हल्ली आम्ही टीव्हीवर बातम्या पाहू धजावतच नाही. केव्हाही बातम्यांचा च्यानेल लावला, की कोणी एखादा ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू रडतानाच पाहायला मिळतो. ‘आय हेट टियर्स’ असं म्हणताना कधी आमच्याही हृदयात कालवाकालव होऊन डोळ्यांच्या कडा पाणावतात. नक्की बातम्याच पाहतोय की एखादी टीव्ही मालिका अशीही शंका मनाला शिवून जाते. त्या ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंच्या सोबतीला कधी वडील असतात, आई असते नाही तर पत्नी असते. डेव्हिड वॉर्नर नामे क्रिकेटर तर दक्षिण आफ्रिकेतून ऑस्ट्रेलियात उतरल्यापासून कडेवर मूल, सोबत पत्नी नि तिच्याही कडेवर मूल असा कुटुंबकबिलाच घेऊन वावरतोय.. माझा नको पण किमान त्यांचा तरी विचार करा ना असंच जणू सुचवायचा प्रयत्न करतो. किती क्लेश होतात अशी दृश्ये पाहून! परवा स्टीव्ह स्मिथच्या साथीला त्याचे वडील उभे होते. शोकात्म वातावरणात आम्हीही त्याचं म्हणणं  ऐकून घेत होतो, तर आमचा एक व्रात्य मित्र हकनाक ‘मुन्नाभाई’ स्टाइलमध्ये ‘गल्ती तेरे बाप का है, दो लाफा बचपन मेंही मारता तो..’ असा बोल्ता झाला. प्रसंग काय नि हा बोल्तो काय? कर्णधार स्टीव्ह स्मिथ, उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर, प्रशिक्षक डॅरेन लेहमान हे सगळेच चेंडू खरवडल्याप्रकरणी पायउतार झाले किंवा केले गेले. ऑस्ट्रेलियात पत्रकारांसमोर आल्यानंतर बोलत रडले किंवा रडत बोलले. टफ, हार्ड की काय म्हणतात तसले हे क्रिकेटपटू ना? मग असे रडत कशाला बोलतात?  मन काही वर्ष मागे गेलं. त्या वेळी ऑस्ट्रेलियाच्या दिग्विजयी संघाचा कर्णधार होता स्टीव्ह वॉ. एकामागोमाग एक संघांना धूळ चारत कांगारूंचा विजयरथ तुफान निघाला होता. आपल्या विजयाचं रहस्य स्टीव्ह गुर्मीत सांगायचा.. मेंटल डिसिंटिग्रेशन! म्हणजे समोरच्या संघाला, त्या संघातील महत्त्वाच्या खेळाडूंना मानसिक पातळीवर उद्ध्वस्त करायचं. झालंच तर रडवायचं. ऑस्ट्रेलियासमोर दारुण हरल्यामुळे इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, पाकिस्तान अशा संघांचे कर्णधार, खेळाडू अक्षरश: रडवेले होत क्रिकेटबाहेर फेकले गेले हेही खरंच. त्याच संघातून हल्लीच्या संघाचे मास्तर डॅरेन लेहमानही अधूनमधून खेळायचे. अशी मेंटल डिसिंटिग्रेशनची जाज्वल्य परंपरा असलेल्या संघाचे सध्याचे अधिपती मात्र स्वतच उद्ध्वस्त झाले हे पाहून मन खंतावलंच जरा. त्यांनी चेंडूत फेरफारच केले, म्याच फिक्सिंग नाही केलं काही, असा एक समर्थनार्थ सूर. तर फेरफार काय नि फिक्सिंग काय, फसवणूक ती फसवणूक असा विरोधी सूर. आयपीएल नाही, पुरस्कर्ते नाहीत म्हणूनही असेल ही रडारड, असाही एक खास पुणेरी कणसूर. आमचं मन मात्र स्टीव्ह वॉच्याही आधीच्या काळात रुंजी घालू लागलं नि लख्खकन प्रकाश पडला. त्या वेळी आम्ही शाळेत होतो. काही तरी भयंकर अपराध घडला होता. हातावर हेडमास्तरांच्या हस्ते फूटपट्टीचे पाच रट्टे अशी शिक्षा. त्या मानांकितांच्या लायनीत आम्ही तिसरे. पहिले दोघे मख्खपणे रट्टे खात होते. आम्ही भोकाड पसरलं. हेडमास्तर आले, तसे जमिनीवर लोळू लागलो. हेडमास्तरांच्या डोळ्यात संतापाऐवजी कणव. तरीही म्हणाले, हात पुढे कर.. एक बारीकसा रट्टा दिल्या न दिल्यासारखा बसला.. कसंबसं ओठांवर आलेलं हसू दाबलं आणि..