळाची संस्कृती असते आणि ती जपावीच लागते. याचे भान विसरले, की हे असे होते. मुंबई-ठाण्यात यंदा दहीहंडीच्या उत्साहाचीच घागर उताणी पडणार असे दिसत असले, तरी पुण्यासारख्या- आद्यसंस्कृती आणि नवसंस्कृतीचे मधुर मिश्रण असलेल्या शहरात यंदा गणेशोत्सव मंडळांत आणखी वाढ झाली आहे. हे चांगले लक्षण म्हणायचे की नाही याचा फैसला, उत्सव पार पडल्यानंतरच करणे शक्य होईल. मात्र दहीहंडी हा सरकारदरबारी क्रीडाप्रकार असला, तरी तो पारंपरिक उत्सवदेखील आहे याचे भान पुण्यास असेल अशी महाराष्ट्राची अपेक्षा आहे. गतवर्षी गणेशोत्सवाच्या लोगोमधील लोकमान्यांची प्रतिमा काढून टाकण्यावरून वाद झाले. पण गणेशोत्सवांचे सध्याचे स्वरूप पाहून खुद्द लोकमान्यांनाही -ते जेथे असतील तेथे- आनंदच झाला असता, असे वाटणाऱ्यांचा वर्ग आजही पुण्यात आहे. तोच वर्ग या वर्षी दहीहंडीचा दिवस हा उत्सवाचा, सणाचा की क्रीडा महोत्सवाचा, याचा निर्णय करणार आहे. दहीहंडीच्या निमित्ताने मनोरथांचे थर रचून उंचीवरच्या हंडीतील लोण्याचा गोळा पटकावण्याची स्वप्ने पाहणाऱ्यांनी याची जाणीव ठेवलेली बरी!